आश्विन वद्य ९
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
इंग्रज-मराठ्यांचें दुसरें नाविक युद्ध !
शके १६०१ च्या आश्विन व. ९ रोजीं इंग्रज-मराठे यांचे दुसरें नाविक युद्ध झालें. जंजिर्याचा सिद्दी समुद्रकिनार्यावर राहून फारच मग्रूर झालेला होता. शिवाजीच्या राज्यांतील लोकांचा धार्मिक छळ त्याच्याकडून अतोनात होत असे. त्यामुळें त्याच्या समाचार घेणें हें शिवरायांचें कर्तव्यच होतें. परंतु कधीं कधीं या सिद्दीला इंग्रजांकडून मदत होत राही, त्यामुळें इंग्रजाबरोबरहि युद्धप्रसंग करण्याशिवाय शिवाजीपुढें मार्ग नव्हता. शके १६०१ च्या पावसाळ्यांत स्वारी करुन शिवाजीनें खांदेरी बेटावरील किल्ला घेतला. त्यामुळें इंग्रजांना फारच वैषम्य वाटलें. पोर्तुगीझ लोकांनीं मुंबईबरोबरच हीं बेटे आपणांस दिलीं आहेत असा दावा इंग्रजांचा होता. ताबडतोब इंग्रजांनीं सिद्दीशीं सख्य केलें आणि खांदेरीस शिवाजीचें आरमार होतें त्यावर त्यांनीं हल्ला केला. शिवरायांच्या सैनिकांनी सर्व शत्रूला शांतपणे बेटावर येऊं दिलें आणि मग सर्वांचा नि:पात केला. त्यानंतर इंग्रज लोक जास्तच खवळले; आणि त्यांनीं ‘रिव्हेंज’ नांवाचें पंधरा तोफांचें जहाज दोनशें सैनिकांसह खांदेरी बेटावर पाठविलें. कँप्टन मिंचिन व केग्विन हे दोघे जहाजावरील प्रमुख होते. इंग्रज आणि मराठे यांच्यांत निकराचें युद्ध होऊन दोहोंकडील प्राणहानी बरीच झाली. परंतु खांदेरी बेट मात्र इंग्रजांस मिळालें नाहीं. त्यामुळें त्यांना मनस्वी दु:ख वाटलें. शिवाजीशीं पुन्हा युद्ध करुन हें बेट घ्यावें म्हणून त्यांनी कोर्ट आँफ डायरेक्टराकडे अनेकवार तक्रारी केल्या. परंतु कोर्टाकडून तशी परवानगी मिळाली नाहीं. अत्यंत निराशेच्या मन:स्थितींत इंग्रजांनीं विलायतेंत लिहून पाठविलें. "येथील लोक आम्हांस हिणवतात कीं, तुम्ही इंग्रज लोक येवढी बढाई कशास मारता ? तुम्ही कोणते विजय संपादिले आहेत ? तुमच्या तरवारीनें कोणतें महत्कृत्य केलें आहे ? तुमचा हुकूम कोणीं मानला आहे ? .....तुमची सर्व लोक टर उडवितात. मुंबई तरी तुम्हीं जिंकून थोडीच घेतली आहे ? व ती तरी राखण्याचें सामर्थ्य तुमच्यांत कोठें आहे ? असें असून तुम्ही उगाचच डौल मारतां व आमच्या राजांची बरोबरी करतां की काय म्हणून ? -"
- १८ आक्टोबर १६७९
N/A
References : N/A
Last Updated : September 30, 2018
TOP