आश्विन वद्य ६

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


काशीबाई पेशवे यांचे निधन !

शके १६७५ च्या आश्विन व. ६ रोजीं श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पत्नी व नानासाहेब पेशवे यांच्या मातु:श्री काशीबाई यांचे निधन झालें. ही चासकर जोशी यांच्या घराण्यांतील महादजीपंत यांची मुलगी. हिचें लग्न सन १७११ च्या सुमारास झालें. हिचें माहेरचें नांव लाडूबाई असें होतें. बाजीरावानंतर वैधव्याच्या दशेंत राहनें हिला जड वाटूं लागलें. आणि नेहमीं प्रकृतिहि ठीक नसल्यामुळें बाईनें घराबाहेर यात्रेंतच आपलें आयुष्य कंठिलें. सन १७४२ मध्यें रामेश्वराच्या यात्रेहून आल्यानंतर काशीबाई लगेच काशीयात्रेस निघाली. पुत्राशीं भांडून बाई काशीस राहावयास आली आहे असा एक प्रवाद उठला होता. "सफदरजंगाचे दरबारीं वर्तमान आलें कीं, मातुश्री पुत्राशीं अजुर्दा आहेत; म्हणून वाराणसीसच राहूं म्हणतात. हें गोष्ट नबांबांनीं आम्हांस पुसली. आम्हीं विनंति केली, गोष्ट फटकळ आहे. हे स्थळ ऐसी आहेत कीं, हिंदु होऊन क्षेत्र सोडावें ऐसा होत नाहीं." काशीबाईची यात्रा बरीच गाजलेली दिसते. अनेक पत्रांतून हिच्यासंबंधी उल्लेख सांपडतो. "गयेस जाऊन यात्रा तीसचाळीस हजार जमा झाली. सर्वांचीं गयावर्जन होऊन प्रयागास येतो. मातुश्रींनीं विचार केला आही कीं, एक वर्षपर्यंत आपण श्रीमध्यें राहावें. मातुश्रीस बहुता प्रकारें आम्ही सांगतों परंतु चित्तांत येत नाहीं, इलाज करुन प्रयागापावेतों आली तरी घेऊन येतों. तेथून देशास येतीलसें दिसत नाहीं." असा मजकूर एका पत्रांत आहे. दुसर्‍या एका पत्रांत स्वत: बाईच म्हणते, "मला संकट पडलें आहे, माझ्या चित्तांत काशींत दोनचार महिने राहावें, परंतु हे उभयतां मला बळेंच ओढून काढतात. तरी माझें जाणें काशीस होय ती गोष्ट करणें." अशा प्रकारें काशीबाईला यात्रेंत सुख वाटत असल्याचें दिसून येतें. पुढें हिच्या पायास कांहीं दुखणें झालें. "मातुश्रीस पायाच्या व्यथेनें फार बरें वाटत नाहीं" असा मजकूर एका पत्रांत आहे. हें पायाचें दुखणें फार दिवस टिकलें. शेवटीं बाई आश्विन व. ६ रोजीं पुण्यास येऊन निधन पावली ! बाई पतिनिष्ठ असून गरीब व शांत स्वभावाची होती.

- १८ आँक्टोबर १७५३

N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP