थिआँसाँफिकल सोसायटीची स्थापना !
शके १८०१ च्या आश्विन शु. ३ रोजीं हिंदुस्थानांतील पहिली थिआँसाँफिकल संस्था मुंबईस स्थापन झाली. सन १८७५ मध्यें सदर संस्था अमेरिकेंत स्थापन झाल्यावर चार वर्षानंतर तिचे संस्थापक आँल्काँट व ब्लँकव्हँटस्की मुंबईस आले; आणि त्यांनीं ही संस्था स्थापन केली. या संस्थेत श्री. मावळणकर, लोकहितवादी, तुकाराम तात्या, अण्णा मोरेश्वर कुंटे, डाँ. भाटवडेकर, इत्यादि मंडळी प्रमुख होती. या पंथाच्या प्रेरणेचें थोडक्यांत रुप असें होतें कीं, विश्वबंधुत्वाची भावना वाढवूण संकुचित श्रद्धेचा आग्रह न धरतां आधुनिक चिकित्सक विचारपद्धतीला जुळेल अशा पद्धतीनें देहात्मवाद, आत्म्याची स्थिति, गति, पुनर्जन्म, इत्यादि प्रश्नांची सयुक्तिक, समर्पक व सदाचारप्रवर्तक मीमांसा करणें, आणि तिच्यावर श्रद्धा ठेवून सत्यशोधनाचा प्रयत्न करणें हा प्रमुख हेतु होता. भारतांत पुढें अनेक शाखा निघून या संस्थेची उन्नती होत गेली. डाँ. बेझंटबाईसारखी व्यासंगी, कळकळीची, उदार मनोवृत्तीची गुणवान् बाई संस्थेस लाभल्यावर राजकीय बांबतींत मतभेद झाला तरी निष्ठेनें त्यांनीं काम करुन थिआँसाँफीचें स्थान बळकट केलें. - "थिआँसाँफी हा प्रार्थनासमाजाप्रमाणें ख्रिस्ती टीकाकारांच्या टीकेमुळें व त्यांच्या अनुकरणामुळें निघालेला किंवा आर्यसमाजाप्रमाणें आत्मनिरीक्षणामुळें व पूर्वाभिमानामुळें निघालेला पंथ नव्हे. एका विशिष्ट पद्धतीनें विश्वबंधुत्वाचें नातें फैलावणार्या पंथाचा तो सत्यशोधनार्थ एक प्रयत्न होय .... आचार, विचार व व्यवहार या तिहेरी बंधांत थिआँसाँफीनें धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय अशा विविध विषयांचा समावेश केला आहे .... व्यापक ध्येय, संग्राहक वृत्ति व उदार बुद्धि यांमुळें मतविरोधाबद्दल असहिष्णुता थिआँसाँफीच्या अनुयायांना वाटत नाहीं .... बौद्ध, हिंदु, ख्रिस्ती, मुसलमान, पारशी, या सर्व धर्मांना पोटांत घेणारी शिकवण या संस्थेची असल्यामुळें तीत समाजातील विचारवंतांचा समावेश झाला.-"
- १८ आँक्टोबर १८७९