आश्विन वद्य १२
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
श्रीपाद श्रीवल्लभांची समाधि !
आश्विन व. १२ या दिवशीं चौदाव्या शतकांतील प्रसिद्ध दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ यांनी समाधि घेतली. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा बनाव होत असतांना ज्या धर्म-सांप्रदायांनीं विशेष प्रकारची कामगिरी केली त्यांत दत्त सांप्रदायाचें वैशिष्ट्य फार मोठें आहे. या पंथाचे मुख्य प्रणेते नृसिंहसरस्वती असून याचा आधारभूत ग्रंथ गुरुचरित्र हा आहे. महाराष्ट्रांत त्या काळीं हिंदु प्रजेला इस्लामी धर्माचा फार जाच सहन करावा लागत होता, अशा समयी आचारधर्माचा योग्य उपदेश करणार्या ‘गुरुचरित्रा’ वर सर्व जण वेदाइतकी भक्ति ठेवीत असत. श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र याच ग्रंथांत पांचव्या व नवव्या अध्यायांत वर्णिलेलें आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रेयांचे अवतार म्हणून प्रसिद्ध आहेत.
"पिठापूर पूर्वदेशीं । होता ब्राह्मण उत्तमवंशी, ।
आपस्तंब शाखेसी । नाम आपळ राजा जाण ।
तयाची भार्या सुमता । असे आचार
पतिव्रता । अतिथि आणि अभ्यागता ।
पूजा करी भक्तिभावें " ॥
या दांपत्याच्या पोटीं श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला. लहानपणीच हे सर्वज्ञ होते. मुंजीच्या प्रसंगी यांनी चारहि वेद मुखानें म्हणून दाखविले.
‘आचार व्यवहार प्रायश्चित्त । समस्तांसी आपण बोलत ।
वेदान्तभाष्य वेदार्थ । सांगतसे द्विजवरांसी ॥"
अशी यांची अलौकिक बुद्धिमत्ता होती. यांनी लग्न करण्याचें नाकारलें. कारण आधींच यांचे लग्न विरक्तीशीं झालें होतें. तेव्हां
‘ न म्हणावें पुत्र यासी । हा अवतार पुरुष तापसी ॥’
असें म्हणून यांचे आईबाप स्वस्थ राहिले. यांनीं अनेक ठिकाणीं तीर्थयात्रा केली. काशी, बद्रीनारायण, गोकर्ण हीं ठिकाणें झाल्यावर हे निजामाच्या राज्यांत कुरवपूर (कुरगड्डी) येथें आले. तेथें एका स्त्रीस आशीर्वाद दिला कीं, पुढील जन्मीं तुला अलौकिक असा पुत्र होईल; त्याप्रमाणें ती स्त्री पुढल्या जन्मी करंज नगरी जन्मास आली आणि तिच्या पोतीं विख्यात अशा श्रीनृसिंह सरस्वतींचा जन्म झाला. श्रीपाद श्रीवल्लभांचाच हा अवतार असें मानण्यांत येतें. पहिल्या जन्मांतील अवतारकार्य संपल्यावर श्रीपाद श्रीवल्लभ ‘आश्विन वद्य द्वादशीसी । नक्षत्र मृगराज परियेसी
। श्रीगुरु बैसले निजानंदेसी । अदृश्य झाले गंगेंत॥"
N/A
References : N/A
Last Updated : September 30, 2018
TOP