आश्विन वद्य १४
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
नरकासुरास प्रायश्चित्त !
आश्विन व. १४ या दिवशीं श्रीकृष्णानें मदोन्मत्त अशा नरकासुराचा वध करुन ‘परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृताम्’ हें आपलें जीवितरहस्य सिद्ध केलें. नरकासुर हा प्राग्ज्योतिषपूरचा राजा असून फार दुष्ट होता. देव-दानव यांना अतिशय पीडा देऊन त्यांच्या सोळा हजार कन्या आणून यानें अलकानगरीनजीक असलेल्या मणिपर्वतावर ठेविल्या होत्या. परदेशीं गुलाम म्हणून त्यांना विकावें असा नीच उद्देश नरकासुराचा असावा. दु:खितांचा वाली श्रीकृष्ण यास ही हकीगत समजल्यावर त्यानें नरकासुराचा नाश करण्याचें ठरविलें. तो लागलींच सत्यभामेसह प्राग्ज्योतिषपुरास आला. आणि त्यानें कित्येक विरोधक दैत्यांस ठार केलें. निसुंद, हयग्रीव, विरुपाक्ष, आदि प्रतापी वीरांचे पारिपत्य केल्यानंतर पांचजन्य शंख वाजवून श्रीकृष्णानें नरकासुरास आव्हान दिलें. नरकासुरास फारच क्रोध आला, आणि लागलींच रथारुढ होऊन तो कृष्णावर चाल करुन आला. त्याचा रथ मोठा असून मौल्यवान् व विस्तृत होता. रथाला हजार घोडे जुंपलेले होते. त्याचें आणि श्रीकृष्णाचें तुमुल शिर उडविलें. त्यानंतर कृष्णानें त्या सोळा सहस्त्र बंदिवासिनी स्त्रियांना मुक्त केलें ! श्रीकृष्णाची ही कागगिरी अलौकिक अशी होती. स्त्रीदास्यविमोचक म्हणून त्याचा मोठाच महिमा आहे. मुक्त झालेल्या सोळा हजार स्त्रियांनीं आपल्याला मुक्त करणार्या श्रीकृष्णाला कृतज्ञतापूर्वक आपला धनीच मानिलें. पुढें कालांतरानें यांत विपरीत अर्थ भरण्यांत आला ! नरकासुराच्या वधामुळें जिकडे तिकडे आनंद झाला. शत्रूच्या रक्ताचा टिळा लावून श्रीकृष्ण घरीं येतांच त्यास मंगलस्नान घालण्यांत आलें. स्त्रियांनीं दिवे ओवाळून आपला संतोष व्यक्त केला. या विजयाचें स्मारक म्हणून आश्विन वद्य १४ हा दिवस सर्व भारतीय लोक नरकचतुर्दशी म्हणून साजरा करीत असतात.
N/A
References : N/A
Last Updated : September 30, 2018
TOP