आश्विन वद्य १
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
बालमुकुदांना फाशी !
शके १८३६ च्या आश्विन व. १ रोजीं पंजाबमधील क्रांतिकारकांनी केलेल्या दिल्ली-कटाच्या खटल्याचा निकाल लागून अमीरचंद, अवध बिहारी, बालमुकुंद प्रभृतींना फांशीची शिक्षा सुनावण्यांत आली. पंजाबमधील आधुनिक इतिहासांतील हा अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग आहे. बालमुकुंद हे भाई परमानंदांचे चुलत भाऊ. औरंगजेब बादशहानें त्यांचे पूर्वज भाई मतिदास यांना करवतीनें कापून परलोकास पाठविलें होतें ! त्याच ठिकाणीं भाई बालमुकुंद हे फांसावर चढले. या क्रांतिकारकांनी मोठेंच धाडस केलेलें होतें. लाँर्ड हार्डिंज हे त्या वेळीं व्हाइसराँय होते, मोठ्या थाटामाटात दिल्ली राजधानींत प्रवेश करण्याची योजना सिद्ध झालेली होती. राजरस्त्यांतून मिरवणूक अति थाटानें निघालेली होती, तों एकदम एक मोठा स्फोट झाला. आणि एक भयंकर बाँब व्हाइसराँय हार्डिज यांच्या अंगावर येऊन पडला. त्यांच्या अंगांतून रक्ताच्या धारा वाहूं लागल्या. माहूत तर जागच्या जागीं ठार झाला. धावपळ सुरु झाली. मिरवणूक उधळली गेली. आणि गुन्हेगाराला शोधण्याच्या धडपडी सुरु झाल्या. अनेक तरुणांना पकडण्यांत आलें, त्यांत बालमुकुंद, अमीरचंद, आदि प्रमुख होते. बालमुकुंदांनींच बाँब फेकला होता. हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळावें, भारतमातेच्या पायांतील शृंखला तुटून जाव्यात, या ध्येयासाठीं अनेक देशभक्तांनीं अनेक प्रकारांनीं प्रयत्न केले त्यांत क्रांतिकारकांचा मार्ग विशेष प्रकारानें नांवारुपास आला आहे. दुसर्या कोणत्याहि सनदशीर मार्गाचा उपयोग होत नाहीं, असें ठरल्यामुळें त्यांना हा हिंसामय क्रांतीचा वा दहशतवादाचा मार्ग स्वीकारावा लागला. या मार्गांतील धोके आणि संकटें यांची जाणीव त्यांना होतीच. परंतु क्रांतिकारकांनीं कशाचीच पर्वा न करतां एके काळीं सबंध हिंदुस्थान आणि इंग्रज सरकार हादरुन सोडिलें होतें. बालमुकुंदांच्या मृत्यूनंतर त्यांची नवविवाहित पत्नी पंधरा दिवसांतच त्यांना भेटावयास गेली. त्यांच्या पत्नीचें नांव रामरखी उर्फ लज्जावती असें होतें. तिनें अन्नपाणी न घेतां स्वेच्छेनें मृत्यूला कवटाळलें !
- ५ आँक्टोबर १९१४
N/A
References : N/A
Last Updated : September 29, 2018
TOP