गीति
'पाषाणरूप जाते । भ्रमवि तयाते धरूनि जे हाते ।
जीवंतही गवसला । समज तियेचे भ्रमीच मग वसला' ॥११२॥
मालिनी
चतुर नर यखादा बोलतो हंस तैसा ।
तरि न धरि मृगाक्षी विस्मयी भाव कैसा? ॥
'पळुनि मज निखंदी,' तीस तो खेद नाही ।
शिणहि विसरली ते बोलती होय काही ॥११३॥
दण्डी
"कोण तू गा कोठील कोऽणाचा? ।
कसा जाला तव देह सुवर्णाचा ?॥
कसी आली ही तूज मनुजवाचा? । काय भाग्योदय तूचि या वनाचा? ॥११४॥
धरिल पाहिल सोडील असा पाही । मजवरी विश्वास तुला नाही ॥
नसो पुसते ते सांग कथा काही । जाइ अथवा मग या वनात राही, ॥११५॥
असे बोलोनी मौन धरुनि राहे । काय बोलतो हंस असे पाहे ॥
तदा त्याचा वचनौघ असा वाहे ॥ राजकन्ये, तू आयके गिरा है ॥११६॥
"ब्रह्मदेवाचे बहु विमानवाही । हंस आहेत ऐकिले तुवाही ॥
तया माजी सुवर्णदेह हाही । ज्या समान साख्य सर्वमान्य नाही ॥११७
वसंततिलका
"मंदाकिनीमधिल जे कनकारविंदे । जे जेवितो मृदुलनालमृणालकंदे ॥
आम्ही असो नृपसुते, तरि कांचनाचे । जे कार्य ते धरिल की गुण कारणाचे ॥११८॥
जो मानसी विहरतो विहरो परी तो । का आमुची कुलसती असती करीतो ॥
राखी नळा निजयशोमय-हंसराया । आलो महीवरि फिरादि असी कराया ॥११९॥
मी गुंतलो नळ-महेंद्र-गुणौघपाशी । सेवेशी मग करोनि तयाच पासी ॥
आलोकुनी कवण या चतुरा न नाचे? । लोकेशता विभवही चतुराननाचे ॥१२०॥
गंगोदकी घडिघडीस बुडीस देतो । पंखा सुशीतल करोनि तसाच येतो ॥
तेणे नळासि करोति मग वीजनाते । बाळे जसा न धरि तो सुरतश्रमाते ॥१२१॥
एकांत लेखनहि वाचनही करी तो । माझी तनु-द्युति समीप तदा धरीतो ॥
या कारणे नळ मला बहु आप्त मानी । तो सांगता निज मनोरथ होय कानी ॥१२२॥
आधीच नैषधकथा नवनीतभेला । होता अलंकरणरूप इच्या जिभेला ॥
हंसोदये विघरता अधरी धरी ते । स्वीकारिता वचन हे मग आदरीते ॥१२३॥