आश्विन वद्य १३

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


मुंबईचा ‘सिंह’ गेला !

शके १८३७ च्या आश्विन व. १३ रोजीं ‘मुंबईचे सिंह’ या नांवानें प्रसिद्धीस पावलेले तदफदार हिंदी पुढारी व राष्ट्रसभेचे अध्यक्ष सर फिरोजशहा मेरबानजी मेथा यांचें निधन झालें. एम.ए. झाल्यानंतर बँरिस्टर होण्यासाठीं हे इंग्लंडला गेले. तेथें जमशेटची टाटा, बद्रुद्दिन तय्यबजी, उमेशचंद्र बानर्जी, इत्यादि त्यांचे मित्र होते. दादाभाई नवरोजींच्या सहवासाचा फिरोजशहांना फारच उपयोग झाला. सन १८६८ मध्ये बँरिस्टर झाल्यावर हे मायभूमीस येऊन मुंबईला आपला जम बनवूं लागले. लौकरच यांची कीर्ति वाढली. मुंबई काँर्पोरेशनमध्यें केलेल्या चाळीस वर्षांच्या कामगिरीमुळें यांचे नांव सर्वतोमुखीं झालें. चार वेळां मेयरपदाचा मान यांना मिळाला होता. १८७४ सालीं झालेल्या पारशी-मुसलमानांच्या दंग्यांत यांनीं निर्भयपणें कामगिरी केली. गव्हर्नर फिलिफ बुडहाउस याच्या बेजबाबदारपणाविरुद्ध यांनीं खूपच चळवळ केली. यामुळें फिरोजशहा मेथा लोकांचे आवडते पुढारी झाले. यांनीं आपल्या प्रचारासाठीं बाँबे प्रेसिडेन्सी असोसिएशन काढली व सन १८८८ मध्यें ‘अँडव्होकेट आँफ इंडिया’ हें पत्र जहांगीर मर्झबान यांच्या भागीनें विकत घेऊन त्यांच्या साह्यानें यांनीं मतप्रचाराचें काम सुरु केलें. १८९२ मध्यें कार्पोरेशनचे प्रतिनिधि म्हणून कायदेमंडळांत व पुढील वर्षी इंपीरियल कौन्सिलमध्यें हे प्रविष्ट झाले. या दोनहि ठिकाणीं कठोर टीका करुन यांनी उत्कृष्ट प्रकारचें कार्य केलें. राष्ट्रसभेच्या कार्यात हे प्रारंभापासूनच लक्ष देत असत. सन १९१० सालीं हे मुंबई विश्वविद्यालयाचें व्हाइस चान्सेलर होऊन यांना डाँक्टर आँफ्‍ लाँज्‍ ही पदवी मिळाली. पुढें दोनतीन वर्षांतच यांनीं ‘बाँबे क्राँनिकल’ हें वर्तमान पत्र काढलें. मुंबई कार्पोरेशन व कायदेमंडळ या सर्व ठिकाणी यांचा दरारा विलक्षण असे. यांच्या धडाडीला व दणकेबाज वक्तृत्वाला लोक व सरकार भिऊन वागत असे. हे अत्यंत स्वाभिमानी व कर्तव्यदक्ष असे असल्यामुळें विरोधकांच्या चळवळीस यश येत नसे. मुंबई कार्पोरेशनपुढें ऐंशी हजार रुपये खर्चून त्यांचा पुतळा उभारण्यांत आला आहे.

- ५ नोव्हेंबर १९१५

N/A

References : N/A
Last Updated : September 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP