आश्विन शुद्ध १३
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
बाळाजी आवजींचा सन्मान !
शके १५९५ च्या अश्विन शु. १३ रोजीं श्रीशिवाजीमहाराज यांनी आपला दूरदर्शी आणि चाणाक्ष सेवक बाळाजी आवजी चिटणीस यांना पालखी देऊन त्यांचा सन्मान केला. यांचे घराणें जंजिर्याकडील होय. आवजी हरि चित्र मुजूमदार हे एक प्रभू इसम जंजिर्याच्या सिद्दीजवळ दिवाण होते. परंतु सिद्दीची कांहीं कारणांवरुन यांच्यावर गैरमर्जी होऊन त्यानें हुकूम केला कीं, आवजी हरींना पोत्यांत घालून समुद्रांत टाकावें किंवा गुलाम म्हणून तरी विकावें. आवजीची पत्नी गुलबाई ही मोठी धूर्त होती. तिनें अधिकार्यांचे मन वळविलें. आणि नंतर हें दांपत्य राजापुरास येऊन राहिलें. बाळाजी हा आवजीपंतांचा वडील मुलगा होता. बाळाजीचा मामा विसाजी यानें बाळाजीचें व त्याच्या दोन भावंडांचे शिक्षण उत्तम प्रकारें केलें. हबशी सरकारची भीति या कुटुंबास अजूनहि होतीच. याच वेळीं शिवाजी नांवाचा कोणी पराक्रमी पुरुष महाराष्ट्रांतील पुणें प्रांती अवतरला आहे. तो हिंदूंचा वाली आहे, इत्यादि हकीगत बाळाजीस समजल्यावर त्यास अत्यंत आनंद झाला. लागलीच त्यानें आपल्या दैन्यावस्थेचें एक पत्र शिवरायांना लिहिलें. पुढें शिवाजीनें राजापुराची मोहीम काढली; व त्यावेळीं बाळाजीचें लेखन कौशल्य त्याच्या ध्यानांत होतेंच. शिवाजीनें बाळाजीस आणि त्याच्या सर्व कुटुंबास आश्रय दिला. आणि बाळाजीची हुशारी पाहून त्याला स्वत:च्या चिटणिसाचें काम दिलें. बाळाजीवर पुढें राजकीय द्प्तराची मुख्य जबाबदारी आली होती. तरी नाजूक वकिलातीचींहि कामें तो सफाईनें पार पाडीत असे. याची लेखनशैली अत्यंत साधी, स्पष्ट व पूर्ण असे. राज्याभिषेकाच्या वेळीं भोसले कुलाची पूर्वपीठिका आणण्याचें काम याच स्वामिनिष्ठ इसमानें केलें. याची बुद्धिमत्ता व स्मरनशक्ति अत्यंत तीव्र होती. परंतु खेदाची गोष्ट ही कीं, या चाणाक्ष माणसाचा उपयोग संभाजी राजांना करुन घेतां आला नाहीं. आपल्याविरुद्ध होणार्या कारस्थानाबद्दल क्रोधायमान होऊन संभाजीनें सन १६८१ च्या आँगस्ट महिन्यांत बाळाजी आवजी याला परळीखालीं कैद करुन मारिलें.
- १३ आँक्टोबर १६७३
N/A
References : N/A
Last Updated : September 29, 2018
TOP