कन्यास्वयंवर व कुटुंबाच्या धनावर कन्येचा हक्क
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
कन्यादानाचे अधिकारी कोण, व त्यांपैकी कोणावर कन्येची किती सत्ता, याविषयी याज्ञवल्क्यस्मृतीत पुढील वचने लिहिली आहेत :
पिता पितामहो भ्राता सकुल्यो जननी तथा ।
कन्याप्रद: पूर्वनाशे प्रकृतितस्थ: पर: पर: ॥
अप्रयच्छन्समाप्नोति भ्रूणहत्यामृतावृतौ ।
गम्यं त्वभावे दातॄणां कन्या कुर्यात्स्वयंवरम् ॥
असंकृतास्तु संस्कार्या भ्रातृभि: पूर्वसंस्कृतै: ।
भगिन्यश्च निजादंशादृत्त्वांशं तुं तुरीयकम् ॥
या वचनांचा अर्थ : ‘ कन्येचे दान करण्याचे अधिकारी ( १ ) बाप, ( २ ) आजा, ( ३ ) भाऊ, ( ४ ) भाऊबंद, व ( ५ ) आई, हे क्रमाने होत. म्हणजे ज्या क्रमाने ही नावे सांगितली आहेत, त्या क्रमात अगोदरचे दानाधिकारी नसतील, व ज्याच्या हातून दान व्हावयाचे तो दान देण्यासारख्या स्थितीत असेल, तर या शेवटल्या अधिकार्याच्या हातून कन्येचे दान व्हावयाचे. या दानाधिकार्याकडून दान घडले नाही तर, कन्येच्या प्रत्येक दात्यास रजोदर्शनप्रसंगी एकेक भ्रूणहत्येचे पातक लागते. कन्येचे दान करावयास कोणी नसेलच, तर कन्येने स्वयंवर करावे, म्हणजे आपल्या इच्छेनुरूप पती पाहून त्याशी विवाह करावा.
बहिणींची दाने करणारे भाऊ असतील, तर भावांनी आपल्या स्वत:च्या वाटणीपैकी चतुर्थांश द्रव्य देऊन आपल्या बहिणींचे विवाह करून द्यावे. बृहस्पतीच्या मते कन्येचा पित्याच्या संपत्तीच्या चतुर्थांशावर हक्क पोचतो, व त्याचा हेतू त्या द्रव्याचा उपयोग तिच्या विवाहकृत्याकडे व्हावा हाच असतो. देवलाच्या मते पित्याला नुसती कन्यासंततीच असेल, तर कन्येच्या विवाहप्रीत्यर्थ पित्याने आपल्या सामर्थ्याप्रमाणे द्रव्याचा व्यय करावा.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP