आश्विन शुद्ध ४

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


शिंदे होळकरांचा लाखेरीचा संग्राम

शके १७१४ च्या आश्विन शु. ४ रोजी शिंदे-होळकर यांच्यांत येथें प्रचंड सामना होऊन होळकरांचा पराभव झाला. या सुमारास महादजी शिंदे पुण्यास येऊन दौलतीची व्यवस्था पाहण्यांत गुंतले होते. तेव्हां उत्तरेंत एक विपरीत प्रसंग घडून आला. महादजी पुण्यात आले त्यावेळीं त्यांनी सर्व कारभार गोपाळरावभाऊ, आबाजी रघुनाथ, जिवा बक्षी, आदींच्या ताब्यात दिला होता. याच वेळीं होळकरांच्या मनांत शिंद्याचा मोड करावा असे होतेंच. तुकोजी होळकर व त्यांचे मुलगे मल्हारराव आणि यशवंतराव यांच्या मनांत हा विचार फार दिवसांपासूनचा होता. त्याप्रमाणे होळकरांची तीस हजार फौज लाखेरीच्या खिंडीत तयार झाली असतां शिंद्याच्या वतीनें डी बाँयनने त्यांवर चाल केली. डी बाँयनजवळ हजारांचा पायदळ कंपू व तोफखाना होता. "खिंडीच्या टोंकावर ड्यू ड्रनेकच अड्तीस तोफा मोक्याचें स्थळ पकडून तयार होत्या. दोनहि उतरणीवर जंगल व खालील मैदान पावसानें अद्याप ओलें होतें. दोनहि प्रधान सेनापतींनी पाश्चात्य युद्धपद्धतीचा अवलंब केलेला. हिंदुस्थानच्या इतिहासात हा पहिला एतद्देशीय सामना होता.-" डी बाँयनच्या तोफा बैलांच्याकडून खिंडीत आणल्या जात असतांनाच त्याच्या दारुच्या कोठ्यांत होळकरांकडे ड्य़ू ड्रकेनचे गोळे येऊन पडले आणि मोठाच भडका उडाला. आणि होळकरांच्या सैन्याने जोराचा हल्ला केला. परंतु बाजूच्या झाडींत डी बाँयनर कसलेलें पायदळ व तोफखाना लपलेला होता, त्यांनी पुढे येऊन होळकरवर मोठाच हल्ला केला. त्यापुढें ड्य़ू ड्रनेकचे कांही चाललें नाहीं. या संग्रामात त्याचे पंधराशे लोक मात्र थोडक्या अवधींत कामास आले. डी बाँयनरच्या ताब्यांत खिंड येऊन होळकरांकडील अडतीस तोफा त्यास मिळाल्या. लढाईत विजय मिळाला म्हणून शिंद्यांनी मोठाच उत्सव केला. डी बाँयनर लिहितो : "मी सिंद्याकरिता अनेक रणसंग्राम केले, पण लाखेरीस निकराचा व अत्यंत चितेचा असा दुसरा कोणताच संग्राम झाला नाहीं."
- २० सप्टेंबर १७९२

N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP