यज्ञ

प्रस्तुत ओव्या वाचत असताना साधक एका वेगळ्याच अनुभवानं भारला जातो.


यज्ञ या शब्दाच्या उच्चाराबरोबर श्रद्धाळू माणसाच्या मुखावर आदरयुक्त भावना पसरते तर विज्ञाननिष्ठ म्हणविणार्‍यांच्या मुखावर तुच्छतेची भावना उमटते. ''अंधश्रध्दा ! अंधश्रध्दा !'' असा डांगोरा पिटायला सुरुवात होते.
यज्ञ म्हणजे प्रक्रिया असा साधा सरळ अर्थ घेतला तर कित्येक बाबींचा उलगडा व्हायला मदत मिळेल. या जगात विविध प्रकारे जड सृष्टीचे दर्शन होत असते व भावना विविध जीवयोनी यांच्याद्वारे चेतनेचेही दर्शन घडत असते. म्हणूनच यज्ञ म्हणजे प्रक्रिया असे जरी असेल तरी प्रक्रियेला जाणीवपूर्वक दिलेल्या सुयोग्य भावनांची जोड म्हणजे यज्ञ असे म्हणणे जास्त उचित होईल.
लग्न, मिलन, गर्भधारणा, जन्म देणे व अपत्य वाढविणे या जशा प्रक्रिया आहेत. तशाच प्रकारे आहार घेणे, त्याचे विघटन, शोषण, पेशींचे पोषण, रोगनिर्मूलन, मल उत्सर्जन इ. सुद्धा प्रक्रियाच आहेत. या सर्व प्रकृतीच्या नियमाप्रमाणे होत असल्या तरी वेळोवेळी विविध टप्प्यांवर त्यांना सुयोग्य भावनांची जोड दिली तर त्यास यज्ञस्वरूप प्राप्त होते. खचितच असे यज्ञस्वरूप अत्यंत पवित्र वाटल्याविना राहणार नाही. ''उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म'' हा एक समर्थसंदेश आपण प्रामाणिकपणे व प्रेमपूर्वक जगू शकलो तर वैयक्तिक व जागतिक असे किती तरी प्रश्न सुटू शकतील.
'यज्ञाद भवति पर्जन्यो' या गीतावाचनातील यज्ञ शब्दाचा अर्थही आपण समजून घेतला पाहिजे. निसर्ग हा प्रक्रियामय आहे, जीवनही प्रक्रियामय आहे अग्निहोत्राद्वारे व व्याहृति होमाद्वारे, आपण सूर्य, अग्नि, वरुण व प्रजापति या मुख्य देवतांना वा प्रक्रिया-प्रमुखांना काही भौतिक वस्तू व प्रामाणिक भावना अपर्ण करतो व निसर्ग प्रक्रिया सुरळीत रहावी म्हणून प्रयत्न व कर्तव्य यांचा भाग उचलतो. विविध यज्ञांद्वारे हेच सर्व व्यापकपणे केले जाते. ऐन पावसाळ्यात पाऊस पडला नाही म्हणून यज्ञ आरंभ करणे म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणायला लागण्यासारखे आहे. यज्ञ ही अखंड प्रक्रिया आहे. आपणास सतत खालील गोष्टींचे भान ठेवणे अगत्याचे आहे.
१) निसर्गातील विविध साखळ्या व त्यांच्या रक्षणास हातभार.
२) 'जिवो जीवस्य जीवनम' म्हणजे जीवांच्या सहकार्याने जीव जगतात. या सहकार्यात मरण वा बलिदान ही बाबही येऊ शकते. आपण मात्र या पवित्र वाचनाचा अर्थ एकाने दुसर्‍यावर कुरघोडी करणे असा होतो.
३) प्रत्येकाचे वैश्विक कर्तव्य (स्वधर्मपालन).
४) जमीन, पाणी, अग्नि (अग्निचा दुरूपयोग) वायु व आकाश यातील प्रदूषण कमी करण्याविषयी भान.
जर या '' यज्ञ'' संकल्पनेचे महत्व शास्त्रज्ञ व वैज्ञानिकांना पटले जर या पवित्र बाबीची समज त्यांना आली तर प्रत्येक शास्त्रज्ञास ऋषि व्हावेसे वाटू लागेल. ऋषि होणे म्हणजे दाढी, मिशा वाढविणे नसून जीवन निर्मळ ठेवणे तसेच शोध कितीही लागत राहिले तरी जीवनपयोगी शोधच समाजापुढे प्रकट करणे होय. जो शास्त्रज्ञ ऋषि बनेल तो सत्तासंपत्तीधार्‍यांचा गुलाम होऊन राहणार नाही.

N/A

References : N/A
Last Updated : May 14, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP