दमयंती स्वयंवर - पृष्ठ २१

रघुनाथ पंडित यांच्या काव्यात इतके माधुर्य व इतका रस आहे की, ते आरंभापासून शेवटापर्यंत वाचल्यावाचून मनाची तृप्ति होत नाही व एकदा वाचले म्हणजे पुनः वाचावेसे वाटते.


मालिनी

प्रकट तिजपुढारी जाहला राजमौळी ।

पदर वरि न घेता हार तैसा झळाळी ॥

निजह्रदयनिवासी काय बाहेरि आला ।

निरखुनि दमयंती तेवि मानी तयाला ॥२०१॥

द्रुतविलंबित

गजबजोनि समस्त तिच्या सख्या । तिजसवे उठल्या तिजसारिख्या ॥

पदर सावरिता नृपबालिका । झळकती ह्रदयी मणि-मालिका ॥२०२॥

शा०वि०

कोण्ही येक सखी विलोकुनि नळक्षोणीश्वरा मोहिली ।

कोण्ही तत्तनुकांति-सिंधुफलितद्रोणीपरी पोहिली ॥

कोण्ही हा मजला न नाथ म्हणुनी लोणी तसी पाझरे ।

कोण्ही येक तयास लाजुनि भरे कोण्ही वियोगे झुरे ॥२०३॥

रामाते जनकक्षमापतिसुता, रामा जसी रेवती ।

कामारीस नगाधिराजतनया, कामासि जैसी रती ॥

या मानूनि तसी विदर्भदुहिता रामा मनी भाविते ।

'हा माझा ह्रदयाब्जसूर्य गमतो' त्या मानिनी बोलते ॥२०४॥

पद

"कवण तुम्ही, कवणाचे, कोठे येथे आला हो ।

काय निमित्ते दिधला मजला निज दर्शनलाहो ॥

अटक न केले तुम्हांस येता सातांही बंकी ।

हे माझ्या नयनाचि सुकृते विशेश मी शंकी ॥

संभवला कवणाचे वंशी सांगा अकलंकी ।

उभे असा का? भागतसा का? बैसा पर्यंकी ॥२०५॥

वसंततिलका

राजे असाल तरि धन्य वसुंधरा हे । शोभाल देव, तरि नाक यथार्थ आहे ॥

भोगी तुम्ही उपजला जरि नागलोकी । खाले असोनि सकळांवरि होय तो की ॥२०६॥

पद

दुग्ध पूर नसता निजरूपी क्षीरसिंधु जैसा ।

वसंत आला नाही तरि उद्यान भाग जैसा ॥

अमृतकराचा उदय न होता रजनीसमय जैसा ।

तुमच्या विरही आज जाहला कवण देश तैसा ॥२०७॥

वसंततिलका

भूपाल जो मम मनोमुकुरी उभासे । तो नैषधेंद्र तुमचा अनुबिंब भासे ॥

रूपे तदीय दिसताति दिगंतराळी । ती ही कैसी म्हणवतील तुम्हा-निराळी? ॥२०८॥

पद

सरसाकृति पद शिरसाचे मृदु फुलसे स्वभावे ।

चालबाल किति दूर तयाते अदयह्रदयभावे ॥

कर्णयुगल हे धन्य करावे बोलुनि निज नावे ।

स्तवन करी रघुनाथ तयाचे कवन आदरावे ॥२०९॥

मालिनी

"तुजवरि मन ईचे यापरी का इयेला ।

त्याजिसि?" सुमशराने हा असा बोध केला ॥

तृणकणि गणि जैसा त्यासि धैर्यै गणीतो ।

युवतिसि मग बोले राजचूडामणी तो ॥२१०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP