आश्विन वद्य ११
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
खडकी येथील इंग्रज-मराठे युद्ध !
शके १७३९ च्या आश्विन व. ११ रोजीं दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रज यांच्यात प्रसिद्ध अशी खडकीची लढाई झाली. याच काळांत पुण्याच्या पेशवाईस ग्रहण लागलें होतें. बाजीरावाच्या नाकर्तेपणामुळें आणि इतरत्र वाढत असलेल्या फंदफितुरीमुळें मराठी राज्य उतरत्या अवस्थेस लागलेलें होतें. बाजीराव इंग्रजांच्या ताब्यांत गेलाच होता. परंतु, धूर्त इंग्रजांचा कावेबाजपणा त्याला पटूं लागल्यावर बाजीरावानें इंग्रजांशी युद्ध करण्याची तयारी जोरांत चालू केली. "पुण्यांत तमाम सरदार जमा झाले. निपाणकर, भोंसले, निंबाळकर, घोरपडे, जाधव, पटवर्धन, पुरंदरे, मिळून फौज एकत्र झाली. लाख सवा लाख घोडे मिळाले. " या सर्व सैन्याचे आधिपत्य बापू गोखले यांच्याकडे होतें. इंग्रजांची तयारी जोरांत होती. आश्विन व. ११ रोजीं मराठ्यांच्या लष्करानें खडकीच्या इंग्रजी लष्करावर मारा केला. या वेळी बाजीरावसाहेब बायकामुलांसह पर्वतीस जाऊन तेथील खिडकींतून लढाई पहात बसले ! मराठी लष्कर बाहेर पडलें. तों जरिपटक्याची काठी मोडून अपशकुनच झाला. "दिवस पांच घटका राहिला, तेव्हां यांची त्यांची लढाई अंधार पडेपर्यंत चालली. इंग्रज आपले ठिकाणीं शिकस्त झाले. दोन्हीकडील मिळून दोन हजार माणूस कामास आले." इंग्रजी फौजेची फळी फोडून आंत घुसत असतांना बापू गोखल्यांच्या घोड्यास जखमा झाल्यामुळे त्यास मागें फिरावें लागलें. याप्रमाणें मराठ्यांचा इंग्रजांवरील या पहिल्या हल्ल्याचा कांही उपयोग झाला नाहीं. दुसर्या दिवशी लढाई झालीच नाहीं. कारण बाजीरावाचें धोरण पडखाऊ होतें. पहिल्याच दिवशीं युद्ध सुर झाल्यावर, " इंग्रजांचे बोलणें श्रीमंतांकडे आलें कीं, एल्फिन्स्टनसाहेब घाबरले. त्यावरुन श्रीमंतांची बोलावणी बापू गोखले यास गेलीं. परंतु बापू गोखले माघारीं न फिरत. त्यांचा लढाईचा आग्रह मोठा. खावंदांचे मनांत इंग्रज मोडावयाचा नाहीं. शेवटीं निदान श्रीमंतांनीं सांगून पाठविलें तेव्हां गोखले शह सोडून माघारें आले. "
५ नोव्हेंबर १८१७
N/A
References : N/A
Last Updated : September 30, 2018
TOP