" जन्मना जायते शूद्र : संस्कारात् द्विज उच्यते " असे एक वचन याज्ञवल्क्यस्मृतीत आले आहे, व त्या वचनाचा अर्थ - प्रत्येक मनुष्य जन्मत: शूद्र असतो व संस्काराच्या योगाने त्याला ’ द्विज ’ ही संज्ञा प्राप्त होते, असा आहे. जर वर्णपध्दती ही आनुवंशिक मानावयाची, तर प्रत्येक मनुष्य जन्मत: शूद्रच काय म्हणून व्हावा ? आजमितीला या वचनांतील ’ संस्कर ’ या शब्दाचा अर्थ मौजीबंधन असा आपण समजतो, पण हा असा अर्थ - संकोच म्हणून काय म्हणून करावयाचा ? हा अर्थसंकोच जर उद्दिष्ट होता म्हणावे, तर ’ मौजीबंधाद्भवेदद्विज: ’ किंवा ’ मौजीतो द्विज उच्यते ’ अशा प्रकारचे स्पष्ट वचन लिहिण्यास स्मृतिकारास कोणताही प्रत्यवाय नव्हता.
प्रस्तुत वचनांत ’ संस्कार ’ हा शब्द अगदी मोघम आहे. शूद्राला द्शाविध संस्कार सांगितले आहेत, परंतु ते वेदमंत्रानी न करिता नाममंत्रांनी करावे असा शूद्रकमलाकरादी अर्वाचीन निबंधकाराचा कटाक्ष दिसतो. नाममंत्र म्हणजे पौराणिक पध्दतीचे मंत्र, अर्थात वेदकालामागून लिहिले गेलेले. या नाममंत्रानी जर शूद्रांचे संस्कार करावयाचे, तर प्राचीन काळी शूद्रांना मुळीच संस्कार होत नसावे असा संशय खरा मानिला - व ऐतिहासिक दृष्ट्या तो खरा आहेही, - तर द्विजांना संस्कार पाहिजे, व शूद्रांना तो नको इतकाच काय तो उभय वर्गोचा व्यावर्तक भेद राहतो ; व यद्यपि शूद्रास द्शाविध संस्कारांची मोकळीक असल्याची वचने ग्रंथातून आढळली, तथापि ती तडजोडीचा प्रकार म्हणून स्मृतिकाळी किंवा तदुत्तर काळी उत्पन्न झालेली नव्हेत असे कशावरुन म्हणावे ? तडजोडीमुळे शूद्रांचे जातकर्मादी संस्कार होऊ लागले, व संस्कारांच्या योगाने त्यांच्याकडे द्विजत्व येऊ लागले, तेव्हा त्याला प्रतिबंध करण्याकरिता ’ संस्कर ’ शब्दाच्या संकुचित अर्थ करण्याची क्लुप्ती मागाहून निघाली यात संदेह नाही.
कसेही असो, आमचे शास्त्रकर्ते आनुवंशिक पध्दतीस भाळले गेल्यामुळे त्यांना हा कोता अर्थ नाइलाजास्तव पत्करावा लागला. संस्कार केला असता त्याचे फळ जर दृष्ट असते, तर हा कोता अर्थही एक वेळ पत्करता आला असता, परंतु संस्कारग्रंथातून संस्काराची फळे प्राय: अदृष्ट अशीच वर्णिली आहेत. क्वचित, विशेष फळे सांगितली आहेत, तथापि सामान्यत: पाहू जाता गर्भसंबंधाचे व बीजसंबंधाचे दोष घालविणे हेच संस्काराचे फळ असे शास्त्रकारांनी स्पष्टपणे लिहिले आहे. जर काही विशेष संस्कार केल्याने हे दोष जाऊ शकतात. जर प्रत्येक मनुष्य जन्मत:च शूद्र असतो, तर या संस्कारांच्या योगाने मनुष्यमात्राचे हे दोष गेलेच पाहिजेत. जर दोष जातात, तर पुढे अमुक मनुष्याला अमुक इतके संस्कार करावयाचे नाहीत, अशा प्रकारची मागाहून आवडनिवड करण्याचे वस्तुत: कारणच राहू नये. पण हा सर्व खटाटोप एका आनुवंशिक पध्दतीचा स्वीकार करण्याची शास्त्रकारांनी प्रवृत्ती झाली त्यामुळे उत्पन्न झाला आहे, त्यापुढे इलाज नाही.