मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद ३६१ ते ३८०

दासोपंताची पदे - पद ३६१ ते ३८०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


३६१
शाब्दीक - ज्ञान पदहस्त - धन; स्वकीय ऐसें न ह्मण रे !
श्रमासि कारण शांति - विनाशन न भजती सज्ञान रे ! बापा ! ॥१॥धृ॥
सद्गुरू भजिजे; अभिमानातें सांडिजे; शब्द न सरती येथें तुझे.
मन मारूंनियां खुण बुझें रे ! बापा ! ॥छ॥
मन हें माया, मानसें क्रीया, मन मरेवीण योगु वाया रे !
मनें योगियां पावे तया दिगंबरा अद्वया रे ! बापा ! ॥२॥

३६२
कामु कल्पना मानसें नाना, क्रोधु तयां दशगुण रे !
देहा अधीना वीवेकहीना सद्गति कें दुर्जना रे ! ॥१॥धृ॥
बापा ! वेषें न तरिजे. माजलासि कां गुणमाजे ?
साडी माळा पुस्तक वोझें. गुरू सांगतील तें कीजे रे ! बापा ! ॥छ॥
विषयांची गोडी मनें आवडी. ज्ञानवादी यें प्रौढी रे !
ऐसा पाषांडी सूमत खंडी. दिगंबराते न जोडी रे ! बापा ! ॥२॥

३६३
आत्मयारामा ! स्वरूपश्यामा ! योगधीमनस - विरामा ! रे !
निःकामकामा ! मंगळधामा ! तुझा संगु सप्रीयु आह्मा रे ! ॥१॥धृ॥
सखया ! पाउलें पाहिन. तेणें आनंदें राहीन.
मन प्रेमा गें ! गोवीन. न परतें मी तेथून. ॥छ॥
सुवर्णवर्णा ! योगनिधाना ! आदिगुरो ! गूण - हीना ! रे !
ब्रह्मसंपूर्णा ! असर्वधाना ! दिगंबरा ! सगूणा ! रे ! सखया ! ॥२॥

३६४
प्राणासि प्राणू हा कृष्ण - तनू, परब्रह्म सगूण गे ! माये !
भक्तां अधीनु आनंदघनु. कैसा शोभे पद्मनयनु ? ॥१॥धृ॥
गे ! बाइये ! तया मीं वेधलियें. आपें आप स्थिरावलियें वो !
बिंब गीळुंनि राहिलिये वो ! भेद - हीनत्व पावलिये वो ! ॥छ॥
चिद्रूण - भासू भेदविनाशू योगिहृदयपरितोषु गे ! माये !
निराभासु, स्वयंप्रकाशु, दिगंबरु, सुरधीशु, बाइ - ये !॥२॥

३६५
डोळ्याचा डोळा अवधूतु पाहिन नयनी.
उतावीळ मन माझें वेधलें गुणीं. ॥१॥धृ॥
संगें संगें संगें रमइन गुरुचरणीं. दुजें नाहीं मना सुखकर केवळ जनी. ॥छ॥
देहिचा देखणा गुणगणसंगवीरहीतु दीगंबरु दीनत्राता भेदवर्जितू. ॥२॥
३६६
पाहातां वदन येणें मन हरिलें गे ! माये !
परती न धरी देहीं. आतां करणें काये ? ॥१॥धृ॥
संगें संगें संगें येणें मज गुणीं गोविलें.
विसरली संसारिक मीं. हें देह न कळे. ॥छ॥
देहचि अदेह मजप्रति जाणवे विवेकें.
दिगंबरीं तन्मय मीं रंगली सुखें. ॥२॥

३६७
पाहातां पाहातां परवृत्ती पाहाणें बुडालें.
न पाहातां दीसे सखिये ! तें रूप न कळे. ॥१॥धृ॥
ऐसें कैसें कैसें विपरित घडलें ? माये !
देहीं देह हारपलें; आकृती नये.
जनीं वीजन सखिये ! भावना गळाली.
दिगंबरें निद्रा नव्हे; परि जागृती नेली. ॥२॥

३६८
जागृति ना स्वप्न सखिये ! वो ! मनस विरालें.
सुषुप्ति नां तुरीया ऐसें काय वो ! जालें ? ॥१॥धृ॥
ऐसें कैसें कैसें सखिये ! वो ! याचें साजणें ?
आप पर पारूषलें रूपी देखणें ! ॥छ॥
अगुणाचा गूणू तो मज लागला गे ! माये !
दिगंबरु मीचि; मीं पर दुसरें काये ? ॥२॥

३६९
बहुतां जन्माचा जिवलगु जीविचा विसावां
अवधूता ! तूं माउली; भेटसी केव्हां ? ॥१॥धृ॥
पाहें, पाहें, प्रतिक्षणीं तुझी वाटुली.
जगजनका सत्यमूर्ती चेतने मूळीं. ॥छ॥
अगुणू गुणात्मा गुणगणवर्जनू विसावां
दिगंबरा ! तुझा संगू आवडे जिवा. ॥२॥

३७०
ध्यान करूं कैसा ? बहु मन चंचळ विकारी.
विषयांची चिंता, अवगुणू लागला वरी. ॥१॥धृ॥
कैसें करणें ? मन माझे सोये न धरी.
हृदयींचा द्रष्टा, तुजप्रति काइसी चोरी ? ॥छ॥
अवधूता ! आतां निजहित कवण करावें ?
दिगंबरा ! तुझें स्मरण धरिलें जिवें. ॥२॥

३७१
काम - प्रकोप कोपा गुण - करणी गुण - करणी हराशु नोहे रे ! ॥१॥धृ॥
रे ! भ्रमिका ! भ्रमी तें कैसेनि सोडिजे ? भ्रमणें विभ्रमु भोगिजे. ॥छ॥
दिगंबरा ! देवा ! श्रीचरणीं श्रीचरणी विक्षेपु होये रे ! ॥२॥

३७२
योग - विक्षेप - ताप विष - हरणी विषहरणीं उपाॐ नव्हे रे ! ॥१॥धृ॥
रे मनसा शीतळ चंदन नमने, चांडु तपे, खरतर चांदिणें. ॥छ॥
दिगंबर - गुरु - भजनीं गुरुभजनीं विश्वासु नोहे रे ! ॥२॥

३७३
येका सद्गुरूवीण बहु भजनीं बहु भजनी विश्वासु वायां रे ! ॥१॥धृ॥
रे ! मनसा ! श्रवणें मननें भजिजे. निदध्यासें पद पाविजे. ॥छ॥
दिगंबरीं चित्त सम करूंनी सम करूंनि विश्रांती पाहीं रे ! ॥२॥

३७४
दृष्ट अदृष्ट भान गुणकरणी गुणकरणीं आभासु दीसे रे ! ॥१॥धृ॥
रे ! हरणा ! तरणींचें जळ न भजे. मायामय मना हें मानिजे. ॥छ॥
दिगंबरे खूण भवहरणी भवहरणीं विश्रांति लाहिजे. ॥२॥

३७५
श्रमतां आयासपंथें गुणकरणीं गुणकरणीं विश्रांति नाहीं रे ! ॥१॥धृ॥
रे ! मनसा सहज विश्रांति भोगिजे. नीज - निष्ठा निश्चळ राहिजे. ॥छ॥
दीगंबरू आत्मा गुणहरणी गुणहरणी निश्चळ आहे रे ! ॥२॥

३७६
नदियाकल्लोळ - जळे बहु धरणी बहुधरणी संप्लूत जाली रे ! ॥१॥धृ॥
रे ! चातका ! गगनी जीवन झेलिले. महिगत सलील न भजे. ॥छ॥
दिगंबरेंवीण बहुभजनी बहुभजनीं विश्वासु नेघे रे ! ॥२॥

३७७
आदितत्वगुणवर्जित निर्गुणपर निरंजन नीरंजनपर नीरंजन रूप.
ज्ञानगम्य गुणसाम्य सनातन परमानंदस्वरूपा ! ॥१॥धृ॥
अवधूतरूपदया ! शिवशंकरवर सच्चित्पर - सार
कृष्ण श्याम - रूप राजीव - लोचन सेवीन मी निरंतर. ॥छ॥
बंध - मोक्ष - हीन शुद्ध - सनातन पद सचिद्धन माये !
दिगंबर दीनजन - दयाकर हृदयीं भासत आहे. ॥२॥

३७८
योगिराज - रूप ज्ञान - दयाकर वर - माये ! पर - माये !
मनस विगुंतलें त्याचां सेवनीं. तेथूंनि परति न साहे. ॥१॥धृ॥
अभिनवरूपगुणान्वित निर्गुण गुण - संजीवन माये !
देवदेव दीन - दया - मंदिर देखइन कयीं पाये ? ॥छ॥
गुणगणधर्म, विकर्मविनाशन, गुणवीवर्जन - रूप,
दीगंबर परब्रह्म, गुणार्णव, केवळ - मोक्ष - स्वरूप. ॥२॥

३७९
ज्ञानसागरपरविवर्जित, पद सदोदित ब्रह्म.
देशकालवस्तुत्रया परिछिन्नतत्व अरूप अनाम. ॥१॥धृ॥
श्यामळसुंदर, रूपविराजित, गुणमायातीत, माये !
चित्किर्तिभूषण, भेदविनाशन हृदयीं प्रकाशत आहे. ॥छ॥
आत्मब्रह्मज्ञान गुण - दिवाकरपर विश्वंभर - रूप
दिगंबर सुर - मानव - पूजित सेवित गुप्तस्वरूप. ॥२॥

३८०
अवधूत रूप दयार्णव शंकर पर विश्वंभर माये !
परब्रह्म शुद्ध सनातन हृदयीं स्थीर न राहे ! ॥१॥धृ॥
चंचळ हें चित्त, नित्य गुणात्मक, गुणसंपादक माझें.
योग - युक्ति नेणें तत्वाची खुण; भ्रामति विषयरस माजें. ॥छ॥
रजोगुणदोष विशेष विकंपित चळ चंचळ चित्त माये !
दिगंबरेंवीण माझें हे मन सहसा निश्चळ नोहे. ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP