दासोपंताची पदे - पद ५४१ ते ५६०
दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥
५४१
वायां दुःखाचें करितासी हळाहळ. जळ - धरीं पेळितासी. ॥१॥धृ॥
ऐसें न करीं रे ! निर्वाण. भवविभ्रमें भ्रमित जालें मन. ॥छ॥
दिगंबरा ! तूज संसारू नाहीं. माझा अनुभउ जाणतासि काहीं. ॥२॥
५४२
भय - जनकु होउंनि प्रकटसी; तरि कवणा सांगिजे ? परियेसीं. ॥१॥धृ॥
देवा ! न करी रे ! वेदना, भवजनित - सकळ - दुःखदळना ! ॥छ॥
दिगंबरा तूं सद्गुरू. आतां उतरीजा विषयविखारु. ॥२॥
५४३
रूपें सावळा डोळसू; पीवळासा वरि वासु; ॥१॥धृ॥
ऐसा कैं देखैन येतां ? बाहुली लोडवीतां. ॥छ॥
दिगंबरीं अत्यासक्त जाहालें माझें चित्त. ॥२॥
५४४
आंगीं चंदनाची उटी; पीत मळिवटु लल्लाटीं; ॥१॥धृ॥
ऐसा पाहिन कैं मीं डोळां ? अवधूतु भेटी आला. ॥छ॥
दिगंबराचें दर्शन मातें वो ! अमृतपान. ॥२॥
५४५
उचलूंनि दोन्हीं भूजा मायेबापू आत्मा माझा, ॥१॥धृ॥
येतां कैं मी पाहिन नयनीं ? मस्तकु ठेवीन चरणीं ? ॥छ॥
दिगंबराचें मज ध्यान, कईं होइल दर्शन ? ॥२॥
५४६
ना भि, ह्मणौनि सत्वरु उचलूंनि दक्षिण करु, ॥१॥धृ॥
येतां कै मीं पाहिन ? माये ! अवधुतु. धरीन पाये. ॥छ॥
दिगंबराचें भेटणें मोक्षासि आणि उणें. ॥२॥
५४७
पुढें धावतां सत्वरू मागें भक्तांछा परिवारू; ॥१॥धृ॥
ऐसा येतां कैं देखैन ? अवधूतीं लागलें मन. ॥छ॥
ब्रह्मविद्येचा सागरु. अवधूतु दीगंबरू. ॥२॥
५४८
चाली चालतां डूलतू. आनंदें सबरा भरितू; ॥१॥धृ॥
ऐसा देखैन कैं मीं देवा ! अवधूतु प्राणविसांवां. ॥छ॥
दिगंबरा ! हा संसारू अति तापनु, खरतरू. ॥२॥
५५०॥
वीसरली बाळक वनी. कैसी धांवतिसे जननी ? ॥१॥धृ॥
तैसा कैं येसील माहेरा ? दत्ता ! कृपांबुसागरा ! ॥छ॥
दिगंबरा ! तूंतें मोहो लावावा कवणें स्नेहो ? ॥२॥
५५१
मायेबापाचें लेंकरू मी कवणाची आशा करूं ? ॥१॥धृ॥
माझा श्रीदत्तु दावा नयनी. आळंगीन हृदयभुवनी. ॥छ॥
दिगंबराचें आळिवें मातें उपजत त्याची सवे. ॥२॥
५५२
काये पाहों मागें पूढें ? माझा श्रीदत्तु कवणीकडे ? ॥१॥धृ॥
मातें गेला वो ! साडूंनी. वोळले जळधर नयनी. ॥छ॥
दिगंबरु दीनत्राता सुखसागरु हा सर्वथा. ॥२॥
५५३
अवधूते कुरंगिणी ! तुझें बाळक धरिलें वनी. ॥१॥धृ॥
आतां सांडि भूतृणचारा. धांव घेई सैरावैरा. ॥छ॥
दिगंबरा ! वेंगें आली. मीं वो ! सिंगारी घाली. ॥२॥
५५४
अवधूते वो ! पक्षिणी ! कणुं वेंचीं झडकरूंनी. ॥१॥धृ॥
तुझें बाळक पडिलें फांसां. कवणाची करिल आशा ? ॥छ॥
दिगंबरा ! वेगें आली. मन्मूखीं मूख घाली. ॥२॥
५५५
दुबळांची मीं नव्हे. मातें गांजिताति अघवे. ॥१॥धृ॥
माझा श्रीदत्तु केवो आहे ? बोलवा, धरीन पाये. ॥छ॥
दिगंबरु माझी माये. आणिकांचा शब्दु न साहे. ॥२॥
५५६
अवधूता ! रे ! जळधरा ! कइं वोळसी अमृतधासा ? ॥१॥धृ॥
तुझें चातकु मीं पांखीरूं; कवणाची आशा करूं ? ॥छ॥
दिगंबरेंवीण आन न करीं अमृतपान. ॥२॥
५५७
मायेबापें वो ! सांडिलें ! आकाश येउंनि पडिलें ! ॥१॥धृ॥
दुःख सांगावें ते कित्ती ? सखिये ! पुडतो पुडती. ॥छ॥
दिगंबरें या - वांचूंन मीं ऐसेचि देइंन प्राण. ॥२॥
५५८
तुझा होउनि तरला जनु. न्यां अपराधु केला कवणू ? ॥१॥धृ॥
दत्ता ! आळवितां न येसी. अपराधी होइन दासी. ॥छ॥
दिगंबरा ! बोलें गोठी ::- कां लावितासि चटपटी. ॥२॥
५५९
आठवीतां तुझें गूण दोन्ही सजळ जाले नयन. ॥१॥धृ॥
दत्ता कैं येसील भेटी ? प्राणपंचक धरिले कंठीं. ॥छ॥
दिगंबरा ! तुझे ध्यान होये दुःखाचें कारण. ॥२॥
५६०
नामघोषाचें गर्जन तेथें वियोगु आठवी मन. ॥१॥धृ॥
ते बा ! खरतर सायक साहों. कैसा मी निश्चळ राहो ? ॥छ॥
दिगंबरा ! तुझें नाम तेंचि वियोगदुःख परम. ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 17, 2016
TOP