आश्विन शुद्ध २
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
‘सत्यशोधक’ समाजाची स्थापना !
शके १७९५ च्या आश्विन शुद्ध २ रोजीं प्रसिद्ध समाजसुधारक आणि दलितांचे कैवारे ज्योतिबा फुले यांनीं ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ईश्वर सर्वव्यापी, निर्विकार, निर्गुण व सत्यस्वरुपी आहे, त्याची भक्ति करण्याचा अधिकार त्याच्या सर्व लेकरांना सारखाच आहे, त्यासाठीं ‘भट’ दलालाची आवश्यकता नाहीं, मनुष्य जातीनें श्रेष्ठ ठरत नसून तो गुणांनीं श्रेष्ठ ठरत असतो, अशीं या समाजाचीं प्रमुख तत्वें होतीं. समाजाच्या स्थापनेंचा उद्देश पुढीलप्रमाणें होता. - "ब्राह्मण, भट, जोशी, उपाध्ये, इत्यादि लोकांच्या दास्यापासून शूद्र लोकांस मुक्त करण्यासाठीं व आपल्या मतलबी ग्रंथाच्या आधारें आज हजारों वर्षे ते शूद्र लोकांस नीच मानून गफलतीनें लुटीत आले आहेत, यास्तव सदुपदेश व विद्याधारें त्यांस त्यांचे वास्तविक अधिकार समजावून देण्याकरितां कांहीं सुज्ञ मंडळींनीं हा समाज स्थापन केला आहे. यांत राजकीय विषयांवर बोलणें अजीवर्ज्य आहे" सत्यशोधक समाजाची ही चळवळ कांही वर्षे मर्यादित होती, कारण त्या विचारांचें आकलन करुन घेण्याइतका दलितवर्ग सुबुद्ध झालेला नव्हता. कालांतरानें बहुजनसमाज जागृत झाल्यानंतर कोहापूरचे महाराज शाहू छत्रपति यांच्याकरवीं समाजाला संघटित स्वरुप प्राप्त होऊन त्याचा विस्तारहि वाढला. वास्तविक धर्मापासून बहुजनसमाज दूर अज्ञानांत कोठें तरी वावरत होता; त्याला सत्यज्ञान व खरा धर्म यांची जाणीव करुन द्यावी असाच हेतु या समाजाच्या बुडाशीं होता. "अधर्म आणि असत्य यांनीं बरबटलेल्या वातावरणांत गोष्टीचें सत्य स्वरुप काय आहे तें हुडकून काढणें आणि त्याप्रमाणें वागावयाचें" हा या समाजाचा उद्देश होता. महात्मा फुले यांचे सांगणें नेहमी असें होतें कीं, तत्त्व आणि कृति यांची फारकत होऊं नये ..... खरा सत्यशोधक सत्य तेवढे सांगून स्वस्थ बसत नाहीं, तर त्याप्रमाणें कृतिहि करतो. या समाजामुळें धर्मज्ञानाचें खरें स्वरुप गरिबाच्या झोंपडीपर्यंतहि सुलभतेनें पोहोंचतें झालें.
- २३ सप्टेंबर १७७३
N/A
References : N/A
Last Updated : September 29, 2018
TOP