दण्डी
अमरनाथे मग मात बोलिजेली । सर्व ऊर्वी निर्वीर काय जाली ॥
राजसंतति कोठे असे दडाली । युद्धवार्ताही ते दिसे उडाली ॥१६१॥
मग सुरेंद्रा ऋषि बोलतो गिरा हे । "भीम नृप तो तुज ठाउकाच आहे ॥
सुता त्याची दमयंती नाम लाहे । मदनशस्त्र जे कुसुमकोमला हे ॥१६२॥
भुजंगप्रयात
समुद्रोद्भवा अप्सरा साठि कोटी । जयांची द्युति त्या रतीलाहि लोटी ॥
विधीने तशा त्या तुळू पाहिजेल्या । इयेशी हळू जाहल्या उंच गेल्या ॥१६३॥
मालिनी
उपवर दमयंती जाहली नोवरि ते ।
कवण वर कळेना हे जयाते वरीते ॥
दृढतर निजलज्जागव्हरी सिंह केला ।
जिवलगहि सखीला जो नसे सांगिजेला ॥१६४॥
दण्डी
नवे तोरण नृपवर तीजसाठी । मोहिले ते करिताति यत्न कोटी ।
कलहवार्ता ही मानिताति खोटी । जया युवतीची आस तया मोठी" ॥१६५॥
असा नारद बोलोनि तो निहाला । जाय ह्रदयास मानल्या स्थळाला ॥
थोर चिंता मग होय सुरेंद्राला । म्हणे कैसी ते वरिल आपणाला ॥१६६॥
वरुण पावक यम इंद्र हे मिळाले । असे अवघेही रथारूढ जाले ॥
महीलोकासी यावया निघाले । तया कुंडिननगरासमीप आले ॥१६७॥
द्रुतविलंबित
तंव तया चवघांस तया पथी । निषधनायक येत दिसे रथी ॥
तरुण सुंदर जो चतुराग्रणी । अतुळवैभव राजशिखामणी ॥१६८॥
मालिनी
निरखुनि निषधेंद्रा इंद्र तो बोलताहे ।
युवति उभयथाही लभ्य आम्हांसि नोहे ॥
वरिल जरि नळाते ते तया लाभलीजे ।
न वरि तरि तसी ही मूढ ते काय कीजे ॥१६९॥
शिखरिणी
नळाते पाचारी सुरपति विचारी कुशल तो ।
म्हणे 'आम्हांपासी तव गुरु विलासी निवसतो ॥
खूणा ज्याज्या त्याच्या तुजजवळि राजा निरखितो ।
हिरा तू तद्वंशी म्हणउनि तदंशी समजतो ॥१७०॥