याचा उल्लेख मागे दिलेल्या ज्ञानेश्वरीतील ओव्यात आलेला आहे. महानारायण उपनिषदही याबाबत विस्तृत माहिती देते. सर्वांना सोयीच्या, सुलभपणे करता येतील अशा दोन बाबी येतात -
१) सूर्योदय व सूर्यास्त समयी करावयाचे अग्निहोत्र
२) व्याहति होम व महामृत्युंजय हवन
या बाबत जास्त अचूक माहिती पू. श्री. कल्कि अवतार गजानन महाराज, अक्कलकोट, जि सोलापूर महाराष्ट्र यांनी सुरू केलेल्या Five Fold Mission यांच्या कार्यकर्त्यांकडे मिळू शकेल. या गोष्टी करण्यास सोप्या आहेत एवढेच मला सांगता येईल.
कल्क म्हणजे प्रदूषण व ते दूर करण्यासाठी एक सुलभ उपाय म्हणून गजानन महाराजांनी अग्निहोत्र विधिची पुन्हा स्थापना केली असे मी ऐकले आहे.
प्रदूषण निर्मूलनाबाब्त माझे मत असे आहे.
१. अग्निहोत्र या विधीचे जास्तीत जास्त अचूक शास्त्रीय प्रयोग करावेत. त्यात संशोधन, उपयुक्तता याबाबत आस्था असावी. सुलभता व उपयुक्तता सिद्ध झाल्यास स्वधर्मास पूर्णत्व येईल. गोरक्षण साधेल. गोवंश धर्मकारण व राजकारण यांच्यापासून निर्भय होईल. गवोपनिषद्सार या प्रसंगी मुद्दाम देत आहे.
॥ गवोपनिषद्सार ॥
वसिष्ठ ऋषि सांगतात -
. गायींच्या शरीरातून अनेक मनोरम सुगंध येत असतात.
. गायी समस्त प्राणीमात्रांचा आधार असून त्यांचे मंगल करणार्या आहेत.
. गायींना काही दिल्याने प्राप्त होणारे पुण्य कधीही नष्ट होत नाही.
. स्वाहाकार (देवयज्ञ) व वषट्कार (इन्द्रयाग) ही दोन्ही कर्मे गायीवर अवलंबून आहेत. यज्ञ गायींवर अवलंबून आहेत.
. गायीपासून मिळणारे पदार्थच प्रामुख्याने हवनासाठी वापरतात.
. गो दान अनेक प्रकारे पाप नाशक आहे. पुण्यदायक आहे.
. गायी असून अग्निहोत्र न करणे म्हणजे अर्घ्य सन्मानाला वंचित होणे होय.
. गोमूत्र व गोमेय यांची कधीही घृणा करू नये त्यावर थुंकू नये.
. गोमांस भक्षण कधीही करू नये.
. वाईट स्वप्ने पडत असल्यास गो माता स्मरण करावे.
. वासिष्ठ गोमातेस वंदन करून तिच्या कृपादृष्टीची प्रार्थना करतो.
============
२. अन्नग्रहण नियमितपणे व यज्ञभावनेने केले आणि तन-मन योगाभ्यास प्राणायम यांनी निरोगी ठेवले तर सहजच त्यांच्यातील प्रदूषण दूर होऊन गो म्हणजे इंद्रियांचे रक्षण होईल. गोमूत्र व स्वमूत्र या दोन शिवाम्बुंच्या वापरानेही शरीरातील प्रदूषण दूर होण्यास मदत मिळेल. अक्युप्रेशरनेही निरोगीपणात वाढ होईल. अशा रितीने देहधेनू सुखी होईल.
३. योग्य कामधंद्याच्या आधारे अर्थधेनु ही नेहमी सुदृढ ठेवायला हवी. यामुळे निराशा व त्रागा यांचे प्रदूषण कमी होईल.
४. प्राणायाम व ध्यान यांच्या आधाराने सुषूम्नारूपी आग्नि प्रज्वलित ठेवला तर योग्यसमयी कुंडलिनी कामधेनू प्रकट होईल.
५. जप यज्ञामुळे मानसिक प्रदूषण दूर होईल. मनशुद्धतेने प्राणशुद्धता होते. प्राणशुद्धतेने नाडीशुद्धता व देहशुद्धता लाभते. यांचा परिणाम म्हणून चित्त शुद्ध व स्थिर होऊ लागते. भगवंतही 'जप यज्ञोस्मि' असे म्हणून नामधेनुवर प्रेम करतात आणि नाम-नामी एकरूपता सांगतात.
६. वाहनांचा वापर शक्य असेल तेव्हा टाळल्यास प्रदूषण कमी होईल.
७. करमणुकीच्या साधनांचा अतिरेक आणि आकर्षण पण फसव्या जाहिरातींचा प्रभाव यामुळे मनात वाढणारे प्रदूषण या बाबत प्रत्येकाने जागरूकता व विवेक सतेज करावेत.
८. कर्मठपणाचा परंपरेचा, सांप्रदायचा, संस्थेचा, जातीचा, धनसंपत्तिचा, सत्तेचा, इत्यादि कठोरपणा, अभिमान, ताठा, दुरुपयोग, गर्व इ. हे प्रदूषण होय. या पुस्तकाचे अंगिकाराने हे प्रदूषण कमी होऊ शकेल.
९. वैयक्तिक, कौटुंबिक, परिसर, सार्वजनिक इ. यांचे बाबतीत स्वच्छता ठेवण्याचे भान व प्रशिक्षण सतत द्यायला हवे.
१०. व्यसने, लॉंटरी, लैगिंक-श्रृंगारिक प्रदर्शनवृत्ती, हावरटपणा, बेफिकिरी उद्यामपणा या सारख्या प्रदूषणांवरही सतत उपाययोजना करायला हवी.
११. शिक्षणखाते, गृहखाते, अर्थखाते, संरक्षणखाते, शेतकीखाते, इ. या क्षेत्रातील भ्रष्टाचारचे प्रदुषणही कमी करायला हवे.
स्वधर्म विस्मृति हेच सर्व भ्रष्टाचाराचे मूळ आहे.