॥ स्वधर्म कामधेनू ॥
प्रस्तुत ओव्या वाचत असताना साधक एका वेगळ्याच अनुभवानं भारला जातो.
म्हणौनि नैष्कर्म्य होआवें । तरी एथ ते न संभवे । आणि निषिध्द केवी राहटावे । विचारी पां ॥७७॥
म्हणौनि जें जें उचित । आणि अवसरें करूनि प्राप्त । ते कर्म हेतूरहित । आचरें तू ॥७८॥
पार्था आणिकही एक । नेणसी तू हें कवतिक । जें ऐसे कर्ममोचक । आपैसे असे ॥ ७९॥
दैखे अनुक्रमाधारे । स्वधर्मू जो आचरे । तो मोक्षू तेणे व्यापारे । निश्चित पावे ॥८०॥
स्वधर्मू जो बापा । तोचि नित्ययज्ञु जाण पां । म्हणौनि वर्तता तेथ पापा । संचारू नाही ॥८१॥
हा निजधर्म जै सांडे । आणि कुकर्मी रति घडे । तैचि बंधु पडे सांसारिक ॥८२॥
म्हणौनि स्वधर्मानुष्ठान । ते अखंड यज्ञ याजन । जो करी तया बंधन । कहीच न घडे ॥ ८३॥
हा लोकु कर्मे बांधला । जो परतंत्रा भूता झाला । तो नित्य यज्ञाते चुकला म्हणौनियां ॥८४॥
आता येचविशी पार्था । तुज सांगेन एक मी कथा । जै सृष्ट्यादि संस्था । ब्रह्मेने केली ॥८५॥
तै नित्ययागसहिते । सृजिली भूते समस्ते परि नेणतीचि यज्ञाते । सूक्ष्म म्हणौनि ॥८६॥
ते वेळी प्रजी विनविला ब्रह्मा । देवा काय आश्रयो एथ आम्हा । तंव म्हणे तो कमळ जन्मा । भूतांप्रति ॥८७॥
तुम्हा वर्णविशेषवशे । आम्ही हा स्वधर्मुचि ॥ विहिला असे । याते उपासा मग आपैसे । पुरती काम ॥८८॥
तुम्ही व्रते, नियमु न करावे । शरीराते न पीडावे । दुरी केंही न वचावे तिर्थासी गा ॥८९॥
योगादिके साधने । साकांक्ष आराधने मंत्रायंत्र विधाने । झणी करा ॥९०॥
देवतांतरा न भजावें । हें सर्वथा काही न करावें । तुम्ही स्वधर्मयज्ञी यजावें । अनायासे ॥९१॥
अहेतुके चित्ते । अनुष्ठा पां ययाते । पतिव्रता पर्ताते । जिथापरी ॥ ९२॥
तैसा स्वधर्मरूपमखु । हाचि सेव्यु तुम्हा ऐकू । ऐसे सत्यलोकनायकु । बोलता जाहला ॥९३॥
देखा स्वधर्माते भजाल । तरी कामधेनू हा होईल । मग प्रजाहो न संडील तुमते कदा ॥९४॥
जै येणेकरूनि समस्ता । परितोषू होईल देवता । मग ते तुम्हा ईप्सिता । अर्थाते देती ॥९५॥
या स्वधर्मपूजा पुजिता । देवतगणा समस्ता । योगक्षेमु निश्चिता । करिती तुमचा ॥९६॥
तुम्ही देवाते भजाल । देव तुम्हा तुष्टतील । ऐसी परस्परे घडेल । प्रीती जेथे ॥९७॥
तेथ तुम्ही जे करू म्हणाल । ते आपैसे सिद्धी जाईल । वांच्छितही पुरेल । मानसींचे ॥९८॥
वाचसिद्धि पावाल । आज्ञापक होआल । म्हणिये तुमते मागतील । महाऋध्दि ॥ ९९॥
जैसे ऋतुपतींचे द्वार । वनश्री निरंतर । वोळगे फळभार । लावण्येसी ॥१००॥
तैसे सर्व सुखेंसहित । दैवचि मूर्तिमंत । येईल देखा काढत । तुम्हांपाठी ॥१॥
ऐसे समस्त भोगभरित । होआल तुम्ही । अनार्त । जरी स्वधर्मेनिरत । वर्ताल बापा ॥२॥
कां जालिया सकळ संपदा । जो अनुसरेल इंद्रियमदा । लुब्ध होऊनिया स्वादा । विषयंचिया ॥३॥
तिही यज्ञभाविकी सुरी । जे हें संपत्ती दिधली पुरी । तया स्वधर्मी सर्वेश्वरी । न भजेल जो ॥४॥
अग्नीमुखि हवन । न करील देवता पूजन । प्राप्तवेळे भोजन, ब्राह्मणाचे ॥५॥
प्रमुख होईल गुरूभक्ती । आदर न करील अतिथि । संतोष नेदील ज्ञाती । आपुलीये ॥६॥
ऐसा स्वधर्मक्रियारहितु । आथिलेपणे प्रमत्तु । केवळ भोगासक्तु । होईल जो ॥७॥
तया मग अपावो थोर आहे जेणे ते हातींचे सकळ जाये । देखा प्राप्तही न लाहे । भोग भोगूं ॥८॥
जैसे गतायुषी शरीरी । चैतन्य वासु न करी । कां निदैवाच्या घरी । राहे लक्ष्मी ॥९॥
तैसा स्वधर्मु जरी लोपला । तरी सर्वसुखांचा थारा मोडला । जैसा दीपासवे हरपला । प्रकाश जाय ॥११०॥
तैसी नीजवृत्ती जेथ सांडे । तेथ स्वतंत्रे वस्ती न घडे । आइका प्रजाहो हे फुंडे । विरंचि म्हणे ॥११॥
म्हणौनि स्वधर्मू जो सांडील । तयाते काळु दंडील । चोरू म्हणौनि हरील । सर्वस्व तयांचे ॥१२॥
मग सकळ दोषू भंवते । गिंवसोनि घेति तयाते । रात्रसमयी स्मशानाते । भूते जेसी ॥१३॥
तैसी त्रिभुवनीची दु:खे । आणि नानाविधे पातके । दैन्यजात तितुके । तेथेंचि वसे ॥१४॥
ऐसे होय तया उन्मत्ता । मग न सुटे बापा रुदता । कल्पांतीही सर्वथा । प्राणिगणहो ॥१५॥
म्हणौनि नीजवृत्ती हे न सांडावी । इंद्रिये बरळो नेदावी । ऐसे प्रजाते शिकवी चतुराननु ॥१६॥
जैसे जळचरा जळ सांडे । अति तत्क्षणी मरण मांडे । हा स्वधर्म तेणे पाडे । विसंबो नये ॥१७॥
म्हणौनि तुम्ही समस्ती । आपुलालिया कर्मी उचिती । निरत व्हावे पुढत पुढती । म्हणिपत असे ॥१८॥
देखा विहित क्रियाविधी । निर्हेतुका बुद्धि । जो अस्तिये समृद्धी । विनियोगु करी ॥१९॥
गुरु, गोत्र, गो, अग्नि पूजी । अवसरी भजे द्विजी । निमित्तादिकी यजी । पितरोद्येशे ॥१२०॥
या यज्ञक्रिया उचिता । यज्ञेशी हवन करिता । हुताशेष स्वभावत: । उरे जें जें ॥२१॥
ते सुखे आपुले घरी । कुटुंबेसी भोजन करी । की भाग्यचि ते निवारी । क्ल्मषाते ॥ २२॥
ते यज्ञवशिष्ट भोगी । म्हणौनि सांडिजे तो अघीं । जायपरी महारोगी अमृतसिद्धी ॥२३॥
की तत्वनिष्ठु जैसा । नागवे भ्रांतिलेशा । तो शेषभोगी तैसा । नाकळेदोषा ॥२४॥
म्हणौनि स्वधर्मे जे अर्जे । ते स्वधर्मेचि विनियोगिजे । मग उरे ते भोगिजे संतोषेसी ॥२५॥
हे वाचूनि पार्था । राहाटों नये अन्यथा । ऐसी आद्य हे कथा । श्रीमुरारी सांगे ॥२६॥
जे देहचि आपणपें मानिती । आणि विषयांते भोग्य म्हणती । या परते न स्मरती । आणिक काही ॥२७॥
हे यज्ञोपकरण सकळ । नेणतसां ते बरळ । अहंबुद्धि केवल । भोगूंपाहती ॥२८॥
इंद्रियरुचिसारिखे । करविती पाक निके । ते पापिये पातके । सेविती जाण ॥२९॥
संपत्तिजात आघवे । हे हवनद्रव्य मानावे । मग स्वधर्मयज्ञे अर्पावे । आदिपुरुषी ॥१३०॥
हे सांडोनिया मूर्ख । आपणपें यालागीं देख । निपजविती पाक । नानाविध ॥३१॥
जिही यज्ञु सिद्धी जाये । परेशा तोषू होये । ते हे सामान्य अन्न न होये । म्हणौनिया ॥३२॥
हे न म्हणावे साधारण । अन्न ब्रह्मरूप जाण । जे जीवनहेतु कारण विश्वा यया ॥३३॥
अन्नास्तव भूते । प्ररोहे पावती समस्ते । मग पर्जन्यु या अन्नाते । सर्वत्र प्रसवे ॥३४॥
तया पर्जन्या यज्ञी जन्म । यज्ञाते प्रगटी कर्म । कर्मासे आदि ब्रह्म । वेदरूप ॥३५॥
तया वेदांते परात्पर । प्रसवतसे अक्षर । म्हणौनि हे चराचर । ब्रह्माब्धद ॥३६॥
परी कर्माचिये मूर्ति । यज्ञी अधिवासू श्रुति । ऐके सुभद्रापति अखंड गा ॥१३७॥
म्हणौनि ऐके पांडवा । हा स्वधर्म कवणे न सांडवा ।
सर्व भावे भजावा । हाचि एकु ॥१४३॥
जे स्वधर्मे निष्कामता । अनुसरले पार्था । ते कैवल्यपद तत्वता । पातले जगी ॥१५१॥
अगा आपुला हा स्वधर्म । आचरणी जरी विषमु ।
तरी पाहवा तो परिणामु । फळे जेणे ॥९२३ अ. १८ ॥
म्हणौनि करावा स्वधर्मू । जो करिता हिरोनि घे श्रमु ।
उचित देईल परमु । पुरुषार्थराजु ॥९४९ अ. १८॥
किती सुंदरतेने व विश्वासाने माऊलींनी सांगितले आहे. माऊली सांगतात की अक्षर म्हणजे ओम पासून बनवलेलं हे विश्व 'ब्रह्मबध्द' आहे म्हणजेच विश्वनियमावलीत बांधलेलं आहे. यासाठी आपल्या वर्णाप्रमाणे, राशीप्रमाणे स्वधर्म जाणून घेवून तो प्रेमाने निष्ठेने आचरला पाहिजे.
चार वर्णाचे चार मार्ग भिन्न असले तरी परिणामात भेद नाही असे माऊली सांगतात पसायदान मागतानाही माऊली या स्वधर्म कामधेनूची आठवण करून देतात व मोठ्या विश्वासाने सांगतात -
विश्व स्वधर्मसुर्ये पाहो ।
जो जे वांछील तो ते लाहो ।
इतके सामर्थ्य यात व्यक्त केलेले आहे तेव्हा मला वाटते की सर्वांनीच आता शंका दूर करून 'अवतरला मंगल उपदेशू' व 'स्वधर्म कामधेनू' यांना आपल्या हृदयात कायमचे स्थान देऊन त्याने होणार्या भाग्योदयाचा अनुभव घ्यावा, तरच 'ज्ञानदेवो सुखिया झाला' असे होईल.
मला वाटते की माऊली असे घडलेले प्रत्यक्ष बघण्यासाठीच संजीवन समाधी घेवून आळंदी येथे वाट पाहत आहेत.
या समाधीत माऊलींनी अजाणवृक्षाची (अजाण म्हणजे सर्व सांगूनही अडाणीपणा) मुळी लागून त्रास देत होती. ती परमश्रद्धेय संत एकनाथ महाराज यांनी काढली होती, म्हणजेच ज्ञानेश्वरीत घुसडलेला अजाण (अशुद्ध, अयोग्य) भाग काढून टाकला होता.
मी एकनाथ शिष्यच असल्याने, राहिलेला छोटासा पापुद्रा या पुस्तक रूपाने काढून ज्ञानेश्वरातील ही तेजस्वी, मंगलमय, श्रीकृष्णप्रिय स्वधर्मकामधेनू दाखवित आहे. यामुळे जी माऊली सेवा, नाथसेवा, गणोरेसेवा घडत आहे, त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो.
माऊलींना जी गुरुदक्षिणा अपेक्षित आहे ती याच ज्न्मात देता आली तर उत्तमच पण या घडलेल्या सेवेचेही माझ्या दृष्टीने फार मोल आहे. या पुस्तकाचे निमित्ताने मला व सर्वांनाच माऊलींचा जिव्हाळा लाभला आहे. आपले भाग्यच जणू उदयाला आले नाही का ?
कै. पू. गणोरे महाराजांनी जे सुंदर विश्लेषण ओम हा गुरू या पुस्तकाद्वारे मांडलेले आहे; त्याने स्वधर्म ही बाब समजण्यास सुलभ होते. भाग्योदय या एका पुस्तकाद्वारे स्वधर्म ही बाब सर्वांना समजावी या हेतूने त्यांच्या पुस्तकातील काही टिपणे या पुस्तकात देणे मला अगत्याचे वाटले. याबाबत परवानगी घेण्याचे मी ठरविले.
पूजनीय आईसाहेब श्रीमती सीतामाई श्रीराम गणोरे व हरिराम आश्रय मठ, भुकूम ता. मुळशी जि. पुणे महाराष्ट्र येथील कार्यकर्त्यांना दि. ५.१०.१९९५ रोजी सदर पुस्तकाचे हस्तलिखिताबरहुकूम वाचन करून दाखविले व परवानगी घेतली. सर्वांचा मी हार्दिक आभारी आहे. आईसाहेबांनी सर्व ऐकून झाल्यावर तोंड भरून आशीर्वाद दिले. त्यामुळे फार समाधान वाटले.
माऊलींची प्रेरणा, माझ्या माऊलीच्या स्मृतीस समर्पित व गणोरे माऊलीचा आशीर्वाद असा पवित्र त्रिवेणी संगम साधला गेला आहे.
स्वधर्म-कामधेनू त्रिवार वंदन.
N/A
References : N/A
Last Updated : May 14, 2023
TOP