(१) डोंगरीच्या तुरुंगांतील एकशें एक दिवस !
शके १८०४ च्या आश्विन शु. १५ या दिवशीं डोंगरीच्या तुरुंगांतील एकशें एक दिवसांची शिक्षा भोगल्यानंतर टिळक आणि आगरकर यांची मुक्तता झाली. कोल्हापूर प्रकरणाबाबत ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वर्तमानपत्रांतील लेखांबद्दल टिळक व आगरकर यांना चार महिन्यांची शिक्षा झाली होती. पण दोघांचे वर्तन ‘चांगलें’ राहिल्यामुळें सरकारनें ‘दयावंत’ होऊन १९ दिवसांची सूट दिली आणि आश्विन शु. १५ ला दोघांना मुक्त केलें. या दोन थोर देशभक्तांच्या सत्कारासाठी दोन हजार लोक स्टेशनवर जमले होते. मुरारजी गोकुळदास बंगला, ‘दिनबंधु’ कचेरी, युनियन क्लब, इत्यादि ठिकाणीं सत्कार झाला. लोकसेवेंत शारीरिक दु:ख व सन्मानसुख यांचा जो सजोड साक्षात्कार घडतो तो घेण्यांत त्यांचे पुढचें सारें आयुष्य जाणार होतें, दोघांनाहि तुरुंगवास मानवला नाहीं. उपासमार फार झाल्यामुळें टिळकांचे वजन चोवीस पौंडांनी आणि आगरकरांचे सोळा पौंडांनी कमी झालें होतें. तेरा फुटांच्या चौरस खोलींत अहोरात्र वास्तव्य, कांदाभाकर हें खाणें, अन्नांत मिरच्या व लसूण, निजण्याच्या घोंगडींत सुरवंट, भिंतींत ढेकूण अशा स्थितींत सुख कोठून मिळणार ? देशांतील भाव वाढवणारा आरामशीर तुरुंग तेव्हां थोडाच होता ? टिळक आणि आगरकर यांची मुक्तता झाली तेव्हां त्यांचे स्वागत कसें झालें याची मोठी मनोरंजक हकीकत प्रसिद्ध आहे. "तुरुंगाजवळ सुमारें शंभरसव्वाशें गाड्या आलेल्या असून लोकसमाज सुमारें दोन हजार जमला होता. कोणी एक जुन्नरचा उपदेशक पहांटे चार वाजतांच मोठी दोन घोड्यांची गाडी, टिळक-आगरकरांस पागोटें, शालजोडी, पोशाख घेऊन तुरुंगाच्या दारापाशीं आला. बरोबर तो एक न्हावी घेऊनहि गेला होता. सुपरिटेंडेंटचे परवानगीनें उभयतांची श्र्मश्रु, स्नान, पोशाख, वगैरे करवून त्यानें त्यांस आपल्या गाडींत आणून बसविलें होतें. सूर्योदयास मिरवणूक चालू झाली."
- २६ आँक्टोबर १८८२
--------------------------
आश्विन शु. १५
राजा रविवर्मा यांचे निधन !
शके १८२८ च्या आश्विन शु. १५ रोजीं भारतांतील जगप्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मा यांचें निधन झालें. लहानपणापासून त्रावणकोरच्या महाराजांच्या संगतींत ते असल्यामुळें त्यांच्या चित्रकलेच्या नादाला उत्तेजन मिळत गेलें. सन १८७३ मध्यें मद्रास येथील चित्रकलेच्या प्रदर्शनांत त्यांच्या एका चित्राला सुवर्णपदक मिळूण त्यांची वाहवा झाली. बडोदे, भावनगर, म्हैसूर, इत्यादि संस्थानिकांशीं त्यांचा संबंध येऊं लागला. रामायण-महाभारतांतील चित्रें त्यांनीं बडोदें सरकारच्या राजवाड्यांत काढिलीं. त्या चित्रांच्या मुद्रणासाठी रविवर्मा प्रेस काढण्यांत आला. भारतांतील कानाकोपर्यांत यांचीं चित्रें जाऊन पोंचली आहेत. वैचित्र्य, समप्रमानत्व, साधेपणा, व्यवस्थितपणा, आकृतीची मृदुता, पावित्र्य, उज्ज्वलता, आदि गुण यांच्या चित्रांतून प्रामुख्याने दिसून येतात. रविवर्मा स्वत: मल्याळी असून त्यांच्या सर्व चित्रांतील व्यक्तींना महाराष्ट्रीय पोषाक असे. "चित्रास इतका योग्य पोशाख दुसर्या प्रांतांत नाहीं, महाराष्ट्रांतील स्त्रियांच्या लुगडें नेसण्याच्या विशेष पद्धतीमुळें त्यांचें सौंदर्य जास्त आकर्षक दिसतें " असें रविवर्माचें म्हणणें असे. रविवर्माचें जन्मस्थान विलिमनूर (त्रावणकोर संस्थान ) हें असून यांची जात मल्याळी क्षत्रियाची होती. लष्करी पेशांतील कामगिरीमुळें यांच्या घराण्याला विलिमनूर गांव इनाम मिळालें होतें. यांचें घराणें अत्यंत सुसंस्कृत असें होतें. यांच्या चित्रांची ख्याति सर्व जगांत होत असते. हिंदुस्थानच्या प्रत्येक राजवाड्यांत व प्रत्येक घरात यांची चित्रें जाऊन त्यांनी लोकांचा आदर संपादन केला आहे. यांनी काढलेली स्त्रियांची चित्रें कांही अंशी इंग्रजी वळणावर असलीं तरी त्यांच्या चेहर्यांत भावदर्शन उत्कटपणें साधलेलें असल्यामुळें तीं सर्व चित्रें उत्कृष्ट म्हणूनच गणलीं गेलेलीं आहेत. अनेक सूक्ष्म भावना हळुवारपणें चित्रांत दर्शित करण्यांत यांचा हातखंडा असे. मानवी स्वभावाच्या विविध छटा ‘कृष्णशिष्टाई’ या त्यांच्या विख्यात चित्रांत स्पष्टपणें खुलून दिसतात.
- २ आँक्टोबर १९०६