मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद ९४१ ते ९६०

दासोपंताची पदे - पद ९४१ ते ९६०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


९४१
सासुरवास.
संसारु नित्य वैरी; दूर देशु वो ! भारी !
सासुरें मज माये ! पडलियें घरीं.
विश्रांति ते न लाहे; श्रमु होतुसे भारी !
सांगिजे प्रति कवणा ? नाहीं सखी दूसरी. ॥१॥धृ॥
ये रे ! अवधूतराया ! माझी सांडली माया !
कां दूरि धरितासि ? परति करि आत्मयां ! ॥छ॥
कामु तो सासुरा वो ! माझी कामना सासू !
अनूज क्रोधु तया; माझा करील ग्रासू !
कल्पना नणदूली; तीचा नाहीं विश्वासू !
अभिमान देर भावे; ऐसा जनु बव्हसु ! ॥२॥
जोडितीं कर्मफळें तीं हीं चि सकळें !
पुरुषु धर्महीनू तया कांहीं न कळे !
जोडि का नव्हे ? माये ! माझें काये वो ! चाले ?
जालियें अधीन तयांसी; कर्म भोगी आपुले ! ॥३॥
याचें विहीत माये ! मज हीत वो ! नोहे !
कामें विकळ पडली; माझे भागले पाये !
तृष्णे अधीन जीणे; तिसी पूर्णता न ये !
काळज, मनस माझें तीणें फोडिलें आहे ! ॥४॥
रोषआवेशभावे दर्पु केवि साहावे ?
उभें चि नाचवीती, दुःख भोगितां जीवें !
बाळोंनि कोळ जाली; विश्रांति न पवे !
अग्नीवीण जळतीसें; मज येथ न सवे ! ॥५॥
वमनमिश्रित अन्न उछिष्ट भक्षण
माते करवीताती ! केवि करूं प्राशन ?
माने धरूंनि पीळिती गर्व; अति दुर्जन !
विषयासक्ति माये ! तीचें ऐसें विंदाण ! ॥६॥
माहेर आठवलें ! दुःखे हृदय भरलें !
नयनीं अश्रुपात जळधर वोळले ! ! !
तें अन्न सेवितां वो माझें मन कांटाळे !
मातेसि जाणवा कां मज ऐसें जाहालें ! ॥७॥
बापासि लाडिकी वोळलेन वाढली.
त्याचें उछिष्ट घेतां  पाठिमोरी मीं जाली !
तें चि हें फळ माये ! संसारीं पडली !
आतां न भूले; दत्ता ! थोर चूकि घडली ! ॥८॥
दत्तेसि येकली मी; काम न करी तीचें !
तैं तें चि गोड जालें हें फळ तयाचें ! ! !
ते मज दूरि जाली; मुख पाहिन कैचें ?
मीं कीं श्रीयोगिराया बाळक पोटिचें ! ॥९॥
सहस्र अपराधी मीं तुमचें दीन !
आतां श्रवणु पीळिला ! न चुके येथूंन !
माये तूं बापु माझा मज दुसरें कोण ?
कवणा शरण जाइजे तुझें समर्थपण ! ॥१०॥
उदरीं वाढवीलें; स्तनपान म्यां केलें !
नेणोंनि अपराध नाहीं कित्ती घडले ?
आतां तें वीसरावें येणें ऐसेनि काळे !
परतोनि मुख दाखवीं येकु वेळ आपुलें ! ॥११॥
संसारदुःख भोगितां आली मरणावस्था !
वियोगबाण प्रखर कां हाणसी ? दत्ता !
दुःख दुणावताहे; कवण जाणैल वेथा ?
दर्शनामृतरसें उपचारीं समर्था ! ॥१२॥
ऐसें स्मरण करितां लयविक्षेप आले !
तुझें स्मरण हरूंनि मज मारूनि नेले !
यावरि प्राणु देईन; नव जाये साहिलें !
परति न करीसी तुं, तरि माझें काये चाले ? ॥१३॥
स्मरणें प्रानु देईन; खङ्ग घेतलें करीं !
मोठकें उचलूंनी हांणावे तें उरीं !
तवं नामघोष जाले येकसरें अंबरीं !
नीसाण वाजिनलें जाणवलें अंतरीं ! ॥१४॥
बापु श्रीदत्तु आला; पाहों गेली अवलीला !
दूरूंनि रूप देखिलें सुंदरु सावळा !
मागें स्वजन धांवती; न टके तयांला !
योगी श्रमीत जाले; वेगें ऐसेनि आला ! ॥१५॥
भाळीं श्रीगंधु पीवळें; चंदनें डवरला !
सुमनसर कंठीं, सुवर्णमयु सेला !
पालउ रूळतसे, न संवरी तयाला !
“ नाभी ” वचनें वरदू धांव घेतू चि आला ! ॥१६॥
मानसीं धीरु न धरे; धांव घेतली लाहें !
गलया झोंबिनली दत्तु माझी वो ! माये !
दे प्रीती आलिंगन; मीं मोकली धाये !
कंठासि पैसु नाहीं; दुःख बोलता न ये ! ॥१७॥
मजहुंनि दुःख आगळें पीतयासि वो ! जालें !
ते वृत्ति क्षीण करितां प्रयत्नु न चले !
ऐसी, मिळणी ! सखिये ! दोघां अश्रु चालिले !
प्रसंगु तो चि; मीं वो ! देवदेवेसि बोलें ! ॥१८॥
तुं माझें पांघुरण ज्ञानसागरा, जाण !
हा काळुवरि उघडी; दुःख साहिलें गहन !
आतां उदरीं घेउंनि मज करी जतन !
संसारुदावीं झणें माझे जातील प्राण ! ॥१९॥
मी तुझें वत्स दत्ता ! तूं जननी गाये !
चाटी शरीर माझें आंगाचेनि मोहें !
हुडकीन कास तूझी; क्षुधा लागली आहे !
उपवास बहु घडले; तुझी नेणतां सोये ! ॥२०॥
पक्षिणी अवधूते; मीं तुझें वो ! पीलें !
पांखी करूंनि दडवी; व्याधा हातिचें गेलें !
झणें वेगळें करिसेसे; म्यां लाविले डोळे !
संसारुसासुरें वो ! मज बहु पीडिलें ! ॥२१॥
बोले श्रीदिगंबरू ::- न दवीं संसारु;
श्रमें तुझेनि आह्मा श्रमु होतुसे थोरू !
दोघांसि भेटी जाली; आतां श्रमु अपारू
मजवरी दृष्टि घालुंनी वीसरे समग्रू ! ! ! ॥२२॥

९४२
आशा होती केली. निराशा जाहाली.
अवधूता ! सत्य सांग, ऐसी का दूरि ध्येली ? ॥१॥धृ॥
धिग्य ! जन्मु वायां गेला ! श्रीदत्तु रूसला. ॥छ॥
दिगंबरा जाण, अनाथ मीं दीन.
माये बापु तूं सद्गुरू; आतां न करीं कठीण. ॥२॥

९४३
येणें मिथ्याचारें ! जाति असें पुरे.
मागें पुढें नाहीं मज तुजवांचुनि सोयेरें. ॥१॥धृ॥
दत्ता ! कास देयीं मज; हृदयीं ध्यातिसें तूज. ॥छ॥
कामाकुळ चित्त; जाली अति भ्रांत;
दिगंबरा मायापुरीं गेलें स्वहीत वीहीत. ॥२॥

९४४
निडळावरि बाहे; वाटुली मीं पाहें.
न दिसे वो ! अवधूतु ! आतां मोकलीन धाये. ॥१॥धृ॥
अश्रुपात न धरती; सखिये ! सावरूं कित्ती ? ॥छ॥
येइं दिगंबरा ! माझया माहेरा ! तुजवीण देवदेवा ! प्रानु सोडील शरीर. ॥२॥

९४५
अरे ! योगिराया ! सुरगुरो ! दत्तात्रया !
विज्ञानसागरा ! सिद्धराजा ! अप्रमेया ! ॥१॥धृ॥
तूं प्राणधन माझें कैसें विसंविजे ? तो तूं. ॥छ॥
अरे ! पूर्णकामा ! आत्मा तूं माहात्मा.
दिगंबरा ! ऐसा केवि पुढती सांपडसी आह्मा ? ॥२॥

९४६
गुणाचें तूं स्थान, गुणमुक्त, सगूण निर्गुण.
परब्रह्म रूप तूझें देखिलें सगूण. ॥१॥धृ॥
आतां ठेउं कोठें ठेवा ? जीरे कें नी दैवां ? ॥छ॥
मातें मनसं चंचळ, गुणमती विरळ,
दिगंबरा ! धरितां तूज काये चाले बळ ? ॥२॥

९४७
वियोगदुःखज्वाळा हृदयीं मीं जळाला.
निवविसीं कयीं ? पां ! सांग, अवधूताजी ! नृपाळा ! ॥१॥धृ॥
उपशांत करीं दुःख दाऊंनि स्वमुख माझें. ॥छ॥
दीर्घस्वरें देवा ! करीतु आहें धावा.
दिगंबरा ! कयीं कृपा वर्षसी ?माधवा ! ॥२॥

९४८
तुझें नंदनवन हृदयभुवन.
अवधूता ! क्षणक्षाणा ये; तुं पाहीं सांभाळून. ॥१॥धृ॥
आतां अंतरंगु चाले; उमटती पाऊलें. ॥छ॥
ज्ञप्तिमूळीं स्थान, करावें आसन.
दिगंबरा ! स्वविश्रांति, तेथें स्वानंदु जीवन. ॥२॥

९४९
चिदंशु माझें मन केलें समर्पण.
मीं नणें, जाइल पाइं बांध आवळूंन. ॥१॥धृ॥
हें बा ! चंचळ भारी; दत्ता ! आपुलें आवरी. ॥छ॥
झणें देसी कामा; देवा ! तूं निष्कामा.
दिगंबरा ! सत्य जाण, मग बा ! बोलु नाहीं आह्मा. ॥२॥

९५०
बुद्धीचें अंतर तें तुझें मंदीर.
जागृति असावें देवा ! येताति तस्कर. ॥१॥धृ॥
आत्मज्ञानदीपु लावीं; बोलु न ठेवीं. ॥छ॥
लयो माजयील; विक्षेपु येईल;
दिगंबरा ! नाहीं सांगितलें ह्मणसील. ॥२॥

९५१
सर्वस्व चिद्घन; दीधलें मींपण;
आतां माझें नव्हे; घेयीं आपलें काढूंन. ॥१॥धृ॥
देवा ! काये सांग आतां उरलें ? अवधूता ! ॥छ॥
घालिसी कर्मावरी, तरि ते तुझी थोरी !
दिगंबरा ! नावडे, तरि तेथें चि संहारीं. ॥२॥

९५२
अवस्था आणि भान, देवा ! कर्तेपण,
मीपणें अन्वीतु; तुझे तूं चि तें ही जाण. ॥१॥धृ॥
आतां सावधानु होपां ! विश्वी विश्वरूपा ! ॥छ॥
देह विलक्षणु, गुणीं अकिंचनु,
तो ही दिगंबरा ! तुझा जालों मीं आपणु. ॥२॥

९५३
देवो दृष्टी पाहें, तवं तया न लहें.
दृश्य अविद्यक आतां पूजावें तें काये ? ॥१॥धृ॥
देवभ्रमु जाला जीवा; देॐ कें दाखवा ? ॥छ॥
दृश्याचें दर्शन आणि तें द्रष्टेपण.
दिगंबरा ! देॐ नव्हे, जो याचें कारण. ॥२॥

९५४
त्रीपूटीविलयें मीं मातें जव पाहें,
देवत्वाचें चिन्ह तेथें अवघें भरलें आहे. ॥१॥धृ॥
एवं विस्मयो जाला; न बोलें काहीं केला; ॥छ॥
भक्ती देॐ नाहीं, मग तो भक्तु कायी ?
दिगंबर ब्रह्म स्फुरे दोहींचा विलयीं. ॥२॥

९५५
देॐ कैंचा ? देवा ! मर, मर, रे ! निर्दैवा !
सांडूंनियां पंथु कैसा धेतु आहासि धावां ? ॥१॥धृ॥
तूं चि देॐ देही; विचारूंनि पाहा तें पाहीं. ॥छ॥
आत्मव्यतिरेकें भान चि लटिकें !
दिगंबरा ! बाह्यदेॐ पाहाताति मूर्खें ! ॥२॥

९५६
पाहातां भूल ! पर्वत आणि जळ !
देॐ तो कवणु ? ऐसें नेणती बळ. ॥१॥धृ॥
बाह्य नामघोष करीं; देॐ तो अंतरीं ! ॥छ॥
दृष्टा ते चि देॐ. दृश्याचा अभाॐ.
दिगंबरु भेटे, तयीं नीवटे संदेहो ! ॥२॥

९५७
दृश्य पंथें जातां वरि पडसी अनर्था.
द्रश्य चि होसील, मग बापा ! पावसील वेथा. ॥१॥धृ॥
कृतकर्म तें चि वैरी; बाधील शरीरीं. ॥छ॥
त्रीपूटीचें स्थान सांडी वेद्यमान.
आत्मा दिगंबरु, ऐसी स्वता बूझ खूण. ॥२॥

९५८
गुणसन्निपातें, माजलेनि चित्तें,
अवस्थेची दृष्टी देॐ पाहाताति भ्रांतें. ॥१॥धृ॥
तेथें भ्रमु तो चि दीसे; आश्रयो न भासे. ॥छ॥
भ्रमभूत ज्ञान जैसें कां तें स्वप्न;
तैसें दीगंबरीं विश्व अन्यथा स्फुरण. ॥२॥

९५९
माया नामें मन; देहावस्था गूण;
मन तें सामाउंनि, करीं अधिष्ठान ज्ञान. ॥१॥धृ॥
तेथें बंध, मोक्ष दोन्हीं मायीक निर्गुणी. ॥छ॥
मनत्व होतां क्षीण मनचि अधिष्ठान,
दिगंबरु भेटे तयीं; प्रकट होये खूण. ॥२॥

९६०
संगु अवस्थेचा योगु तो दुःखांचा.
पाहे तो सुजाणु आपेंआप निवळपणें ! ॥१॥धृ॥
ऐसे अंध मूक जाले ! योगी वेडावले ! ॥छ॥
दिगंबरीं स्थिती सहजत्वाची वृत्ति.
औपाधीक होये, तीची केली उपशांति. ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP