आश्विन वद्य ३
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
श्रीपंतमहाराज यांची समाधि !
शके १८२७ च्या आश्विन व. ३ रोजीं बेळगांवशेजारील बाळेकुंद्री येथील प्रसिद्ध सत्पुरुष श्रीपंतमहाराज यांनी समाधि घेतली. रामचंद्रपंत आणि गोदूबाई (सीताबाई) या सत्त्वशील दांपत्याच्या पोटीं शके १७७७ च्या श्रावण व. ८ रोजीं श्रीपंतमहाराज यांचा जन्म झाला. यांनी आपला प्राथमिक विद्याभ्यास आपल्या आजोळींच केला. त्यानंतर बेळगांव येथें इंग्रजी शिक्षण संपूर्ण केल्यावर तेथील एका इंग्रजी शाळेंत हे शिक्षक म्हणून काम करुं लागले. आरंभीपासूनच याचें लक्ष नीतिमत्ता, नियमितपणा व सद्वर्तन यांकडे असे. पंताच्या पितृकुलांतील सर्वंच माणसें सत्यप्रतिज्ञ, ईश्वरनिष्ठ व अढळ अशा सात्विक धैर्याची होतीं. या सर्वांची दत्तावर अत्यंत निष्ठा असे. दड्डी या आजोळच्या गांवी निसर्गाचें सौंदर्य अनुपम असल्यामुळें श्रीपंताना एकांतवासाची आवड लहानपणापासूनच लागली. पारमार्थिक विषयांचें चिंतन आणि तत्त्वविवेचनाची हौस यामुळें त्यांची मानसिक भूमिका फारच उंच झाली. बाळेकुंद्रीजवळील कर्डीगुद्दीच्या डोंगरांत वास्तव्यास राहिलेल्या एका शुद्धद्वैत, मार्गाच्या महायोग्यानें शके १७९७ मध्यें श्रीपंतांना अनुग्रह केला. त्यानंतर पंतांनीं कांही दिवस योगाचा अभ्यास केला. त्यांना मराठी, कानडी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत, आदि भाषा चांगल्याच अवगत होत्या. आध्यात्मिक ग्रंथांच्या परिशीलनांत व वेदान्तचर्चा करण्यांत यांचा बराचसा काळ जाऊं लागल्यावर शेकडों शास्त्री, पंडित यांच्याभोवतीं जमूं लागले. यांचा शिष्यसमुदायहि बर्याच मोठ्या प्रमाणावर जमला. पंतांची राहणी अत्यंत साधी असून ते प्रेमळ व नि:स्पृह होते. त्यानीं आपल्या प्रेमानें व सौजन्यानें संसार आनंदमय बनवून आपले अवतारकार्य वयाच्या ५१ व्या वर्षी, म्हणजे आश्विन व. ३, शके १८२७ या दिवशीं संपविलें. बेळगांवीं यांचें निधन झाल्यावर यांच्या हजारो शिष्यांनीं मोठ्या समारंभानें यांचा देह बाळेकुंद्री येथे नेला; व त्यांच्या आंबराईत त्याला अग्निनारायणाच्या स्वाधीन करुन त्या ठिकाणीं एक औदुंबर वृक्ष लाविला. या ठिकाणीं यांच्या भक्तांकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर यांचा उत्सव होत असतो.
- १६ आँक्टोबर १९०५
N/A
References : N/A
Last Updated : September 29, 2018
TOP