मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|ऐतिहासिक पर्यालोचन|
गुणकर्मपध्दतीवर अनवस्था प्रसंग व त्यास उत्तर

गुणकर्मपध्दतीवर अनवस्था प्रसंग व त्यास उत्तर

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


पण अशाने कायमचा वर्ण अमुक असे केव्हाच म्हणता येणार नाही, व सकाळी ब्राह्मण, दुपारी महार, घटकाभराने पहावे तो शूद्र, अथवा काही वेळाने पुन: ब्राह्मण, अशा प्रकारे प्रत्यही, अगर प्रतिक्षणी वर्ण बदलीत बसावे लागून हा घोटाळा जन्मभर चालू राखण्याचा अनवस्था दोष पत्करावा लागेल, अशा रुढीभक्तांचा या गुणकर्मपध्दतीवर एक ठरीव आक्षेप आहे, व त्या आक्षेपाच्या नुसत्या उच्चारणानेच या पध्दतीच्या नुसत्या वादींची टर उडाली अशी हे रुढीभक्त आपल्या मनाशी स्वयंधन्यताही मानून घेतात. आक्षेपरुपी खाज्यास तिखटमीठ लावून नवीन रुची आणण्याकरिता हे लोक एखाद्या व्यक्तिविशेषावरुन ब्राह्मणत्वाचा अध्यारोप करुन त्याबरोबरच, ’ तुम्ही ब्राह्मण खरे, पण तुमचा बाप मात्र महार, व मुलगा शूद्र अथवा चांडाळ आहे ’ इत्यादि प्रकारचे प्रथमदर्शनी हास्योत्पादक असे कोटिक्रम बोलून दाखविण्यासही कमी करीत नाहीत !!
खर्‍या दृष्टीने कोणी पाहील व वस्तुस्थितीही तशीच असेल, तर वस्तुस्थितीचे यथावत वर्णन होत असल्यास केलेल्या कोटिक्रमास खरा विचारवंत मनुष्य केव्हाही दोष देणार नाही; परंतु अशा कोटिक्रमास वस्तुस्थिती प्राय: विपर्यास होत असतो, व तेवढ्यासाठीच त्यांचा निषेध करणेही केव्हा केव्हा अगत्याचे होते. हे अगत्य वाटण्याचे कारण आपल्या देशांत या दोन पध्दतीसंबंधाने आज आपण वाद करतो आहो म्हणूनच काय ते आहे. परंतु पृथ्वीवर इतर देशांत आपल्या इकडील तर्‍हेचा जातिभेद नसला, तरी गुणकर्मपध्दतीचे वर्गीकरण सर्वत्र आहेच आहे - अर्थात या ठिकाणी हे स्वाभाविक वर्गीकरण असूनही जर हा अनवस्थादोष अगर थट्टेने बोलण्याचा वर्णभेद कोणासही बाधत नाही, समाजाचे सर्व व्यवहार चालूच राहतात. तर त्याप्रमाणे आपल्या देशातही होत राहण्यास कोणता प्रत्यवाय आहे ? दोन पध्दती शेजारी शेजारी ठेवून आज आपण राहतो, त्यामुळे आज ही थट्टेची कल्पना आपल्या मनांत येते एवढाच काय तो खरा प्रकार आहे; व एक पध्दती मोडुन तिची आठवण नव्या पध्दतीखाली बुजून जाईपर्यंत असा प्रकार कोठेही म्हटले तरी व्हायचाच. वस्तुत: त्या पध्दतीत विसंगताला कोणत्याही प्रकारचा मानण्याचे कारण नाही हे उघड आहे.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP