१३२१
कमलनयनु सावळा, लल्लाटीं तिळकु पीवळा,
पाघुरला सोनेसळा, कैं देखैन माये ! जवळा ? ॥१॥धृ॥
वेधलें वो ! तयासि मन; मनीं लागलें अखंड ध्यान;
ध्यानीं चित्त नूरे, माये ! जाण; जाणपणाची मोडली खुण. ॥छ॥
दत्तु काळानळुशमनु, गुणकृतभवभयमथनू,
ज्ञानसागरु, मायाविहीन, दिगंबरु योगिजनजीवनु ! ॥२॥
१३२२
साधू जन वंदिती चरण गुणवादप्रलपनश्रवण
० ० सनी सगुण ध्यान पद पावती ते निर्वाण ! ॥१॥धृ॥
जय जया ! मंगलधामा ! आत्मयां सुखविश्रामा !
तुझा वेधु निरंतर आह्मा लागों कां पुरुषोत्तमा ! ॥छ॥
शक्रारिमर्दनशीळा ! देवा ! अगम्य तुझी लीला !
सिद्धराजा ! भुवनपाला ! दिगंबरा ! तूं जीउ जीवाला ! ॥२॥
१३२३
सांडूंनि मीपणसारा गुणस्पंदु वो ! येथ न करा !
अवस्थाचे भेद निवारा ! यया न साहे संगु दुसरा ! ॥१॥धृ॥
जो जो रे ! नीज, नीज, आनंदीं नीज सहज !
निज मारूंनि तें पद बूझ आत्मयां ! परम गूज ! ॥छ॥
भार, अभाव, हे वारले ! गुण अगुण गुणें संहरले !
दिगंबरीं मनस न चळे; ऐसें निजणें म्यां अनुभविलें ! ॥२॥
१३२४
कमळनयनें माये ! माझें मन वेधिलें आहे.
आपपर तया न साहे. नेणवे, जाहालें काये ? ॥१॥धृ॥
आरे ! तूं लाघवी; तुवां घातली गोवी.
जीवत्व न स्मरें जीवीं, न कळे देहअभावीं भावाभावशून्यस्वभावीं. ॥छ॥
श्रवणी शब्दु न कळे ! नयन ठेले गोळे !
दिगंबरा ! नवल जालें, तुझेपण वांयां गेलें ! ॥२॥
१३२५
कइं मीं देखैन डोळा, परमानंदुपूतळा ?
श्रीदत्तु जीवनकळा, स्वरूपे शुद्ध सावळा. ॥१॥धृ॥
आनंदघनु वो ! परब्रह्म हा वो ! ऐसा मीं कोठें पाहों ?
कैसा मीं निश्चळ राहों ? लागला याचा मोहो. न सुटे सखिये ! स्नेहो ! ॥छ॥
योगियां योगविसांवां; स्वरूप लोपी मावा;
हृदयीं ठेवीन ठेवा ! दिगंबरु भेटैल केव्हा ? ॥२॥
१३२६
करितां गुणश्रवण, माझें वो ! गुंतलें मन !
लागलें हृद्रयीं ध्यान ! वियोग वेधिती बाण ! ॥२॥
आत्मयां ! येइं रे ! कमळनयना ! तुझें रूप आवडे मना,
माझया अंतःकरणा; परमसुखनिधाना ! आत्मयां ! येइं रे ! ॥छ॥
आठवण विष जाहाली; मनीं वो ! भूलि ठेली;
वियोगदुःख आकळी; दिगंबरा ! मति बुडाली ! ॥२॥
१३२७
मनें मन नेणसी काहीं, कैसा तूं सकळ देहीं ?
तुज मज भेदू चि नाहीं. कर्म मनु लाविसी कायी ? ॥१॥धृ॥
हा रे ! तूं लाघवी नाथिली गोवी घालिसी मायावी कुटिळ तुझा
गावीं कवणें साच मानावीं ? क्रिया ते सांडूंनि द्यावी. हारे ! तूं लाघवी ! ॥छ॥
तुजवीण आह्मीं कवण ? सत्येंसीं दुसरें भान.
दिगंबरा ! कळली खूण. न भूले आतां मन. ॥२॥
१३२८
क्षितितळअवलोकनी स्वजन स्मरले;
भक्तअनुग्रह निमित्य व्याहारिके आले !
गुणगणसंगु सोडुंनी देव रथीं बैसले,
परिवारु हाकारिती भक्तगण मीनले. ॥१॥धृ॥
आनंदे जीउ रे ! शिवात्मपदीं जीउ रे ! निर्वाणपदीं जीउ रे !
स्वरूपसिद्धीं जीउ रे ! सदानंदी जीउ रे ! आनंदे जीउ रे ! ॥छ॥
नीज बोध काठी करकरीं विवेकु ध्येला
त्रीपुटी हाणतां स्ववृत्ती भारु संच आला.
व्यतिरेक सदन्वयो दोहीं पार्थी जाला
वीतराग चमत्कारिती तयां मानु दीधला ॥२॥
चार्ही योग इभ स्वयंभ ते घालूंनि पूढा
लयलक्षादिकें काइसीं त्यांचा करूंनि दवडा
संप्रादाये भार चालती मती पडला वेढा
निःशब्द निसाण लागलें शंख भेरी दंडा ॥३॥
सामगायनें गर्जती भाट वैदीक जन
सत्य येक छत्र साजिरें स्वामीचें चिन्ह
शास्त्रें विद्युद्वणें झळकती तत्ववाद स्वंदन
योगी योद्धे रण जिंकते पापदुताशन ॥४॥
देवावरि वोवाळीती येक आपुलें मन
तीर्थ दान व्रत तपस येक धारणा ध्यान
तेथ सुभक्ती वारिलें आपुलें मीपण
मंगळ बोलती सेवक ते साधु सज्जन ॥५॥
चंद्र सूर्य दोन्ही सारिले ते तामस प्रभा
सहज प्रकाशु साजिरा चेतनेचा गाभा
मायामय दूरि करूंनि केला अभाॐ उभा
तो तवं स्वामीसि नावडे झणें येतील क्षोभा ॥६॥
व्याहारिका संपादुनी दैव आलें स्वस्थाना
समस्ता देउनि बहुडा सांडिली कल्पना
नीजपदीं जाले निद्रित ग्रासूंनि चेतना
दिगंबरगुणी गुंपले ते करिती ध्याना ॥७॥
१३२९
॥ हुसैनी. ॥
गुणश्रवणीं गुंपलीं, गुणी स्थानी मन न राहे, स्थानी मनन र्हाए !
समाधीचें सुख सांडुनि, मनस आठवि तुझे पाए. ॥१॥धृ॥
जाइन वो ! जाइन वो ! अवधूतीं मन गुंपलें ! मीं सवें जाइन वो ! ॥छ॥
योगसमइं तुझां ठाइं गुंपलें माझें मन;
तेथूनि परति नेघे. दिगंबरा लागलें अखंड ध्यान. ॥२॥
१३३०
पंथु पाहाता आगळी वेथा; येतां ने दखे माये, एतां ने दखे माए
येणें अवधूतें हरलें मनस ! वियोग न साहे ! ॥१॥धृ॥
जाइन वो ! जाइन वो ! अवधूताचेनि संगें येकलीं जाइन वो ! ॥छ॥
मोकळें चि मन गुंपलें गोरिये ! भेदु न साहे भेदु न साहे
दिगंबरें विण नावडे दुसरें ! पाहिन पाए ! ॥२॥
१३३१
दृष्टिचें देखणें मोडलें; येणें केलें थोर विंदाण; केलें थोर विंदाण.
मन पारूषलें; शरीर न कळे; वितुळलें मीपण. ॥१॥धृ॥
राहिलीयें राहिलीयें गगनीं; गगन तेवि निजस्थिती राहिलीयें. ॥छ॥
प्रापंचिक भान अभान आतलें गेलें दृश्य विरोंन गेलें दृश्य विरोंन
दिगंबरें येणें द्वैत हारपलें; बुडालें चेतन ! ॥२॥
१३३२
जाणपणें विण जाणिव बाईये ! नेणीव नेणिवे खाये, नेणीव नेणिवे खाये.
येकलें मींपण मरतां, सकळ भान चि विलया जाये ! ॥१॥धृ॥
काये मीं करूं ? काये मीं करूं ?
येणें अवधूतें भरलें अंतर; न कळे पारु. ॥छ॥
अभावाची खुण मोडली; स्वभाव ठेले भावविहीन, ठेले भावविहीन.
दिगंबराचें न कळे करणें. बुडालें चैतन्य ! ॥२॥
१३३३
बोलतां लौकीकु वोखटा गोरिये ! बोलों काये ? बोलों मीं काये ?
अवधूतें वीण क्षणु न राहवे ! न चलती उपाये ! ॥१॥धृ॥
वेचलियें, वेचलियें, अवधूतगुणीं गुंपली स्वरूपें वेचलियें ! ॥छ॥
आपपर जन पाहोंनि जाणवे पारिखेपण पारिखेपण.
दिगंबरें काये केलें ? नेणवें ! पारुषलें मन ! ॥२॥
१३३४
कायसी कवण कराल ? वो ! मज न साहावती बोल ! न साहावती बोल !
अवधूतगुणी गुंपलें मनस न सूटे केवळ ! ॥१॥धृ॥
रातलियें ! रातलियें ! अवधूतगुणॆं गुणी येकपणें रातलियें ! ॥छ॥
आपपर मज पारिखें बाइये सकळ भान, सकळ भान. ॥छ॥
दिगंबरें येणें हरिलें मनस; लागलें ध्यान ! ॥२॥
१३३५
ये ! रे ! श्रीदत्ता ! दयावंता ! भक्तां तुं विश्रामु, भक्तां तुं विश्रामु,
सुरनरगण तुज चि ध्याती; भक्तां परम कामु. ॥१॥धृ॥
पाहिन पाये; पाहीन पाये; भेटि देयीं;
माझें मन उताविळ; पाहिन पाये. ॥छ॥
आनंदकंदा ! भक्तवरदा ! सदा तुझें ध्यान, सदा तुझें ध्यान.
दिगंबरा ! तुजवांचूंनी न करीं आणीक चिंतन. ॥२॥
१३३६
मन लांचावलें; परति न धरी; रती स्वरती खाये, रती स्वरती खाये.
अवधूतें विण आणीक नावडे; करणें काये ? ॥१॥धृ॥
पारुषलें, पारुषलें, अवधूतें येणें माझें हें मीपण पारुषलें. ॥छ॥
बुद्धीचें बोधन कुंठलें; वो ! येणें नेलें बोधनसार नेलें बोधनसार.
दिगंबरें भेटी जाहाली; बाइये ! बुडालें अंतर. ॥२॥
१३३७
॥ हुसैनी ॥
गुणश्रवणें भूलि जाली; मानसें पांगुळलीं;
तुझें रूप लक्षिता; माझी बुद्धि हारपली. ॥१॥धृ॥
न कळे काहीं मज न कळे काहीं;
न कळे काहीं तुजविण श्रीयोगिराया ! ॥छ॥
बैसलें रूप मनीं; मन गुंपलें तव गुणीं;
दिगंबरा ! अवधारिजो ! न परते तेथूंनि. ॥२॥
१३३८
तुझें पाहातां रूप डोळां, नणे, जीउ हा काये जाला ?
आइके श्रीदत्ता ! त्रिविध भेदु बुडाला. ॥१॥धृ॥
मज मीं नाहीं, मातें मीं नाहीं,
तुझेनि मीं नाहीं जय जय देवाधिदेवा ! ॥छ॥
गुण करितां प्रलपन, गुणी सूटलें नीजमन.
दिगंबरा ! देखतीसें लागलें तदंगध्यान. ॥२॥
१३३९
तुझें सेवितां मुख, शेष जाहाली परवश.
गुंपलें श्रीदत्ता ! तुझां ठायीं मनस. ॥१॥धृ॥
जाणिजे कायी ? बोलिजे कायी ?
भजिजे कायी ? तुजविण असिजे काई ? ॥छ॥
तुझा करितां भक्तिवादु, जिवें सांडिला गुणभेदु.
दिगंबरा ! परियेसीं, हा ही राहिला शब्दु. ॥२॥
१३४०
कर्म निष्कर्म जालें; बोलतां मौन ठेलें.
आइकें अवधूता ! तुझें स्मरण केलें. ॥१॥धृ॥
काये मीं करूं ? कैसें मीं करूं ?
नुमजे विचारु; देवा ! केवि सावरूं ? ॥छ॥
संगेंचि संगु हाला, प्रपंचु काये के जाला ?
दिगंबरा ! तुजसी येकांतु घडला. ॥२॥