१४८१
संसार कूपीं पडला, मार्गु नेणे देवा ! आंधला ! ॥१॥धृ॥
मज हाकु देयीं श्रीदत्ता ! उडी घालीन वचें पारुता. ॥छ॥
दिगंबरा ! तुझें स्मरण; नेणें आणिक येणें वांचूंन. ॥२॥
१४८२
संसारबंधन न तुटे; माझें कवण विचारील गोमटें, ॥१॥धृ॥
येकें दिगंबरें वांचूंन ? या कां वो ! तया घेऊंन. ॥छ॥
दिगंबरु माझा कुंवासा सोडवील, आहे भरवसा. ॥२॥
१४८३
संसारचक्रीं भ्रमतां, बहु काळ क्रमले श्रीदत्ता ! ॥१॥धृ॥
आतां भेटि करील कवण ? तुझे पाहिन येकुदा चरण. ॥छ॥
दिगंबरा ! तुझेनि स्मरणें क्षीण होती संसारबंधनें. ॥२॥
१४८४
बाबुळेचा खोडीं माकोडा सेंड्या जाये, पुडती ये बुडा. ॥१॥धृ॥
तैसें मज जालें दातारा ! करूं कित्ती दत्ता ! येरधारा ?
विश्रांति नाहीं तुजवीण. दिगंबरा ! देयीं दर्शन. ॥२॥
१४८५
संसार संभ्रमु सोहोळा जाण त्रीदोषु मातें लागला. ॥१॥धृ॥
उतार करीं सच्चिद्रसें, अवधूता ! दत्ता ! परियसें. ॥छ॥
दिगंबरा ! तुझें दर्शन करिती ते अमृतप्राशन
१४८६
संसारु वैरी सरकला; वरि येउंनि हात उचलिला. ॥१॥धृ॥
म्यां लाविले दोन्ही नयन; करितूसें तुमचें स्मरण. ॥छ॥
दिगंबरा ! प्राणसखया ! धांव घेइं बा ! दत्तात्रेया ! ॥२॥
१४८७
संसार दुःखासि कारण, जन्मु मरणा, जन्मा मरण ! ॥१॥धृ॥
येथ मज सूटिका न दिसे. कर्म वेगु न संवरे मानसें. ॥छ॥
दिगंबरा ! तुझें दर्शन नसे आणिक कर्म विच्छेदन. ॥२॥
१४८८
संसारु दुरुळ सासुरें, काम, क्रोधु, बहु जन माजि रे ! ॥१॥धृ॥
येथें कासया मज दीधले ? मुख दाखवीं परतोनि आपुलें. ॥छ॥
बापु तूं माये दिगंबरा ! कयीं नेसील सांगयीं माहेरा ? ॥२॥
१४८९
संसार तापें तापला ! करपादीं अनळु पेटला ! ॥१॥धृ॥
आधि व्याधि जडलासे नेटें; तुजवांचूंनि देवा ! न तुटे. ॥छ॥
दिगंबरा ! तूं सर्वेश्वरु, लीलावीलासु, अमृतसागरू. ॥२॥
१४९०
अध्यात्म भोगूं ? कीं दैविक ? ताप दुस्तर हें आधिभौतिक. ॥१॥धृ॥
धिग्य प्राणु सहसा नय जाये ! अवधूता ! हें दुःख न साहे. ॥छ॥
वरि वियोगु तुझा दातारा ! बहु बाधक, जाण दिगंबरा ! ॥२।
१४९१
अहं ह्मणउंनि आत्मगोचर कां गा ! धरितासि स्थळ शरीर ? ॥१॥धृ॥
तरि, द्रष्टा तो सांगकवनु अहंकारसाक्षी विलक्षणू ? ॥छ॥
अहंकारेंसीं स्थूळ वेगळें प्रकाशे तुझेनि येणें बोलें. ॥२॥
दिगंबरीं प्रतीति रोकडी अहं सांडूंनि जाण फुडाफुडी. ॥३॥
१४९२
ममतेचें करूंनि बंधन धरितासि तें चि, तें कवण ? ॥१॥धृ॥
अधीं जाण जाण रे ! सुजाणा ! तूं कवणु ? धरितासि कवण ? ॥छ॥
स्वप्न जैसें, तैसी चि जागृती, दिगंबर जाणतां स्वस्थिती. ॥२॥
१४९३
करकमळें ठेउंनी नीडलीं, लक्ष ठेउंनि दिशामंडलीं, ॥१॥धृ॥
तुझी वाट पाहें अवधूता ! कैं देखइन येतां, धांवतां ? ॥छ॥
दिगंबरा ! तुझेनि दर्शनें स्वस्वानंदें होईल पारणें. ॥२॥
१४९४
बहु दिवस जाले माहेरा; भेटि नाहीं विज्ञानसागरा ! ॥१॥धृ॥
तुझी वाट पाहें दातारा ! करीं परति दत्ता ! माहेरा. ॥छ॥
श्रमु जाला, सांगों कवणा ? दिगंबरा ! दाखवीं चरणा. ॥२॥
१४९५
भववनीं सांडूंनि येकलें, कोठें गेलासि ? तें मज न कळे. ॥१॥धृ॥
तुझी वाट पाहें नयनीं; अवधूता ! तूं माझी जननी. ॥छ॥
दिगंबरा ! न करीं कठिण; तुझा वियोगु मातें मरण. ॥२॥
१४९६
जननी तूं जनकू तत्वता सत्य निर्धारु ऐसा जाणतां. ॥१॥धृ॥
मज लाजिरवाणें होताहे; अवधूता ! सांगोंनि काये ? ॥छ॥
नाना योनीचे मज अपार, पिते साहावे केवि हें उत्तर ? ॥२॥
ऐसें कां मज केलें ? दिगंबरा ! अपराधाविण, सर्वेश्वरा ! ॥३॥
१४९७
कित्ती म्यां जनक देखिले ! कित्यांचे कुचस्वेद चाटले ! ॥१॥धृ॥
ऐसें कां मज केलें श्रीदत्ता ! तुज ऐसा जनकु असतां ? ॥छ॥
दिगंबरा तुं माझी जननी, तरि दाविसी मज कां या योनी ? ॥२॥
१४९८
तुझा पुत्रु मीं, हें साचार, तरि, मज कां पीते अपार ? ॥१॥धृ॥
बहु लाज जाली, श्रीदत्ता ! न ये लौकिकी मज काहीं बोलतां. ॥छ॥
दिगंबरा ! तूं येकि जननी, तरि मज कां आलिया या योनी ? ॥२॥
१४९९
अंशी तुं, अंशु मीं, श्रीदत्ता ! चिद्रसें जालें असतां, ॥१॥धृ॥
बहुतांचे पालव लागले; सप्तधातुक कां वरि पडले ? ॥छ॥
सर्वज्ञांप्रति काये सांगणें ? नेणें, साहातासि हें कवणें गुणें ? ॥२॥
दिगंबरा ! सज्जन हांसती; काये उत्तर देणें तयांप्रति ? ॥३॥
१५००
ममतेचीं पाशबंधनें, जन भजविसी जनांकारणें. ॥१॥धृ॥
कवणाचे कवण निदानीं ? सांग संगीं, जन्मीं, मरणीं ! ॥छ॥
दिगंबरा ! कळलें हें आमुतें; यत्नु चाले कवणचा येथें ? ॥२॥