दुर्गादेवीचें स्वागत !
आश्विन शु. ८ हा दिवस भारतांत दुर्गा अष्टमी म्हणून पाळण्यांत येतो. जगांत जेव्हां आसुरी संपत्ति प्रबळ होते तेव्हां आदिशक्ति देवीरुपानें अवतीर्ण होऊन असुरांचा संहार करते, असा भारतीय जनेचा विश्वास आहे. या विश्वव्यापक आदिमायेनें अनेक अवतार घेतले असल्यामुळें तिला अनेक नांवे प्राप्त झालीं आहेत. महिष नांवाचा अस्रुराचा वध करणारी महिषासुरमर्दिनी, चण्डमुण्ड राक्षसांना
मारणारी चामुंडा, दुर्गम नांवाच्या दैत्यांना मारणारी दुर्गा, इत्यादि देवीचीं रुपें दिसून येतात. याच देवीची महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशीं तीन स्वरुपें आहेत. भारतीयांची अशी श्रद्धा आहे कीं, याच आदिमायेनें मत्स्यकूर्मादि दशावतार घेतले, रामरुपानें रावण-कुंभकर्णास मारलें, कृष्णरुपानें कंसशिशुपालादिकांचा नाश केला. बिभीषण, मारुति, अर्जुन या वीरभक्तांच्या अंगांत हिनेंच प्रवेश केला. व्यक्तींत किंवा समाजांत दुर्गुण व दुर्व्यसनें संचरलीं, कामक्रोधादिकांचें बंड माजलें म्हणजे हीच अव्यक्तांतून प्रकट होऊन दुष्टदमन व सुष्टसंरक्षण करते. ही परमेश्वरी शक्तिच विश्वासा उद्धार करते. महाराष्ट्रांत ही माहूर,सप्तशृंगी, तुळजापूर, औंध, कोल्हापूर या ठिकाणीं प्रकट झाली असून महाराष्ट्राची ती कुलदेवता आहे. निंबाळकर, भोसलें ही प्राचीन क्षत्रिय घराणीं भवानीच्या उपासकांची आहेत. याच ‘जगदात्मा जगदीश्वरी’ ला, ‘रामवरदायिनी माते’ ला समर्थांनीं शिवरायासाठीं प्रार्थना केली होती -
- "येकची मागणें आतां, द्यावें तें मजकारणें ।
तुझा तूं वाढवी राजा, शीघ्र आम्हांचि देखता ॥"
आणि या देवीचें स्वरुप त्यांनीं असें वर्णन केलें आहे:-
"प्रसन्नमुख सुंदरा । तुझेनि हे वसुंधरा ॥
तुझेंच नांवरुप हो । दिसे तुझें स्वरुप हो ॥
तुझेनि सर्व बोलणें । तुझेनि सर्व चालणें ॥
तुझेनि योगधारणें । तुझेनि राजकारणें ॥"