आश्विन शुद्ध १

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


(१) संत बहिणाबाईंची समाधि !

शके १६७२ च्या आश्विन शु. १ या दिवशी संत तुकोबा यांची विख्यात शिष्या बहिणाबाई यांचें निधन झालें. यांचा जन्म शके १५५० मध्यें झाला असून यांचें माहेर वेरुळच्या पश्चिमेस देवगांवी होतें. आऊदेव कुलकर्णी व जानकी या दांपत्याच्या पोटीं बहिणाबाई जन्मास आल्या. लहानपणापासून भगवद्‍भक्तीची आवड यांच्यांत होती. यांचे यजमान शिवापूरचे ज्योतिषी असून त्यांना घर सोडून भिक्षा मागत हिंडावें लागलें. पंढरपूर, शिंगणापूर, रहिमतपूर आणि कोल्हापूर या ठिकाणीं बहिणाबाईंसह त्यांनीं प्रवास केला. याच वेळीं जयराम गोसावी यांची कीर्तनें बाइनीं ऐकिलीं. तुकोबांची अभंगवाणी ऐकून बहिणाबाईंना तुकारामांच्या उत्कंठा लागली. पतीस हा ध्यास मान्य नसतांहि देहूस जाऊन यांनीं तुकोबांचे दर्शन घेतलें. लौकरच तुकोबांनीं यांना येऊन स्वप्नांत अनुग्रह केला; आणि बहिणाबाईस अलौकिक योग्यता प्राप्त झाली. "तुकोबांच्या शिष्यमंडळींत बहिणाबाईंचे महत्त्व विशेष आहे. यांनीं आपल्या आयुष्याचीं कांही वर्षे देहूस तुकोबांच्या संगतींत घालविलीं, त्यांची कीर्तनें ऐकिलीं, व तुकोबांच्या कृपेनें स्वानुभवसंपन्न होऊन आत्मचरित्रपर व उपदेशपर अभंगहि लिहिले. तुकोबांच्या गोष्टी व त्यांचे वर्णन-स्तवन त्यांनीं तुकोबांना पाहून व त्यांच्या संगतीचा आनंद स्वत: भोगून अधिकारवाणीनें केलें आहे." यांचें आत्मचरित्र अत्यंत रसाळ असून त्यांत पूर्वीच्या बारा जन्मांची हकीगत नमूद केली आहे. भक्ति, वैराग्य, विठ्ठल, पंढरी, संत, सद्गुरु या विषयांवरील यांची अभंगवाणी अत्यंत प्रासादिक अशीच आहे. तुकारामांवर यांची फारच निष्ठा होती, याचा प्रत्यय कित्येक अभंगांतून येतो : -

"मत्स्य जैसा जळावांचुनी चरफडी । तैसी ते आवडी तुकोबांची ॥
अंतरींची साक्ष असेल जो प्राणी । अनुभवें मनीं जाणेल तो.
संचितासी दग्ध करी ऐसा कोण । सद्‍गुरुवांचून जाण मना ॥
बहेणी म्हणे माता जाऊं पाहे जीव । कां बा नये कींव तुकोबा रे !"
-------------

आश्विन शु. १

(२) बेझंटबाई यांचे निधन !

शके १८५५ च्या आश्विन शु. १ या दिवशीं जगांतील सुप्रसिद्ध तत्त्ववेत्त्या, वक्त्या व थिआँसाँफिकल सोसायटीच्या अध्यक्ष डाँ. अँनी बेझंट यांचें निधन झालें. पूर्वायुष्यांत इंग्लंडमधील प्रसिद्ध अज्ञेयवादी चार्लस ब्रँडला यांच्या साहचर्यानें बेझंटबाई यांनी अभ्यास केला. सन १८९३ मध्यें त्या भारतांत आल्या. धर्मशिक्षणाचा प्रवेश अभ्यासक्रमांत व्हावा म्हणून बनारस येथें सेण्ट्रल हिंदु काँलेज स्थापन केलें. आणि नंतर गीता, उपनिषदें, रामायण, महाभारत, आदि ग्रंथांवर भाषणें देऊन यांनीं तीं पुस्तकरुपानें प्रसिद्ध केलीं. सन १९०९ साली बाईंनी पृथ्वीपर्यटणास निघून जगद्‍गुरुंच्या आगमनाची घोषणा केली. आणि जे कृष्णमूर्ति हे जगद्‍गुरुंच्या अवताराचें अधिष्ठान होणार असल्याचें प्रसिद्ध केलें. १९१३ मध्यें बाईंनी भारतीय राजकारणांत प्रवेश केला, आणि त्यांच्या कार्याचें फल म्हणजे १९१७ मध्यें कलकत्ता राष्ट्रसभेच्या त्या अध्यक्षहि झाल्या, परंतु त्या राजकारणांत अर्पिय होऊं लागल्या. थिआँसाँफिकल सोसायटीचें आद्य पीठ अड्यार येथील आश्रमाचें संवर्धन त्यांनींच केलें. १९३३ च्या सप्टेंबर २० ला अड्यार येथेंच त्यांचें देहावसान झालें. द्वारकानाथपंत तेलंग यांनी त्यांच्या अस्थि काशीस नेऊन गंगेंत विसर्जित केल्या. धर्म, समाज व तत्त्वज्ञान यांकडे पाहण्याच्या अभिनव दृष्टीमुळें बेझंट बाईंबद्दल. लोकांना फार आदर वाटे. कार्याची प्रचंडता, संघटनाचातुर्य निग्रह, इत्यादि गुणांमुळें बाईची योग्यता फार मोठी आहे. यांच्या आस्तिक्य बुद्धींत मूलगामी संशोधनाची दृष्टि असे. आणि बेझंटबाई आधुनिक शास्त्रांच्या साह्यानें जुन्या आचारविचारांचा सुगमपणें उलगडा करीत; यामुळें लोकांची त्यांच्यावर एक प्रकारची श्रद्धा निर्माण झाली होती. चिकित्सा आणि भाविकता यांचा चमत्कारिक मिलाफ यांच्यांत असल्यामुळें जगांतील सर्व भागांतील लोक यांच्याकडे आकर्षिले गेले होते. यांच्या निधनानंतर यांची रक्षा अड्यार येथील आश्रमांत ‘गार्डन आँफ रिमेम्ब्रन्स’ या पद्माकृति उद्यानांत ठेविली आहे.
- २० सप्टेंबर १९३३
----------------------

आश्विन शु. १

(३) रामानंद चतर्जीचे निधन !

शके १८६५ च्या आश्विन शु. १ रोजीं भारतांतील जगप्रसिद्ध संपादक व राष्ट्रीय वृत्तीचे पुरुष रामानंद चतर्जी यांचा अंत झाला. बंगाल्यांतील सुप्रसिद्ध चटोपाध्याय घराण्यांत यांचा जन्म झाला. काँलेजांत शिक्षण चालू असतांनाच हे ’दासी’ या नियतकालिकाचे संपादक म्हणून काम करुं लागले. शिक्षण पूर्ण होतांच प्रयाग येथील कायस्थ काँलेजांत कांही दिवस प्राध्यापकाचें काम केल्यावर हे अलाहाबाद विद्यापीठांत फोलोहि झाले. त्यानंतर ‘इंडियन मेसेंजर’ या पात्राच्या संपादकत्वाचें काम थोडे दिवस करुन यांनीं ‘प्रदीप’ नांवाचें स्वत:चें नियतकालिक काढलें. यांच्याच नेतृत्वाखालीं ‘प्रवासी’ मासिक निघूं लागलें. सन १९०७ मध्यें सुप्रसिद्ध इंग्रजी मासिक ‘माँडर्न रिव्ह्यू’ निघूं लागलें. ‘प्रवासी’ व माँडर्न रिव्ह्यू’ या दोन नियतकालिकांनी वृत्तपत्रसृष्टींत चांगलेंच नाव कमाविलें. रामानंद चतर्जी ब्राह्मो समाजाचे अनुयायी होते. ‘Towards Homerule' नांवाची ग्रंथमाला लिहून यांनीं टिळकांच्या चळवळीस चांगलेच साह्य केलें. यांची अधिक महत्वाची कामगिरी म्हणजे संडरलण्ड यांचें ‘इंडिया इन बाँडेज’ हें पुस्तक यांनीं प्रकाशित केलें आणि ब्रिटिशांच्या राजनीतीवर विदारक प्रकाश पाडला. चतर्जींना राष्ट्रसभेंचे मुसलमानविषयक धोरण नापसंत झालें म्हणून ते हिंदुसभेंत दाखल झाले. सन १९२९ च्या हिंदुमहासभेचें हे अध्यक्षहि होते. बंगालच्या राजकारणांतहि हे आत्मीयतेंने पाहत असत. दुय्यम शिक्षणाचा कायदा, कलकत्ता विद्यापीठांतील श्री-कमल या पवित्र चिन्हांचें उच्चाटन, दंगे, हिंदु स्त्रियांचें अपहरण, आदि प्रकारांविरुद्ध रामानंद चतर्जींनीं मोठाच प्रचार केला. यांची विचारसरणी स्पष्ट व निर्भिड असल्यामुळें ‘माँडर्न रिव्ह्यू’ ला उच्च दर्जा प्राप्त झालेला होता. त्या मासिकाचा नियमितपणा, त्याची छपाई, त्यांतील चित्रें आणि आंतील उच्च दर्जाचा मजकूर या गुणांमुळें हे मासिक चांगलेंच नांवारुपाला आलें. रवीन्द्रनाथ टागोरांचा परिचय पाश्चात्यांना ‘माँडर्न रिव्ह्यू’ तर्फेच झाला. या मासिकांतील Notes या नांवाखाली प्रसिद्ध होणारा मजकूर अत्यंत लोकप्रिय झालेला आहे.
- ३० सप्टेंबर १७४३

N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP