मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद ९६१ ते ९८०

दासोपंताची पदे - पद ९६१ ते ९८०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


९६१
संगु अवस्थेचा योगु तो दुःखांचा.
मायावी दुःस्वप्न, जाण, प्रपंचु गुणाचा. ॥१॥धृ॥
आतां सांडि, सांडी जना ! गुणसंगु अज्ञाना ! ॥छ॥
गुणव्यतिरेकें स्वरूपविवेकें दिगंबर ब्रह्म, जाण. व्योमाचि सारिखें. ॥२॥

९६२
मनत्व नुरलें ठायीं; पाहाणें पुडती कायी ?
स्वरूपें चिन्मयता; पाहाणयां पैसु नाहीं. ॥१॥धृ॥
ऐसे डोळस अंध जाले; पाहों वीसरले. ॥छ॥
पाहाणें, न पाहाणें, जाणणें, नेणणें,
दिगंबरीं वाॐ स्थिती सहज असणें. ॥२॥

९६३
॥ मल्हार ॥
बहु दिवस जाहाले, कृतकर्म नेणें कैसें ?
अवधूताचें दर्शन सापें न दिसे. ॥१॥धृ॥
तेणेंसी येकुदां मज कोण्ही भेटि करा.
पाहीन नयनीं त्रीदत्तु सोयेरा. ॥छ॥
तेणेंवीण वो ! न सवे; मन दश दीशा धांवे !
दिगंबरेंसीं अंतर; हा जीउ न धरवे ! ॥२॥

९६४
जनवाद वो ! सायक; तयासी मीं मानु नेदीं.
अवधूतीं विनटली माझी मनोबुद्धी. ॥१॥धृ॥
न करी आणिक मीं अनुस्मरण. अनसूयेचा नंदनु माझें योगधन. ॥७॥
जपु, तपसु, साधन अवधूतु ध्येय, ध्यान.
दिगंबरु ब्रह्ममय; येर मायामय भान. ॥२॥

९६५
लक्ष ठेवितां चरणीं माझी मति पारुषली;
रूपीं निमाली चेतना; गुणवृत्ति हारपली. ॥१॥धृ॥
कासया करूं मीं योगधारणा ?
दोहीं नयनीं पाहिन दत्ता गुणपूर्णा. ॥छ॥
परब्रह्म हें निर्गुण गुणमय व्यक्त जालें.
दिगंबर निर्धारितां द्वेताद्वेत गेलें. ॥२॥

९६६
करचरण जोडुंनी विनविन साधुजना ::-
अवधूताचें स्वरूप गुणमय न ह्मणा. ॥१॥धृ॥
पाहातां नयनीं येणें भेदु वितुळला.
भेदु त्रिविधु वर्जितु बोधु प्रकटला. ॥छ॥
नव्हे स्तवन मायिक; सद्य प्रतीति आहे.
दिगंबरातें पावला, तो जाणोंनि पाहे. ॥२॥

९६७
अवधूता ! श्रीसद्गुरू ! अरे ! योगिजनप्रीया !
कयीकईं, सांग, भेटी येसी ? देवराया ! ॥१॥धृ॥
कमळनयन मनीं रूप आठवे.
जीउ वियोगें तळमळी ! हा ! हा ! भेटि नव्हे ! ॥छ॥
बहु दिवस जाहाले; अरे ! परिपूर्णकामा !
दिगंबरा ! तूझें चित्त कें धरवे आह्मा ? ॥२॥

९६८
मन भूललें; सखिये अर्थभोगु आवडेना.
अवधूताचा वियोगु खरत वेदना. ॥१॥धृ॥
कमळनयनरूप सावळें पाहीन मी; कयी हे नीवती डोळे ? ॥छ॥
वायां वीण हें शरीर क्षणक्षणें जात आहे.
दिगंबरेंसीं अंतर तें मज केवि साहे ? ॥२॥

९६९
जळस्तूळेंसीं सूटला जैसा मीनु तळमळी;
तैसें मज प्रवर्तलें वेदना लागली. ॥१॥धृ॥
सावळें रूप वो ! कैसें मज वीसरवे ?
अवधूताची सखिये ! बहुत काळ सवे. ॥छ॥
करचरण तपती; हृदय दुभाग जाले;
दिगंबराचा वियोगु; दुरित फळासि आलें ! ॥२॥

९७०
गुणकरणें कुंठलीं; वय माझें क्षीण जालें;
आतां कैसेनी जोडती अवधूता ! पाउलें ? ॥१॥धृ॥
मनस चंचळ, स्थिर नव्हे; काये करूं ?
अवधूतें वीण माये ! पडला अंधकारू. ॥छ॥
यत्न सकळ सांडूंनि दीर्घस्वरें सादु घाली.
येइं ! येइं ! दीगंबरा ! तुं माझी माउली. ॥२॥

९७१
मायेबापाचें लेंकरूं; नव्हे मीं परदेशीं.
सांगयीन अवधूता; मज न ह्मणा दासी. ॥१॥धृ॥
येइं ! रे ! आत्मयां ! दत्ता ! योगिराया !
जनवादु हा वोखटा; कां सांडिसी माया ? ॥छ॥
विजातीय, विभेदमुक्त शरीर माझें.
नव्हे दासिरूं; बालक दिगंबरा तुझें ! ॥२॥

९७२
तुज येकेंवीण जनधन काये करूं ?
न सोडीं पालउ; मीं तुझें लेंकरूं. ॥१॥धृ॥
कडिये घेइं रे ! दत्ता ! मज आळिवया.
जाणीतली खूण; कां घालिसी माया ? ॥च॥
श्रीगुरो ! आत्मयां ! तूं जाणोंनि पाहीं.
देहीं तुं सर्वत्र; तरि मज मानु देयीं. ॥२॥
बोले दीगंबरू ::- आतां पुरे बोल झणें;
गुणमतीचें देखणें काय तें देखणें ? ॥३॥

९७३
देवपणेंसीं पारिखें भक्तपण काये करूं ?
जरि यातीसीं वेगळा; तरि केवि पाये धरूं ? ॥१॥धृ॥
पाहतां स्वरूपें तुज मज भेदु नाहीं.
सत्येंसी दुसरें सांग, सांग कायी ? ॥छ॥
बोलतां बोलतां गुणीं गुण तूटि दीसे.
वर्म प्रकाशुं कासया ? मज ठाउकें असे. ॥२॥
दिगंबरु बोले ::- देइंन मीं देवपण;
वर्म तुं आमुचें झणें बोल येथूंन. ॥३॥

९७४
द्विज, ज्योतिषी, पाठक भले भले अनसूयेमंदिरा प्रति आले.
दत्तासनीं समीप बैसवीले. घेऊनि कुमरू अनसूया बोल बोले. ॥१॥धृ॥
सती पूसे अनसूया विप्रवर्गा ::- जन्मकालू वर्त्तुनि फळ सांगा;
काये कुमरें चरित केलें मागां ? पुढें भविष्य येईल जे कीं योगा. ॥छ॥
विप्र बोलती पाहोंनि पुण्यकाळू ::- प्रश्न केला लक्षूंनि तो ही वेळू.
सामुद्रीकें लक्षूंनि दृष्टी बाळू बोलु बोलती कुशलत्वें मवाळू. ॥२॥
योगगम्य, चैतन्य, गुणमुक्त, योगतपसें केवल आराधीत,
योगमायया सगूण गुणान्वीत, योगिराजरूप हें जालें व्यक्त. ॥३॥
योगानळु वो ! प्राशिला जन्मा पहिलें. योगहृदयीं वसतिस्थाने केलें.
योगानंदे योक्तया नीववीलें. योगारिष्टदमन हा जाण वहिलें. ॥४॥
योगिजनवल्लभु, योगत्राता, बाळु होयील हा काळु विचारीता.
योगी सेविती योगिया अवधूता. गुरुत्वाची पदवी येईल दत्ता.
वेळाफळें विज्ञानजळधरू देवदेॐ होईल तुझा कुमरू.
महर्षी ही नेणती याचा पारू. विश्वव्यापी ह्मनती विश्वंभरू. ॥छ॥
मृळदकारें होईल स्वपददाता, अब्जलोचनु, सकलुजनत्राता.
दिगंबरु हा कूमरू तुझा आतां परब्रह्म. न करीं काहीं चिंता. ॥७॥
काळवेत्ते, नक्षत्रग्रहवादी, जातकर्मी, जातकी तया बुद्धी.
तयांप्रति अनसूया पुसे शब्दीं ::- तपोधन हें कुमरु पाहा आधी. ॥१॥धृ॥
याचें भविष्य वर्त्तूंनि तुह्मी सांगा, काये चरित असैल केलें मागां.
काळु, अयनु पाहोंनि ग्रहा, योगा येरसम तें बोलता प्रश्ना मागां. ॥छ॥
द्विज बोलती हा मूळिचा अगूणू, मायारहितु, अवशु, रूपहीनू,
योगतपसें वितरागें साध्यमानू, यातें पाहातां न लगे स्वभाॐआनू. ॥२॥
गुण पाहिजे तैसा तो येथें नाहीं. माया ममता नूपजे याचां देहीं.
हा वो ! अवशु कोण्हाचा नव्हे काहीं.
संगु न धरी, न साहे शब्दु तो ही. ॥३॥
यया नाहीं स्वपर जनु लाहाणा. माये पाहतां तैसाचि हाही जना.
जनावेगळा वसवील येका राना. अकिंचनु पाहिजैल अकिंचना. ॥४॥
गुणलक्षणें सकळें अपहरलीं. काळानळें पोळला असे मूळीं.
काळु काळा कवनु या आकळी ? कृष्णवर्ण अवगमे नेत्रकमळीं. ॥५॥
दानीं दीधला दैयत्व याचां आंगीं. दत्त अन्न भक्षील हा वो ! जगीं.
महीमंडळी भ्रमैल भिक्षेलागी. भैक्ष्य मागती ययाचे जे कीं संगीं. ॥६॥
अयनफळें होयील धर्मविहिनु. आंगी न धरी आश्रमु यातीगूणु.
नग्न वनिता लागैल अवगूणु. वस्त्र सांडूंनि भ्रमैल तुझा नंदनू. ॥७॥
हानिकर वो ! ययाचे शब्द श्रवण वो ! दृष्टि पाहातां केवळ जीवा मरण.
संसारि कां संरीं पडे विघ्न. संगु नेघती ययाची कोण्हीं जन. ॥८॥
आत्मघातकी पडैल जळधरीं वो ! तेथें वांचला राहील गिरीवरी.
परसिद्धी हरील, चोरासि धरावें. गुरु दुसरा सर्वथा न करी. ॥९॥
काहीं नाहीं तेणें ययासि धरावें. काहीं नेणें तेणें ययातें पुसावें.
अकिंचनें भजतां हित नव्हे वो ! सर्वशून्य होयील जाण बरवें. ॥१०॥
परित्यागें याचेनि हित आहे. परि सोडितां सर्वथा भिन्नु नोहे.
पृर्वकृत भोगी; वो ! करिसी काये ? दिगंबरु हा लाहाणा ह्मणों नये. ॥११॥

९७६
अवधूतलक्षणें पाहों आले; ते तद्दर्शनें आपुली वीसरले,
भावगळीत वीकळपणें ठेले; ब्रह्मसायुज्य केवळ संपादलें रे ! ॥१॥धृ॥
कैसी अकळ न कळे देवमाया ? वो ! देवराया वो !
खोडि खावणी ठेविता दत्तात्रेया वो ! काये जाहालें नेणवे द्विजां येयां वो !
तेचि क्रीया सुफळ जाली तयां वो ! ॥छ॥
होतें तें चि आसन बव्ह जालें रे ! पथु कुंठला; वचन विसरले.
दृश्य न दिसे; देखणें मालवलें. स्तब्ध राहिले; निद्रितपरी डोळे. ॥२॥
देहअवस्था न दिसे दृश्यमान. ब्रह्मीं ऐक्य पावलें समाधान.
अनसूया उतरी निंबल्लोण. दिगंबरासि देउंनि आलि मन. ॥३॥

९७७
धावा
बहु दिवस जाहाले, भेटि नाहीं वो !
अनति योगें व्याकूळ; करूं कायी ? वो !
दोन्हीं स्पंदती बाहिया; दत्ता येइं रे !
भेटि देउंनि घेउंनी सवें जायी रे ! ॥१॥धृ॥
अरे ! सखया ! सद्गुरू ! देवराया ! रे !
प्रीति लागली; न सूटे दत्तात्रेया रे !
मायेबापा ! सांडिसी झणें माया रे !
तुजवांचूंनि सकळ अर्थु वायां रे !
दाऊं हृदय फोडुंनि कवणातें ? दत्तेवाचूंनि न सवे माये मातें.
भेटि करा वो ! जा तुह्मीं तेणें पंथें वो !
दिगंबरू स्वजनु वसे जेथें. ॥२॥

९७८
येक भजती, पाल्हाळ, कर्मवादी रे ! कर्मवादी रे !
येक सेविती देवता भेदबुद्धी रे ! येक वादप्रसक्त पदोपदीं रे !
ते र्ही काहीं चि नेणिजे मतिमंदीं रे ! ॥१॥धृ॥
नाहीं नाहीं सद्गुरूवीण गती रे ! नाहीं मुक्ती रे !
वायां करिसी प्राणिया आधावती रे !
आतां पुरे; सांडि ते सकळ मती रे !
सेवी श्रीगुरुचरण पुडतोपुडती रे ! ॥छ॥
जटी, मुंडी भ्रमती दश दिशारे !
मौनमुद्रा आसनबंधु ह्मणती दशा ! युक्तीवादें नेणवे परमपुरुषा रे !
जन्म वाउगा दवडीती येक ऐसा रे ! ॥२॥
येकीं सांडिलें केवळ अन्नपान रे ! येक तापस करीती अनुष्ठान रे !
दिगंबरू नेणती मतीहीनु रे ! तया अविद्या निरासु कैंचें ज्ञान रे ! ॥३॥

९७९
क्रोधु भरला अंतरीं; वरि स्नान रे !
जपु मुद्रा. देवाचेंन खोटें ध्यान रे !
तीर्थें धूतलें अपवित्र जैसें श्वान रे !
तैसें विहिज जात सेव्यावीण रे ! ॥१॥धृ॥
रोषु सांडी रे ! आलया परोपरीं रे ! जन्मोजन्मीं हा लागला तुझा वैरी रे !
सुख नाहीं याचेनि संसारीं रे ! मोक्षपंथिचा तस्करु मारीं, मारीं रे ! ॥छ॥
क्रोधी करीतो तपसु; जाय वायां रे !
कित्ते संन्यास नाशिले, नेणसि काह्या ? रे !
देवद्रोही येणें होसी करितां क्रीया रे !
गुरुभजनीं अरिष्ट पावावया रे ! ॥२॥
येणें पावला कवणु पारपारू ? रे ! येणें नरकु चूकला कवण नरू ? रे !
वायां जातुसे सकळ यथाचारू रे ! धर्माचारू रे !
भज याचेनि संन्यासे दिगंबरू रे ! ॥३॥

९८०
देहीं कामना, कल्पना विषयांची रे. वरि क्रीया रे ! केवळ सात्विकाची रे !
बकु तापसु कवण गति त्याची ? रे !
तैसें मायीक वीफळ अवघें ची रे ! ॥१॥धृ॥
सेवीं सेवीं आलया ! वीतरागू रे ! तेणेंवीन सकळैक वृथा योगू रे !
गुरु न संगे सांगतां नलगे मागू रे !  कृष्णपटावरि नुमटे रंगू रे ! ॥छ॥
जैसें कुपथ्य भेषजगुण नाशी रे ! मुखीं वमन वरि वरि तोंड पुसीं रे !
कामकामी तयाची गति ऐसी रे !
दिगंबरें निःकामता दुःख नाशी रे ! ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP