ग्राम, देश व राष्ट्रानुसार विवाहसंबंधाचे तारतम्य : गुणकर्मपद्धतीपासून उत्पन्न होऊ शकणारे असे जे कित्येक परिणाम वरील कलमात दर्शविले, त्यांत दूरदेशी राहणार्या स्त्री - पुरुषांचे विवाहसंबंधही होऊ शकतील, हा एक परिणाम सांगितला आहे. आजच्या स्थितीत केवळ व्यवहारातील सोई-गैरसोई पाहात राहणार्या लोकांस हा परिणाम बहुधा आवडणार नाहई ; तथापि निदान आपल्या सजातीयांशीच असा संबंध घडला असेल, व त्या संबंधापासून स्वकीय कुटुंबास काही द्रव्याची अगर सुखसमाधानाची प्राप्ती झाली असेल, तर तोही दूरदेशीय संबंध ते अगदीच त्याज्य मानणार नाहीत.
परंतु नवीन अर्थी कबूल केलेल्या वर्णपद्धतीत ‘ जाती ’ शब्दासच अगोदर मुळात फ़ाटा मिळाला आहेअ, व देशभेदालाही रजा मिळाली आहे; तेव्हा अशा स्थितीत दूरदेशी होणारा संबंध खात्रीने मूळच्या स्वदेशीय व्यक्तीशीच होईल हा नियम कोणी सांगावा ? कदाचित गुणकर्मांच्या सादृश्याला भुलून परकीय राष्ट्रातील लोकांशीही हे संबंध होणार नाहीत कशावरून ? आता दर्शविले अशा प्रकारचे निराळे आक्षेप प्रस्तुतकालीन पद्धतीच्या भक्तांकडून काढण्यात येतील हे निर्विवाद आहे. सामान्य व्यवहाराच्या दृष्टीने पाहू गेल्यास दोन्हीही आक्षेप खरे व न्याय आहेत; पण त्याबरोबरच ते तितके अपवादरूपी पण आहेत.
गुणकर्मपद्धतीत लौकिक समजुतीच्या जाती, ग्राम, देश, व राष्ट्र या शब्दांची किंवा त्या शब्दांनी बोधित होणार्या कल्पनांची वास्तविक मोठीशी किंमत नाही. खरी किंमत म्हणजे ‘ वसुधैव कुटुंबकम् ’ ( = संपूर्ण पृथ्वी हेच काय ते एक कुटुंब ) या कल्पनेची आहे. तथापि जगाचा सामान्य अनुभव पाहू गेल्यास या शेवटल्या कल्पनेला जाऊन भिडणार्या व्यक्ती अत्यंत विरळा, व बहुतेक लोकसमुदायाची उमेद व धाव अगोदरच्या तीन कल्पनांकडची, असाच प्रकार प्राय: असावयाचा. ‘ वर्ण ’ या शब्दाच्या नवीन अर्थाप्रमाणे या कल्पनांपैकी ‘ जाति ’ एवढा एक शब्द अजीबात जाणारच तो जावो, पण बाकीचे तिन्ही शब्द सोडून देण्यास सहसा कोणी तयार होणार नाही. साधेल तोपावेतो आपलाच गाव किंवा आपला देश यांच्या पलीकडे कोणाची मजल जाणार नाही.
‘ राष्ट्र ’ ही कल्पना अति विशाल आहे. संपूर्ण हिंदुस्थान देश म्हणजे एक ‘ राष्ट्र ’ अशी कल्पना केली, तरी वास्तविक विचार करू गेल्यास अनेक देश मिळून हा एक देश झालेला आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगण, द्राविड, मलबार, मारवाड, कच्छ, पंजाब, बंगाल इत्यादी संज्ञा वस्तुत: स्वतंत्र एकेका देशाच्या आहेत; व वधूसंबंध केवळ गुणकर्मपद्धती जुळवून घेण्याचे म्हटले असताही प्रत्येक मनुष्य आपल्या देशाचे अतिक्रमण सहसा करणार नाही. भाषा, हवा, अन्नपाण्याची समृद्धी, इत्यादी गोष्टी प्रत्येक देशाच्या निरनिराळ्या असतात, व त्या सर्वांची कार्ये व्यत्किमात्रावर सृष्टिनियमानुसार जन्मापासून होत राहिल्याने त्या गोष्टी अगर त्यांची कार्ये यावर प्रत्येक व्यक्तीचे थोड्याबहुत प्रमाणाने तरी प्रेम बसलेले असते, व यामुळे विवाहसंबंधाच्या बाबतीतदेखील आयत्या वेळी याच गोष्टींची सरशी होण्याचा संभव विशेष आहे. त्यांचा अतिक्रम करणे म्हणजे देशभेद मनात न आणिता स्वदेशाहून निराळा देश स्वीकारणे होय, व त्याचेच पर्यावस्वरूप ‘ राष्ट्र ’ हे होय.