आश्विन शुद्ध १४

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


"इथुनि आतां प्रारंभ .... प्रळयाला"

शके १७१७ च्या आश्विन शु. १४ ला मराठ्यांचे दुर्दैवी पेशवे सवाई माधवराव यांचे निधन झालें; आणि त्याबरोबरच मराठेशाहीचें भाग्य संपले ! सवाई माधवराव पेशवे म्हणजे महाराष्ट्राचा आत्मा होता. यांच्या कारकीर्दीत इंग्रजांशी युद्ध, टिपूवरील मोहिमा, महादजी शिंद्यांचे दिल्लीकडील पराक्रम खर्ड्याचा अपूर्व विजय, अशा श्रेणीनें मराठ्यांचे भाग्य चढत्या क्रमांत होतें आणि या वैभवाच्या समयीं सवाईअ माधवरावांचा हृदयद्रावक रीतीनें अंत झाला. रघुनाथरावांचे पुत्र बाजीराव यांजवर माधवरावाचा लोभ होता. या बाबतीत त्यांचा आणि नाना फडणिसांचा मतभेद होऊ लागला. तरूण पेशव्याचा मनस्ताप वाढत गेला. मनाच्या या खिन्न स्थितींतच माधवरावास गणेश चतुर्थीपासून ताप येऊं लागला; प्रकृति क्षीण झाली. विजयादशमीच्या दिवशीं अभ्यंगस्नान, फौजांची सलामी, दरबार, भेटी, इत्यादि गोष्टी करतांना श्रीमंत थकून गेले. "द्वादशीचे दिवशीं श्रीमंतांस ज्वराशांत वायु झाला. प्रात:काळी शनिवारवाड्यातील गणपतीचें दिवाणखान्यांत निद्रेचे स्थान आहे, तेथे गेले. पलंगावर बसले होते. मनास काय वाटलें न कळे, पलंगावरुन उठून दक्षिणेकडील खिडकींत उभे राहिले. खिजमतगार यांनी शालेस हात लाविला कीं, येथें उभे राहणें ठीक नाहीं. तों एकाएकीं तेथून उडी टाकिली. खालीं दीड भाला खोल कारंजी हौद आहे, तेथें काठांवर पडून आंत पडले. उजवी मांडी मोडून हाडा बाहेर निघालें. दातांची कवळी पडली, तेथून उचलून नानांनी ऐने महालांत नेलें. तबीब आणून हाड बसवून, टाके देऊन, शेक केला, कांही वेळ भ्रंश होऊन बोलत." याच अवस्थेंत आश्विन शुद्ध १४ ला श्रीमंत कैलासवासी झाले ! सवाई माधवरावांच्या मृत्यूनें महाराष्ट्रलक्ष्मी फिकी पडली ! आणि महाराष्ट्राचें भवितव्य शाहिरांनीं ठरविलें कीं, -
" रवि मावळतां वरी मरण झडकरी आलें सखयाला ।
इथुनि आतां प्रारंभ दिसंदिस अद्‍भुत प्रळयाला -"

- २७ आँक्टोबर १७९५

N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP