आश्विन शुद्ध ६

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


कुंजपुर्‍याचें वस्त्रहरण !

शके १६८२ च्या आश्विन शु. ६ रोजीं मराठ्यांचा फौजेनें कुंजपुरा या महत्त्वाच्या ठिकाणावर चाल केली. मराठ्यांच्या इतिहासात हे पानिपतचें प्रकरण मोठें रोमहर्षक आहे. सदाशिवरावभाऊंनीं दिल्ली काबीज केलीच होती. आतां अब्दालीचें पारिपत्य करणें याकडे सर्वांचे लक्ष लागलें. कुंजपुरा हें स्थळ फार मजबूत व नाकेबंदीचें असें होतें. तेथें समदखान नांवाचा अब्दालीचा सरदार पांच हजार फौजेनिशी तयार होता. मराठ्यांना आपण अंगावर घ्यावें, पळ काढण्याचें नाटक करावें, व मागून अब्दालीनें अचानकपणे मराठ्यांवर हल्ला करावा अशी समदखानची योजना होती. ती हाणून पाडण्याची कामगिरी जनकोची शिंदे व बळवंतराव मेहेंदळे यांनी स्वीकारली आणि आश्विन शु. ६ ला कुंजपुर्‍यावर हल्ला केला. सदाशिवरावभाऊ मध्यें असून मागें तोफखाना व पिछाडीस दमाजी गायकवाड होते. मराठ्यांच्या फौजेचे आक्रमण पाहून अब्दाली गडबडला. मराठ्यांनीं मोठ्या निकरानें संग्राम केला. शिंदे दत्ताजीच्या मरणाचा सूड घेण्याच्या विचारांत होते. दमाजी गायकवाड यांनी मोठ्या शौर्यानिशीं तोफांनी पडलेल्या भगदाडांतून घोडे घातले. लागलीच शहर व किल्ला मराठ्यांच्या हातांत आला. हातीं आलेल्या शत्रूस मराठे सहसा दुखवीत नसत. परंतु या वेळीमं मात्र सदाशिवरावभाऊ सूडाने संतप्त झाले होते. इतर कोणाचेंहि न ऐकतां केवळ शत्रूला दहशत बसावी म्हणून त्यांनी कुत्बशहा व समदखान यांना ठार केलें. " उपरांत कुंजपुर्‍याचें वस्त्रहरण केलें. लूटहि बेमुबलक सांपडली, कामाठी व बेलदार लावून कुंजपुर्‍याचा किल्ला व शहर पुन्हां ढांसळून टाकिला. सर्वांना यशप्राप्तीचा संतोष झाला. कुंजपुर्‍यावर पांचसात हजार फौज व पांचसात हजार प्यादा लुटला. त्यामुळें अब्दालीचे लष्करांत दहशत पडली. कित्येक लोक उठून जातात - " अशी परिस्थिति निर्माण झाली. या वेळीं लुटींत घडलेली महत्त्वाची घटना म्हणजे शिंद्यांच हत्ती जव्हेरगज आठदहा महिन्यांपूर्वी पाडाव करुन नेला होता तो शिंदे यांना परत मिळाला.
- १५ आक्टोबर १७६०

N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP