मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद १४६१ ते १४८०

दासोपंताची पदे - पद १४६१ ते १४८०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


१४६१
देखिला तापुहारी; दुरीत हरणु अमराधिपु प्रकटिनला.
संसार मळा रे ! दर्शनें हानिकरणु, कारणु, सकळलोकात्मस्वरूप !
समस्त यया आधारु जो, दिवाकर हिमकर प्रकाशकु,
परमपदा योगीजना अतिगुणें सुखंकरु तो गुरु अवधूतु देखिनयला. ॥२॥

१४६२
देखिला दिग्वाससू चिंतनें, भवभयानळु, रे ! रे ! पूर्णु.
देखिलें गणपति सगुणा, ज्या नाहीं गुणगतभीति, कृतनानागुणसमुद्रा.
देखिलें अवधूता, नीरुपमज्ञानमहिमा. देखिलें स्वजनवंता,
सुवासा. कीरिटु शोभे शिरीं. सकळवंदित पादकमळ रे !
नीरामयपददाता; अनसूयात्मज देॐ, श्रीदिगंबरु,
कृष्णश्यामु, मायामोहनिवारणु, अतिदिननाथु,
दृष्टी आजी देखिला गुरु. ॥३॥छ॥

१४६३
उगवला दीनु. सुदीनु गमे आजि हा !
लवे, वो ! लवे हा नयनु ! प्रीती बहु मनी ! ॥१॥धृ॥
सखिये ! दत्तु आजि येइल घरा, मानसमोहनु, नीरजनयनु,
अत्रीनंदनु, सुरारिमर्दनु, आनंदवर्धनु. ॥छ॥
भेटि ययाची हे भेदासि खाये; मनातें मारूंन,
यया जीवातें मारूंन, बाहीं कवलीन माये !
देव श्रीदिगंबरीं मीलणि जाहाली, मग
नयें न यें वो ! शरीरापु; निवारें भेदमति. ॥२॥

१४६४
॥ मारू ॥
नामघोषामृतें रंगले, ते नर चूकले जन्म दुःखासी;
येर ते पामर जीव चि नाशले; नित्य संसारु तयांसि. ॥१॥धृ॥
तेणें नामघोषें गर्जयीन; सर्वदा नृत्य करीन तेणें,
आनंदें नृत्य करीन. तेणें ना० कालासि कालु होईन तेणें नामघोषे. ॥छ॥
दिगंबरा ! तुझें नाम चि तारक; साधक साधिती सिद्धि रे !
जन्मदुःख तयां कधीं चि नातले; वितुलला भवव्याधी ! ॥२॥

१४६५
नाम संसारदुःखार्कविध्वंसन, सज्जन सेविती साधू रे !
अज्ञानबंधु तो येणें चि नाशिला; सर्वत्र ग्रासला भेदु. ॥१॥धृ॥
ऐसें नाम जपा सद्गुरूचें, सद्गुरू योगिरायाचें; ऐसें ना.
बीज तें ब्रह्मसुखाचें, योगिजनवल्लभाचें. ॥छ॥
योगपंथें जन चालतां श्रमले; नाम विश्रांति तयांसि रे !
दिगंबरा ! तुझें नाम चि साधन ज्ञान तें हें चि आह्मांसि. ॥२॥

१४६६
आप नेणोंनियां पर चिंती जनु चुकला पारिखेपणें.
योगसेवा तया कधी चि न फले; मोहला अन्यथाज्ञानें. ॥१॥धृ॥
आतां आपरूपीं स्थीरावले, जीत चि मुक्त जाहाले,
जे कीं योगिजन. ॥छ॥
‘ आपणा जाणोंनि दूसरें नेणणें ’ जाणणें जाण सुजाणा !
दिगंबरू ब्रह्म आत्मा चि केवल; विश्व हें भिन्न उरे ना ! ॥२॥

१४६७
मारू ॥ चालि भिन्न ॥ दखिणसाल.
प्रेमसंवादें बोलतां शब्दें जाणवलें कठीण;
बोलवितां हीं न बोले काहीं; दैवें धरियेलें मौन.
विकळ होताहे ध्यान ! धैर्य न धरीं माझें हें मन ! ॥१॥धृ॥
त्रीपुरपती ! त्रीपुरती ! त्रीपुरती ! कासया धरियेलें मौन ?
देवा ! माझें तूं पांच हीं प्राण ! नेणें बोलों मीं बाळ अज्ञान !
झणें धरीसी पारिखेपण त्रीपुरपती ! ॥छ॥
जीवनु जीवां, परमविसांवां देवां, देॐ गे ! माये !
दिगंबराची होइन दासी; केंसीं झाडीन पाये !
अतःपर जीणें हें काये ? येणें सांडियेली कां सोये ? ॥२॥त्रीपुरपती !

१४६८
आणिक मन नाश्रयीजाण ! - ध्यान हें तुजवांचूंन.
योगु मीं नेणें; नेणतेपणें बोलताहें वचन.
न दिसे दुसरेपण, आत्मा तूं येकु ह्मणौन. ॥१॥धृ॥
दत्तात्रेया ! दत्तात्रेया ! दत्तात्रेया ! सांगपां मज ते खूण.
भिन्न तुजसीं आह्मीं कवण ? माव सांडूंनि बोल निर्वाण !
मज न साहे मीपण ! ॥छ॥
दृश्य निमालें ! देखणें ठेलें ! वितुळलें भवभान !
आप ना पर, नीराकार ब्रह्म, तूं पद निर्वाण.
दिगंबरा ! तुझी आण, आणीक नेणें मीं ज्ञान दत्तत्रया ! ॥२॥

१४६९
आत्मविश्रामा ! आत्मयां ! रामा ! ब्रह्म तूं नीराकार !
श्रीयोगिराया ! निवारीं माया ! तुजहुंनि नेणें पर !
तूं चि तूं विज्ञानसार, निजपद, अज, अक्षर ! ॥१॥धृ॥
दत्तात्रया ! दत्तात्रया ! दत्तात्रया ! तुज वीनटलें मन,
नेणें परतों तें मागुतें न. गुणीं गुंपलें हें चैतन्य;
भेदरहीत लागलें ध्यान. ॥छ॥
अगुणगुणा ! गुणनिधाना ! मना मन तूं सार !
श्रीदिगंबरा ! मंगलमूर्ती ! तुझें मीं किंकर; विसरलों आपपर !
तुझें महिमान माहाथोर ! ॥२॥

१४७०
मारू
विण योगु ही आयोगु देवरायें वो ! कैं देखैन सखिये ! याचे पाये ? वो !
माझें मनस निश्चळता न लाहे वो !
वीण श्रीदत्तें सखिये ! करूं काये ? ॥१॥धृ॥
बाइये ! वो ! गुणीं गुंपलें, गुण ने घे;
मन माझें रंगलें तेणें रागें. ॥छ॥
निरालंबीं अवलंबु तें चि जालें, वो ! चित्तचैतन्य तेथें चि पांगुललें वो !
दिगंबरें वेगळेपण नेलें वो ! रूपें अरूप सर्व जालें ! ॥२॥
१४७१
देह माझें गगनवत जालें वो !
दृश्य पाहिजे तें देखणें ( तेणें ) निमालें वो !
अवधूतें नेणवे काये जाले ? वो !
भान प्रापंचिक सकळ उडालें. ॥१॥धृ॥
बाइये ! वो ! ध्यान लागलें मज माझें, गुणें अगुणीं गोविलें योगिराजें. ॥छ॥
नव्हे जागृति, सुषुप्ति, स्वप्न नव्हे वो !
हें हीं साक्षित्व तुरीया येणें भावें वो !
वितुलली स्वरूपआत्मभावें वो ! दिगंबर परब्रह्म तें अघवें. ॥२॥

१४७२
तुझें रूप पाहातां भूलि जाली रे ! दृश्यदर्शनद्रष्टत्वा अंतरली रे !
अहंकृतीप्रवृत्ति हारपली रे ! शून्य गीळूनि स्वरूपें नीवळलीं. ॥१॥धृ॥
आत्मयां ! रे ! संगें वियोगु हरितासि ! द्वैतभावें भजों मीं तूज कैसी ? ॥छ॥
स्तुति करीं, ते मौना चि माजि आटे रे ! ज्ञानें ज्ञेय कळे ऐसें तें न घडे रे !
नेणपण समूळ सर्व तूटे रे ! दिगंबरा ! द्वैत तुजसीं नूमटे. ॥२॥

१४७३
योगिराया ! कमळनयना ! रे ! तुझा योगु दुर्लभु साधूजनां रे !
ज्ञानयोगें, तपसें, उमगेना रे ! भाग्यें जोडलासि, कालाग्निशमना ! ॥१॥धृ॥
आत्मयां ! रे ! ध्यानचिंतन मज देयीं ! येरे योगें श्रमोनि काज नाहीं. ॥छ॥
तुझें नामानुस्मरण विसार रे ! परब्रह्म तूं केवल सुखकर रे !
आत्मस्वरूप सर्वगत निरंतर रे ! दिगंबरा ! तुझें अपूर्व साकार ! ॥२॥

१४७४
वाद मुद्रया श्रमले शब्दवादी रे ! शास्त्र जालें मोहीत तें त्रिशुद्धी रे !
तेणें ज्ञानें न तुटे भवव्याधी रे ! आत्मज्ञानहीना दुर्लभु समाधि. ॥१॥धृ॥
आलया ! रे ! आत्मा जाणोंनि स्थीरु राहीं ! ब्रह्म तूं चि सहज सर्व देहीं ! ॥छ॥
देह दृश्य धरूंनि आत्मभावें रे ! गुणबद्धी मानिसी तें तें नव्हे रे !
ज्ञानाश्रया असंगु तूं स्वभावें रे ! दिगंबरु आत्मा जाण अनुभवें. ॥२॥

१४७५
॥ रामक्री ॥
संसारुनदु हा दुस्तरु, कैं भेटयील तारकु श्रीगूरू ? ॥१॥धृ॥
तुझी वाट पाहे सखया ! कइं भेटसी ? बा ! दत्तात्रेया ! ॥छ॥
काम, क्रोध बाधिती जळचरें; दिगंबरा ! तेव्हेळीं तुज स्मरें ! ॥२॥

१४७६
संसारु वन दत्तात्रेया ! कालु खरतर तपे तपिया. ॥१॥धृ॥
मज पालवें करि कां साउली. देवदेवा ! तुं माझी माउली ! ॥छ॥
येथें विश्रांति नाहीं तुजवीण ! दिगंबरा ! दाखवीं चरण ! ॥२॥

१४७७
संसारसागरीं तरतां, श्रमु जाला; न वचे परुता. ॥१॥धृ॥
तुझी कास धरीन, दातारा ! अवधूता ! परम दया करा ! ॥छ॥
आणिकाची संगति न साहे. दिगंबरा ! तुं माझी माये. ॥२॥

१४७८
संसारु वनवडवानलुमाजि सांपडलें देवा ! पांगुलु. ॥१॥धृ॥
आतां वोळसी कयी ? दातारा ! अवधूता ! दत्ता ! जळधरा ! ॥छ॥
दिगंबरा ! प्रयत्न कुंठले ! आतां तुजवीण काहीं न चले ! ॥२॥

१४७९
संसारव्याघ्र भयंकरू पासीं आला; कैसा सावरू ? ॥१॥धृ॥
तुज हाक देऊंनि बोभायें ! अवधूता ! परतोनियां पाहें ! ॥छ॥
प्राणवेग जाले कुंठित; दिगंबरा ! मनस भ्रमीत. ॥२॥

१४८०
संसारसर्पें दंशिली ! मजु भेटवा माझी माउली ! ॥१॥धृ॥
तुझें मुख पाहिन, श्रीदत्ते ! प्राण गेलियां वरी न परते.
दिगंबरा ! तुझें दर्शन मज होइल अमृतप्राशन. ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP