आश्विन शुद्ध १२
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
दामोदरपंत चाफेकरांचा जबाब !
शके १८१९ च्या आश्विन शु. १२ रोजीं जुलमी इंग्रज अधिकारी रँण्ड यांचा खून करणारे दामोदरपंत चाफेकर यांनीं प्रेसिडन्सी मँजिस्ट्रेट मि. हँमिल्टन यांचेपुढें अत्यंत विस्तृत आणि विलक्षण अशी जबानी दिली. गुन्हेगाराचा तपास इंग्रज सरकार मोठ्या नेकींने करीत होतें. पुण्याच्या ब्राह्मणांविरुद्ध सरकारचा फारच रोष होता. परंतु सप्टेंबरच्या महिन्यांत द्रविडबंधूंच्या मार्फत चाफेकर बंधूंची नांवें पोलिसांना समजलीं; आणि पहिल्यानें दामोदरपंत चाफेकर यांस अटक झाली. आश्विन शु. १२ रोजीं झालेल्या जबानींत त्यांनी सांगितलें, "वासुदेवराव पटवर्धन, दामुअण्णा कुलकर्णी वगैरे सुधारक यांना आणि थोरात, वेलिणकर, वगैरे धर्मांतर केलेल्या हिंदूंना मीच ठोक दिला. मुंबईतील राणीच्या पुतळ्यावर मीच डांबर ओतले व पुतळ्याच्या गळ्य़ांत जोड्यांची माळ मींच घातली; युनिव्हर्सिटीचा मंडप मींच जाळला. पुण्यांत प्लेगच्या अमदानींत सोजीर लोकांनीं केलेले अत्याचार पाहून मला त्वेष आला व त्यांचा मुख्य अधिकारी रँडसाहेब याला मारुन सूड उगविण्याचा मीं निश्चय केला. बंदुकी अमुक ठिकाणाहून चोरल्या, दारुगोळा अमुक ठिकाणीं मिळवला, पिस्तुलें व तरवारी अमुक ठिकाणाहून घेतल्या, रँडसाहेबाला मारण्याचे प्रयत्न कसे फसले, शेवटीं जुबिलीच्या दिवशीं दिवसभर ईश्वरप्रार्थना करुन व हत्यारें बरोबर घेऊन मी व माझा भाऊ बाळकृष्ण असे गणेशखिंड रस्त्यावर गेलों. मीं रँडसाहेबाला गोळी घातली व बाळकृष्णानें ले. आयर्स्ट याला मारिलें. हत्यारें नाल्यांतील पुलाखालीं छपवून ठेवून आह्मी कालव्याच्या रस्त्यानें परत आलों; दुसरे दिवशीं लोंढे यांच्या विहिरींत हत्यारें टाकून देऊंन ता. २४ जून रोजी मुंबईस निघून आलों व फिरुन कीर्तनें करुं लागलों; पुढें टिळकांच्यावर खटला झाला; नातूंना पकडलें, इतरांना त्रास झाला म्हणून मी पोलिसांच्या स्वाधीन झालों." थोड्याच दिवसांनंतर खटल्याचा निकाल लागला आणि दामोदरपंतांना फांशीची शिक्षा झाली; आणि ती त्यांनीं अत्यंत समाधानानें स्वीकारली.
- ८ आक्टोबर १८९७
N/A
References : N/A
Last Updated : September 29, 2018
TOP