१३०१
संसार निर्जन, येथ बैसवीलें ! सांडुनि जातिसे, माझें काये चाले ?
भरले पाणियें दोन्ही डोळे ! पाहें तर्हीं वो ! परतोनि ! बोलु बोले. ॥१॥धृ॥
अवधूते ! काये मीं करू ? माझा मानिला तुवां भारु;
तुजवांचुनी पडला अंधकारु ! ॥छ॥
क्षितितळ कठिण; सांडिलें स्थूळ; खडसर भूमिका मातें खुपयील !
वरि तपे तापनु; लागती ज्वाळा; दिगंबरे ! कैसी पां नये कळवळ ? ॥२॥
१३०२
गगना चुंबिती ज्वाळमाळा; संसारवन्हि वो ! ऐसा प्रज्वळला !
मज केवि लोटिसी तानयां बाळा ?
ऐसा अपराधु सांग काये केला ? ॥१॥धृ॥
दत्ते ! माये ! वो ! कैसें करूं ? कित्ती सांगपां धीरु धरूं ?
हात देइं वो ! धरीन तुझा करू ! ॥छ॥
दिगंबरा बोलिली ::- अरे ! मंदबुद्धी ! स्वप्नभ्रमु सांडि हा जाग समाधी !
तुजप्रति काइसा हा भवव्याधी ? सत्य तूंचि ! तूं विश्वासु न धरीं भेदीं ! ॥२॥
१३०३
संसारसागरीं जर्जर तारूं काळें देह भंगलें; न दिसे आधारू !
येथ कवणाची मीं कास धरूं ? अवधूता ! पाववी परपारु ! ॥१॥धृ॥
गति कुंठली; परम निदान येथ मज मांडलें; सत्य जाण !
दत्ता ! काये पाहासी ? गेले प्राण ! ॥छ॥
दिगंबरु बोले ::- हें मृगजळ पाहातां चि लटिकें मायाजाळ;
बुडतासि तें मृषा ! निज निश्चळ अधिष्ठान तूं; न भजें हें पाल्हाळ ! ॥२॥
१३०४
संसारनदु वो ! दुस्तरु माये ! कामवेगें लोटली वाहाति आहे !
मागें पुढें पाहातां, अंतु न पाहें !
यत्नु न चले ! ऐसिया करूं काये ? ॥१॥धृ॥
दत्ता ! येइं रे ! देयीं कास ! सादु न घलीं आणिकास !
परहस्तें जाणवे अमृत वीष ! गति कुंठली ! झणें करीसी उदास ! ॥छ॥
जन, वन, सदन, तनु, धन, जाया, वोसाण लागले योगिराया !
न सुटे चि सोडितां; गुंपलें क्रीया ! दिगंबरा ! दुस्तर तुझी माया ! ॥२॥
१३०५
संसार सज्जनविरहित वन; व्याळ परिवेष्ठित कांटवन;
भयप्रदु जाणवे; न धरे मन; येथ बाळ सांडिलें मीं अज्ञान ! ॥१॥धृ॥
दत्ते ! माये ! वो ! सादु देयीं ! न करीं कठिण; परतोंनि पाहीं !
हृदय दुभागलें ! बोलों कायीं ? कंठु दाटला ! न धरे प्राणु देहीं ! ॥छ॥
नीदान जाणवे इतलया वरी; तुजसारखी कवण दुसरी ?
माये पोटीची पडेल वरी; दिगंबरे ! वियोगु पुरे करीं ! ॥२॥
१३०६
संसार सासुरे परजन माये ! दूरुळ भारी वो ! बाघिताहे !
मुख विसरलियें तुझें माये ! केव्हां भेटसी ? वाटुली तुझी पाहें ! ॥१॥धृ॥
दत्ते ! येइं वो ! बहु श्रमलीये ! जन मज पारिखें; दुःखनलीयें !
गुणवेगतपसीं सोषलीये ! कर्म कवण ? तूज मीं अंतरलीयें ! ॥छ॥
काम मुख्य करूंनी साही जण वैरी आगीविण जाळिती ये शरीरीं !
करीं तुझें स्मरण निरंतरीं; दिगंबरे ! आतां न सवे संसारीं ! ॥२॥
१३०७
सात ही सागर भरले न पाहे क्षितितळिचें जळ; चातकु माये !
मेघालागुंनी आळविताहे. अतिशोषला ! शरीर सांडूं पाहे ! ॥१॥धृ॥
तैसी आळवीं. ये ! अवधूता ! गुणमती तापली परमार्थता !
वरि तव वियोगें बहु गुणवेथा ! देइं भेटी सद्गुरो ! कृपावंता ! ॥छ॥
आणिक परावी न करीं आशा. दृढ केलें मनस हें जगदीशा !
शरीर न सोडी जीउ हा कैसा ? दिगंबरा ! संप्राशवीं स्वरसा ! ॥२॥
१३०८
देहीं वडवानळु प्रदिप्तु जाला; तेणें माझें हृदय अरे ! श्यामळा !
अति दग्ध जाहालें ! न धरीं कळा !
तव विरहें प्रळयो व्यक्ती आला ! ॥१॥धृ॥
केव्हां पाहिन तें रूप माये ! कृष्ण, श्यामळ, अवो ! सखिये !
कमळनयनेंविण न राहे; मन माझें चंचळ जालें सैये ! ॥छ॥
देवा ! तुझें दर्शन पीयूषपान; कैं मज होइल समाधान !
दह, गेह नावडे तुजवीण ! दिगंबरावांचूंन माझे प्राण ! ॥२॥
१३०९
हें देह सखिये ! न धरीं प्राण ! अवधूतेवांचूंनि न रमे मन !
मीपण न साहे; वीसरैन ! भावाभाववर्जित लागलें ध्यान. ॥१॥धृ॥
प्रीति गुंतली; न सुटे माये ! वादु वो ! करूं काये ?
अवधूतु आत्मा मज; मीं मातें पाहें ! ॥छ॥
द्रष्टा, दृश्य, दर्शन आलें क्षया ! जाणतां मी मज चिदव्यया !
आपपर न स्मरे ! गेलें लया ! दिगंबरे हरिला भेदु, माया ! ॥२॥
१३१०
सुदिनु जाहाला ! येणें अवधूतें हृदयीं निवळलें चैतन्यनाथें !
तमस विनाशिलें विश्वभरीतें ! मीं मज पाहातां पाहाणें न उरे तेथें. ॥१॥धृ॥
आनंदु जाहाला; गगनीं न स्माये; सिद्धि मज रोकडी जाली माये !
ब्रह्म अव्यय मीं चि, मीं आहे. आतां भेदु पुडती तो न पाहें ! ॥छ॥
अभावदर्शनें देखिलें भान; कार्य आणि कारण सर्व सगुण;
व्यतिरेक अन्वय ठेलें साधन; दिगंबरें दीधलें संनिधान. ॥२॥
१३११
भवदुःखसरीता मीं लोटलीयें ! कामवेगघालणी आंदोललीयें !
गुणजळचरीं विसंचिलीयें; काये करूं ? सखिये !
मानसीं पांगुळलियें ! ॥१॥धृ॥
सादु घालिन ::- ये ! रे ! अवधूता ! योगिजनवल्लभा ! हरीं भववेथा !
तुजवांचूंनि कवणु आहे त्राता ? ॥छ॥
मागें पुढें पाहातां प्रांतु न दीसे. भय भारी जाणवे; छेदे कैसें ?
दिगंबरू ये, तें चिन्ह न दीसे. आतां मग जाइन, जाहालें मज ऐसें. ॥२॥
१३१२
भव दुर्ग दुस्तर; देह बंदिशाळा; कर्म त्रिविध; अवो शंकला !
मायामोहपाश हें बंधन गळा; सुटिका न दिसे;
भ्रमीत जीउ जाला. ॥१॥धृ॥
माझा सोइरा बहु दुरि आहे ! कोण्ही मातु जाणवा ! धरीन पाये !
योगिजन वल्लभु घेउंनि यां उपायें ! ॥छ॥
तापात्रयदंडन कित्ती साहों ? माये ! नाना योनी जन्मतां दुरित चि होये !
दुष्कृत आपजे कर्म अनुपायें. दिगंबरें वांचूंनि
सूटिका मज नोहे ! ॥२॥
१३१३
भवकृष्णसर्पु, वो ! मज दंशियेलें; आत्मभ्रमु जाहाला; लहर आलें.
बहुगुणीं मीनलें, यत्नु न चले; दश्यवेधु होतसे;
धरा वो ! माझे डोळे ! ॥१॥धृ॥
अरे ! श्यामळा ! कमळनयना ! योगिजनवल्लभा ! कालग्निशमना !
दत्ता येइं रे ! येइं ! भवहरणा ! ॥छ॥
जाले धर्मरहित करणगण; माझें मज न कळे, भुललें मन !
करितां सोसणी, वय जालें क्षीण; दिगंबरा !
कित्ती पाहासिल निदान ? ॥२॥
१३१४
दूरळ सासुरें बहु पिडिताहे; पूसति ::- बाइया ! तुज कोण्ही आहे ?
तियाप्रति बोलतां शंका होये. माये माझी कठिण;
कैसें मीं करूं ? माये ! ॥१॥धृ॥
धिग्य जन्मु हा गेला वायें वीण; अवधूतें ! मांडलें कठिणपण !
परति न करीं. पाहीन मीं वदन. ॥छ॥
ललाट पीटितां बहु श्रमलीयें; कवण बुझावील मग वारलीयें.
दैव उणें येथ पडलीये; दिगंबरेंवांचूंनि वायां गेलियें. ॥२॥
१३१५
दिशा अवलोकिन; पाहिन पंथु; देखईन कइं वो ! येतां अवधूतू ?
स्फुरतिसे बाहुली; नयन लवतू; पैल कवणू उचलीतुसे हातु ? ॥१॥धृ॥
चिन्ह मोटकें, श्रीदत्तु आला; भाली चंदनतिलकु पिवला;
कमलनयनु नेसला सोनेसळा. ॥छ॥
मागें पुढें धांवती अवो ! निजगण; ते माझे सखिये ! बंधूजन.
अतिप्रिति देइन आलिंगन; धरूंनि पालउ मीं सवें जाइन. ॥२॥
पुसतील बाइया ::- हे वो ! कवण ? तियाप्रति दाविन्हें गोतधन.
दिगंबरु बापु; हे बंधुजन. ययांसवें जातिसें मीं; नयें परतोन. ॥३॥
१३१६
बहु दिन लागले; श्रमलासि काये ? बापा ! श्रीदत्ता !देखियेले पाये !
आतां मज येथूंनी घेउंनि जाये !
पालउ धरीन मी; वेगळी न राहें. ॥१॥धृ॥
धन्य सुदीनु ! आजि दिवाळी; दत्तु भेटला यये कालीं !
आलिंगन दीधलें मज हृदयकमळीं ! ॥छ॥
पाहांतील जाइया नेतां देवदेवा; तियांप्रति मीं ह्मणे ::- लोभु न संडावा;
भेटि नाहीं पुडती, खेदु न करावा. दिगंबराचिया जाति असे गावां. ॥२॥
१३१७
अवधूतु सखिये ! माझें प्राणधन, जीवन जीविचें, योगनिधान,
प्रतिक्षणी बाइये सांभाळीन;
जळो ! जळो ! वो ! चंचळ माझें मन ! ॥१॥धृ॥
वेगां येइं रे ! जळजनयना ! स्थिरू राहीं मानसीं, कृष्णवर्णा !
तुझा संदु लागला नित्य मना ! ॥छ॥
भरिन श्रवणी याचें नाम; रूप नयनीं मनोरम;
तेवि चि सकळ करणधर्म ! दिगंबरा ! हृदयीं तुझें प्रेम. ॥२॥
१३१८
रूपें सावळा; मळपतु चाले; चंदन चर्चिलें, तें परिमळें;
वस्त्र पातळ सोनेसळे; तया पाहातां नीवती माझे डोळे. ॥१॥धृ॥
दत्ता ! येइं रे ! देइं आलिंगन; बहु दिन क्रमले भेटीविण !
तुझा वियोगु न साहे माझें मन. ॥छ॥
परब्रह्म पूतळा, कमळनयनु; जीवीं जीउ सखिये ! माझा प्राणु;
मायेबापु वो ! नव्हे परजनु; दिगंबरें हरिला माझा मनू. ॥२॥
१३१९
जीविचें आरत माये ! परियेसीं ::- धावोंनि जाइन बापापासीं.
नाहींमज वारितें; मीं वो ऐसी !
हा जरि न बोले, तरि देईन प्राणासीं. ॥१॥धृ॥
तुझें आलिवे श्रीगुरुराया ! पासीं बैसवीं दत्तोत्रया !
पूसीं, पालवें नयन, योगिराया ! ॥छ॥
भवपुरीं क्रीडतां श्रमलियें भारी ! छाया कोठें न दिसे ये संसारीं !
भय भारी वाटलें, होतिसें दूरि; धावोंनि आलियें तो श्रमु माझा हरी ! ॥२॥
तुजवरि आत्मयां अरे ! योगिराया ! आंग मीं घालि सांडूंनि माया !
० ० जायिल तेणें वायां ! दिगंबरा ! दाविसी द्वैत काह्या ? ॥३॥
१३२०
निज स्वरूप कैसें ? मी नेणें; गुणी गुपली तुझेनि गूणें.
नये आणितां विसरू मनें. अवधूता ! हें जीविचें जाणें ! ॥१॥धृ॥
आत्मयां ! कमळनयना ! श्रीदत्ता ! गुणनिधाना !
तुझा वेधु कवलिं या मना; बोधु दुसरा तेथ उरे ना. ॥छ॥
माझें मन परति न साहे ! तुझा रूपीं मिसलत आहे.
व्यवहाराची सांडूंनि सोये, दिगंबरा ! धरीतसें पाये ! ॥२॥