७४१
द्रष्ट्रा तो कवणु ? तूं तुझां ठायीं. पाहासी बोलाचा आश्रयो कायी ? ॥१॥धृ॥
प्रत्यक्षासि नाहीं प्रमाण दूजें. तीचेनि मूळें आपण बुझें. ॥छ॥
आत्मा दीगंबरु असतां सिद्धा. युक्ति प्रयुक्ति काइसे वाहा ? ॥२॥
७४२
अप्रमेय ज्ञेय दुसरें नाहीं; प्रमाण वारलें; बोलसी कायी ? ॥१॥धृ॥
गुरु गाय ते वेगळी खूण. येथ अनुभउ सिद्ध प्रमाण. ॥छ॥
दिगंबरीं बोल न सरती काहीं. जाणोनि राहिजे ठांइंचें ठायीं. ॥२॥
७४३
दृष्टीचें देखणें लागलें नभा. नभ चोप सांडी; उरला गाभा. ॥१॥धृ॥
जाणते ! हो ! खुण जाणोनि पाहा. पाहाणें सांडंनी ठाइं के राहा ? ॥छ॥
दिगंबरीं नभ उभें चि विरे. वरि तया सुख अवघें भरे. ॥२॥
७४४
प्रळयाची खुण पाहोंनि डोळां, डोळाचें देखणें लाविलें मूळा. ॥१॥धृ॥
मूळ तें समूळ निर्मूळ जालें. जळ जळाप्रति आटोनि ठेलें. ॥छ॥
दिगंबरीं ऐसें असें निभान. भानेंसी अवघे भानअभाव. ॥२॥
७४५
व्यक्तीचा कंचूक उडोनि गेला.
अभावाचा भाॐ स्वभाॐ जाला. ॥१॥धृ॥
शून्येंसीं जाणणें न करीं गे ! माये !
शून्य शून्यतया शून्य न साहे. ॥छ॥
दिगंबरीं शून्यअशून्य नाहीं. स्वरूप संचलें ठाइंचें ठाइं. ॥२॥
७४६
बाह्य ना अंतर अंतरें जालें. ब्रह्म सदोदीत सर्व आतलें. ॥१॥धृ॥
तें वर्म बोलतां नये. बोलु बोलु तया बोलविताहे. ॥छ॥
दिगंबर परब्रह्म, अगुण, प्रत्यक्ष जाणतां आपुली खूण. ॥२॥
७४७
सन्मय सागरीं विश्व बुडालें तरों जाणे ते जीत चि मेलें. ॥१॥धृ॥
तयाचा मीं संगु न धरीं देवा भ्रमु, श्रमु जीवा लागइला. ॥छ॥
दिगंबरीं विरे तरंगु जैसा, अवघाचि मग तें तो होये आपैसा. ॥२॥
७४८
दृश्य हें विवर्त्तु दर्शना पोटीं. द्रष्टा तो आश्रयो, ऐसी त्रीपुटी. ॥१॥धृ॥
येक चि मींपण सोडितां सूटे. नीजानंदघन सहज प्रकटे. ॥छ॥
दिगंबरीं सर्व कल्पीत भान. कैंची त्रीपुटी ? कैचें मींपण ? ॥२॥
७४९
ज्ञेय हा प्रपंचुविवर्त्तु ज्ञानीज्ञानगुणकृत माझा चि स्थानी. ॥१॥धृ॥
अज्ञानाचा संगु फळला हा मातें. स्वप्न येणें मतें देखतुसें. ॥छ॥
दिगंबरीं ज्ञानें जागृति जाली. अतत्वभावना पदीं निमाली. ॥२॥
७५०
त्रिमिराची दृष्टि द्वैतची खाणीं; येक पाहे तेथें दीसती दोनि. ॥१॥धृ॥
जीवईश्वर हे कल्पना माझी; वृत्तीचा वीलयीं नीमालीं सहजीं. ॥छ॥
दिगंबर वृत्तिरहीत जालों. जीकें ईश्वरेंसीं सहीत ठेलों. ॥२॥
७५१
मी मातें जाणतां अवृत्ति जाली. प्रवृत्ति तीचेनि अंगें उठिली. ॥१॥धृ॥
भानाची उप्तत्ति जाली गे ! माये !
निद्धारीतां माझा मीं चि मीं आहे. ॥छ॥
दिगंबरु येक सबळ भान, नामरूपगुणधर्मविहीन. ॥२॥
७५२
सूर्याचा किरणीं आभासु जाला. तेणें मृगजळें कवणु धाला ? ॥१॥धृ॥
तैसा हा प्रपंचु मज माजि भासे. भजसीं आनु नसे निद्धारितां. ॥छ॥
दिगंबर सत्य, येक, अद्वया, प्रपंचाचें भान ग्रासुंनि ज्ञेया. ॥२॥
७५३
आत्माविश्वा ब्रह्म प्रतीति जाली. भेदा वीसंवित्ति नाशोंनि गेली. ॥१॥धृ॥
आतां पुररपि न भूलें देवा ! देवभक्त भावा जाणितलें. ॥छ॥
दिगंबरीं द्वैतअद्वैत सिद्धा ! जाणती तत्त्वज्ञ तत्वप्रबुद्धा ! ॥२॥
७५४
वायांगुनस्पंदु अनुभउ बोलों.
कवणु कैसा हो ? तें काये मीं जालों ? ॥१॥धृ॥
जें जैसें होतें, तें तैसें आहे. सांगतां, बोलतां, परिसतां नये. ॥छ॥
दिगंबर शिव, सहज, सम, सर्व, खलु, जग केवळ ब्रह्म. ॥२॥
७५५
सरळ, बरळ, करळ, सैराळ भांडे.
नाचती वाकुडे, वेडे, बागुडे. ॥१॥धृ॥
तेथें कान काये देउंनि करणें ? देखलयाप्रति लाजीरवाणें ! ॥छ॥
दिगंबरेंवीण ऐसेचि सर्व. नीच नवें; परि नव्हे अपूर्ण. ॥२॥
वैराटिका.
७५६
दृष्टीचा विषयो अवघा चि खोटा.
दर्शनाचा वेधु तेथें वोखटा. ॥१॥धृ॥
कासया तळमळ करितासि जन. सत्य निरंतर जाण पां ! खूण. ॥छ॥
आत्मा दीगंबरु सत्यस्वरूप. तेणेंवीण सर्व भजतां पाप. ॥२॥
७५७
पासीं चि अमृत; लागला थानीं !
गोचिडा रक्ताची होतसे धणी. ॥१॥धृ॥
जवळी चि निधा; जन चूकले ! आत्मयां नेणोनि विषयी जाले. ॥छ॥
दिगंबरा ! ऐसें तुज चि पासीं असतां, हें जन विषय सोषी ! ॥२॥
७५८ अ
आडिचें शरीर करूनि परुते,
कवणु आहासि ? तें सांग, पां मातें. ॥१॥धृ॥
बहु वाग्जाळ उसपीसी कांह्या ? तूं चि ब्रह्म; येर सकळ माया. ॥छ॥
देहीं दिगंबरु येकू चि द्रष्टा; द्रष्टात्वाचा भाॐ सांडूंनि खोटा. ॥२॥
७५८
हंसाचिये गती वायसु चाले; परि तो हसुं हें जनु न बोले. ॥१॥धृ॥
तैसें जाणपण आणिसी काह्या ? अंतरीं अज्ञान; बाहेरी माया ! ॥छ॥
दिगंबरेवीण साधुता नये. मूढें केलें कर्म वाया चि जाये. ॥२॥
७५९
कोकिळ काळी; वायसु काळा. वसंतीं दोघांचा निवाडु जाला ! ॥१॥धृ॥
शब्दाची पारखि जाणता जाणे. साम्यदृष्टी न मनें जाणतया. ॥छ॥
दिगंबरेंवीण साधुता नाहीं. वेषु कवणे ठायीं मीरवैल. ॥२॥
७६०
कोळिसांचें धन उजळिसी कांह्या ?
दीधले ते रंग जाती वायां. ॥१॥धृ॥
खलेंसीं संवादु न करीं सुजाणा ! खळु खळपणा केवि सांडी ? ॥छ॥
दिगंबरें येणें सांडिला खळु, निंदकु, पातकी आणि तोंडाळु. ॥२॥