आश्विन वद्य ५
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
टिपूविरुद्ध इंग्रज व मराठे !
शके १७२० च्या आश्विन व. ५ रोजीं टिपू सुलतानाविरुद्ध लढाई करण्याच्या धोरणासंबंधीं वाटाघाटी करण्यासाठीं मराठ्यांच्या पुणें दरबारी इंग्रजी रेसिडेंट कर्नल पामर हा येऊन दाखल झाला. निजाम, मराठे, टिपू या सर्वांनाच बुडवावें हा हेतु इंग्रजांचा होता. परंतु, त्यांच्याविरुद्ध टिपूनें जंगी मोहीम काढली होती; आणि हिंदुस्थानांतील फ्रेंच सत्ता वाढीस लागते कीं काय याची धास्ती इंग्रजांना होतीच. गव्हर्नर जनरल वेलस्ली हिंदुस्थानाम्त आला त्याच वेळीं निजामाकडील फ्रेंच अधिकारी रेमंड मृत्यु पावला, आणि इंग्रजांचें काम सोपें झालें. लागलीच निजामशीं नवा करार होऊन त्याच्या पदरीं इंग्रजी तैनाती फौज राहुं लागली. आतां मराठ्यांच्या राज्याकडे लक्ष देऊन बाजीरावाच्या पदरींहि ही फौज ठेवावी अशी इच्छा इंग्रजांची होती. टिपूविरुद्ध इंग्रज प्रथमपासूनच जोराच्या तयारींत होते. यासंबंधीं वाटाघाटी करुन मराठ्यांच्या मदतीची निश्चिति करण्यासाठी कर्नल पामर नाना फडणिसांकडे आले आणि बोलले, "टिपूच्या मसलतप्रकरणी तीन महिने श्रीमंतांशीं बोलत आहोंत. घरचे गोंधळामुळें आपणांकडून निर्णय होत नाहीं. टिपूस फरासीस सामील झाल्यावर, मसलत भारी पडेल याचा विचार काय ?" त्यावर नानांनी उत्तर केलें "तिन्ही सरकारानीं मिळून टिपूस पत्र लिहून उत्तर काय येतें; त्याची वाट पहावी. " यानंतर कर्नलांचे म्हणणें असें पडलें कीं, टिपूस जनरलांनी लिहिलें, उत्तर येत नाहीं; तेव्हां सर्वांनी तयारीस लागावें हे उत्तम. समर्पक उत्तर न आल्यास, मग तयारीस लागणें ठीक नाहीं. याशिवाय पामरची दुसरी तक्रार महत्त्वाची आहे. तो म्हणाला, "शिंदे यांच्या पलटणींत फरासीस बहुत आहेत; त्यांत ते हिंदुस्थानांत दूर असते तर चिंता नव्हती. याच कारणास्तव निजामांनीहि आपले फ्रेंच अधिकारी जवळ असलेले काढून टाकले. टिपूशीं लढाई झाल्यास हे फ्रेंच अधिकारी कामाचे नाहींत." यानंतर पामरनें बाजीरावाची भेट घेतली तेव्हां त्यानें सांगितलें, "टिपूवर आम्ही पंचवीस हजार फौज रवाना करतों. "
- २८ आँक्टोबर १७९८
N/A
References : N/A
Last Updated : September 29, 2018
TOP