पद
धरणीवरी धन्य जाले परोपकारी दाते ॥धृ०॥
होता दधिची नामा मुनी । कणा पाठीचा देउनी । जेणे कीर्ति केली जनी । चंद्रापरी सदा ते ॥१॥
निववुनी पक्षाच्या भुकेला । कोरुनि देह टोरल केला । शिबिने शरणागत रक्षिला । काय बोलो महिमा ते ॥२॥
रघुनाथाचा पूर्वज भला । नामे भगीरथ ऐकिला । तेणे गंगौघ आणिला । जेणे जनता उद्धरते ॥३॥१८१॥
मालिनी
गहिवरत गळाही चावळे जीभ वाळे ।
विकलपण शरीरी कंपही यानिराळे ॥
धनिक विमुख होता अंतरी शोक राहे ।
हरहर मज भासे याचना यातना हे ॥१८२॥
पद
नलगे याचना यातना । हरहर भयमोचना ॥धृ०॥
जिची आलोचना करितां नीरच ये लोचना ॥१॥
धनिक करी वंचना नेदी तिळभरही कांचना ॥२॥
दैन्य कसे जाचना । करुणा रघुनाथा येचना ॥३॥१८३॥
वसंततिलका
भांबावला धनमदे भलतेच बोले । ते बोलही सरस मानुनि लोक डोले ॥
मासेकरूनि फुगला गळसाच भावे । ज्या दीन मीन धरिता वळसाच पावे" ॥१८४॥
दण्डी
असे परिसोनी बोल वासवाचे । तया नळराज काय वदे वाचे ॥
'तुम्ही जाणते थोर थोर साचे । असा साक्षीही माझिया मनाचे ॥१८५॥
ज्यासि जेथे सामर्थ्य नसे त्याते । कसे ते कार्य तुम्ही सांगिजेते ॥
बाळ साने उचलील काय जाते? । बोलणाराचे भेट कसी होते? ॥
त्यजुनि राजत्व दूतता कसी ते । धरावी म्या? ह्रदयास जे कसीते ॥१८७॥
वसंततिलका
बंकी करी अटक देइन मी चपेटे । तेणे तयास मजसी कथलाच पेटे ॥
होता असा मज निरोध नृपावरोधी । जातो कसा? न फिरवे तुमच्या विरोधी ॥१८८॥
बोले सुरेंद्र "नृपसौध सुखे फिराया । आकार-गुप्ति वर देइन देवराया ॥
जायी विदर्भवसुधेशसुतेस बोधी । आम्हांसि ते तरि वरील तुझ्याच बोधी ॥१८९॥