धर्मशास्त्राच्या वाद करण्याची प्रतिज्ञा करूनही आयते वेळी ‘ न वयं तत्त्वबुभुत्सव: । वयं तु जिगीषव: ’ म्हणजे ‘ आम्हांला खर्या खोट्याचा निर्णय करावयाचा नाही, तर वादांत तुम्हांला जिंकावयाचे आहे, ’ अशा तयारीने पुण्याच्या वादात बसलेल्या मंडळीस पराशरवचनाचा सरळ अर्थ कबूल करावयाचा नव्हता, व लटपटीने ओढाताणीने काही तरी निराळा अर्थ ठोकून बसविण्याचा त्यांचा कृतसंकल्प होता, यामुळे या साध्या वचनाच्या अर्थाचे वादप्रसंगी विनाकारण केवळ धिंडवडे करण्यात आले. ते सर्वच सांगण्याचे येथे प्रयोजन नाही, तथापि मुद्द्याचे तेवढे येथे नमूद करण्यात येत आहेत:
( अ ) ‘ होय ’ चा अर्थ ‘ नाही ’ करू पाहणे : ‘ पतिरन्यो विधीयते ’ ( दुसरा पती करण्यास अनुज्ञा आहे ), या ठिकाणी ‘ विधीयते ’ च्या जागी ‘ अविधीयते ’ असा पदच्छेद करून ‘ दुसरा पति करण्यास अनुज्ञा नाही. ’ असा अर्थ करण्याचा यत्न झाला ! ‘ विधीयते ’ हे क्रियापद आहे, त्यास निषेधवाचक ‘ अ ’ शब्द जोडण्यास व्याकरणाची अडचण येऊ लागली, तेव्हा ‘ न ’ ( नाही ) या शब्दाप्रमाणेच ‘ अ ’ हा स्वतंत्र शब्द मानावा अशी लटपट करण्यात आली.
( आ ) ‘ पती ’ शब्दाचा अर्थ ‘ नवरा ’ असा करावयाचा नाही : अखेर ‘ विधीयते ’ हेच पद कायमचे मानावयाचे ठरले, तेव्हा ‘ पती ’ शब्दाचा ‘ नवरा ’ असा अर्थ न करिता ‘ पालक ’ अर्थ करावा, म्हणून कोटिक्रम निघाला. का, तर ‘ न स्त्री स्वातंत्रमर्हति ’ या मन्वादिकांच्या वचनाप्रमाणे स्त्रियांस स्वातंत्र्य असणे योग्य नव्हे !! पण ‘ अष्टौ वर्षाण्युदीक्षेत० ’ ( स्त्रीने पती नाहीसा झाला असता आठ वर्षे वाट पाहावी, व नंतर दुसर्याचा आश्रय करावा. ) असे स्मृतीच सांगतात; तेव्हा निदान त्या आठ वर्षांच्या काळात स्त्रीला स्वातंत्र्य मिळते त्याची वाट काय ? - ही अडचण निघू लागली, तेव्हा शेवटी ‘ पालक ’ अर्थ सुटून ‘ नवरा ’ हाच अर्थ कबूल करण्याची पाळी आली !
( इ ) ‘ नवरा ’ असल्यास सप्तपदीपूर्वीचा म्हणणे : ‘ नवरा ’ अर्थ कबूल झाला, पण ‘ नष्टे मृते० ’ या वचनात ‘ क्लीबे च पतिते पतौ ’ असे आहे, त्यातील ‘ पतौ ’ हे रूप व्याकरणाच्या दृष्टीने गौण आहे, तेव्हा ‘ पतौ ’ या शब्दावरून जो पती समजावयाचा तोही ‘ गौण ’ च असला पाहिजे, व हे गौणत्व सत्पपदी संपण्यापूर्वी नाहीसे होत नाही, यासाठी सप्तपदीच्या पूर्वीचा पती नाहीसा इत्यादी झाला, तरच स्त्रीने दुसरा ‘ पती ’ ( पूर्ण नवरा ) करावा ही कोटी निघाली. ही कोटी मानावयाची म्हटले, तर ‘ सीताया: पतये नम: ’ या वाक्यात ‘ पतये ’ हे रूपही गौण आहे; कारण खरे रूप ‘ पत्यै ’ असे आहे, त्या अर्थी या वाक्यात निर्दिष्ट केलेला रामचंद्राच्या पत्नीचा गौण पती कोण हे सांगण्याचा प्रसंग आला तेव्हा ती कोटी जिरली !!