दमयंती स्वयंवर - पृष्ठ ३

रघुनाथ पंडित यांच्या काव्यात इतके माधुर्य व इतका रस आहे की, ते आरंभापासून शेवटापर्यंत वाचल्यावाचून मनाची तृप्ति होत नाही व एकदा वाचले म्हणजे पुनः वाचावेसे वाटते.


दण्डी

नैषधी ते मोहिली गुप्तरूपे । मनी लाविला वेध कुसुमचापे ॥

असो, गौरविले विप्र तिच्या बापे । धने वसने त्या दिधली अमूपे ॥२१॥

कथा तेथील होय असो ऐसी । आले जासूद वदति नैषधासी ॥

तुझ्या कथनी विदर्भराजयासी । प्रीति, होती तनयाहि तयापासी ॥२२॥

शा०वि०

बापाच्या उजवेकडे निवसली म्यां पाहिली नोवरी ।

व्यापारांतर टाकुनी तव कथाव्यापासि ते आदरी ॥

तापाते हरिते करोनि मधुरालापासि ते सुंदरी ।

ज्या पावे जगदीश, सांगसुमनश्चापा नृपा, त्या वरी ॥२३॥

वसंततिलका

हे अंतरंग पिवळे सरसीरुहाचे । भासे मनात मज अंग तसे तियेचे ॥

गोरोचनापरिस गौर असे गणावे । सोनेच बावनकसे न कसे म्हणावे? ॥२४॥

दण्डी

असो बोलता चार समाचारा । करी दमयंती नलमनी विहारा ॥

'नोवरी ते मज होय कशी दारा' । करू लागला भूप या विचारा ॥२५॥

विभूतीने झांकला अनळसा तो । गुप्त दमयंतीविरह नृपा होतो ॥

नित्य पोटी वडवाग्नि पेट घेतो । सागराने तो काय सांगिजेतो ॥२६॥

वसंततिलका

मानी मनोजशर हारतुरे फुलांचे । कंदर्पकोपवचन ध्वनि कोकिलांचे ॥

राका-शशी मदनदर्पण भाविला हे । नेघेचि, तो न परिसे, न तयासि पाहे ॥२७॥

शा०वि०

छायानायकसा निदाघसमयी छाया धरी तो विधू ।

पायाही ह्रदयश्रमासि करितो दायादसा हा मधू ॥

जाया ते रुचली मनी तिजकडे जाया न ये की पहा ।

रायाला न गमे न जाय रजनी आयास होती महा ॥२८॥

पद

नीज न ये नळराजया । तजवीज दिवारजनी जया ॥धृ०॥

रूप लिहूनि तिचे करी । अनुरूप म्हणोनि उरी धरे ॥१॥

चार जरी भलता दिसे । शशिचारुमुखी तया पुसे ॥२॥

मोह मनात न सावरी । मनमोहन ते सरसावरी ॥३॥

मंद समीरण वागला । तरि मंद म्हणे मज लागला ॥४॥

पाथरही दिसतांच हा । रघुनाथ म्हणे नवसी पहा ॥५॥

गीति

रजनीदिवस गमेना नृपास संगीतही सुख गमेना ।

मन कोठेहि रमेना, म्हणूनि "करु वनविहा", विरमेना ॥३०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP