स्त्रीपुनर्विवाह
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
स्त्रीवर्गाची स्थिती सुधारण्यासंबंधाने ज्या कित्येक गोष्टी आवश्यक असल्याचे प्रस्तुत कालच्या सुधारणावादी लोकांचे म्हणणे आहे, त्यामध्ये शिरोलेखात लिहिलेल्या विषयाचा समावेश होतो. या सुधारणा प्रश्नांचा मूळ आरंभ सुमारे ४० वर्षांपूर्वी बंगाल प्रांतात पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांजकडून झाल; व त्यानंतर काही काळाने कै. विष्णु परशुरामशास्त्री पंडित यांच्या प्रयत्नामुळे त्या प्रश्नाची भवति न भवति मुंबई इलाख्यात सुरू झाली. प्रारंभी प्रारंभी या कामी बरीच मोठ्या जोराची चळवळ होऊन विधवाविवाहोत्तेजक मंडळीची स्थापना झाली. यासंबंधाने भाषान्तररूपाने अग्र वादविवादाच्या रूपाने मराठी भाषेत व संस्कृत भाषेत कित्येक पुस्तकेही लिहिण्यात येऊन सन १८६० साली मुंबई मुक्कामी दाक्षिणात्य मंडळातील उच्च प्रतीच्या जतीत पहिला पुनर्विवाह लागला.
पुनर्विवाह हे कृत्य सशास्त्र अगर अशास्त्र कसेही असले, तरी रूढीच्या दृष्टीने पाहू जाणारास असंमतच असणार हे उघड आहे; तथापि या मंडळीने बाह्यत: शास्त्राचे कातडे अंगावर ओढून घेऊन, पुणे मुक्कामी श्रीमंत् शंकराचार्यांसमोर उभय पक्षांचे ५ - ५ पंच व वर एक सरपंच इत्यादी व्यवस्थेनुसार पुनर्विवाह सशास्त्र की अशास्त्र ठरविण्यासाठी वादाचा प्रसंग जुळवून आणिला. वादाच्या आरंभी कित्येक अटी ठरल्या होत्या, त्यांस अनुसरून या प्रश्नाचा निर्णय व्हावयाचा परंतु आयते वेळी काय गडबड झाली असेल ती असो, - मूळच्या अटीप्रमाने नुसत्या पंचांच्या बहुमतावरून निकाल होणे योग्य असता, व तशा प्रकारे पंचांचे लेखी स्वदस्तुरचे अभिप्राय तयारही असता, सरपंचांकडून निष्कारण निराळे निर्णयपत्र निघाले, व त्यास श्रींची संमती मिळाली.
कसेही असो; या निर्णयास अनुसरून लोकसमाजाने पुनर्विवाह अशास्त्र ठरल्याचे मानिले, तरी विधिपक्षाच्या लोकांकडून त्याची सशात्रता सिद्ध झाली असे प्रतिपादन पुढेही कित्येक वर्षेपर्यंत होत राहिले होते. एकंदरीत त्या वेळी झालेल्या निर्णयाच्या परिस्थितीकडे लक्ष देता खरा प्रकार म्हटला म्हणजे पुनर्विवाह सशास्त्र की अशास्त्र हा प्रश्न संदिग्धच राहून गेला असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP