मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|ऐतिहासिक पर्यालोचन|
चातुर्वर्ण्याची स्थापना

चातुर्वर्ण्याची स्थापना

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


हंसधर्म प्रचलित होता त्या वेळी आर्यमंडळाचे पोटी वर्णभेद मुळीच नव्हता. आजमितीला ’ वर्ण ’ ही व्यापक संज्ञा केवळ नावाची, परंतु व्यवहारात त्या संज्ञेच्या पोटी अनेक जाती व पोटजाती यांचा मात्र अति मोठा सुळसुळाट झाला आहे, तशातला प्रकार त्या वेळी मुळीच नव्हता; व कोणत्याही प्राणिवर्गात निसर्गसृष्ट ज्या स्त्री आणि पुरुष या दोन जाती, तेवढ्या दोन जातीच काय त्या मानण्यात येत होत्या. या दोन जाती म्हणजेच हंसपक्ष्याचे दोन पाय, व या दोन पायांवर मनुष्यप्राण्याचा धर्म उभा आहे ही रुपकाची कल्पना काही काळपर्यंत चालू राहिली.
हळूहळू मनुष्यजातीचा संकोच होऊन नुसत्या आर्यमंडळाच्या धर्मापुरतीच रुपकाची योजना होण्यास सुरुवात झाली, त्या वेळी हा स्त्रीपुरुषांचा भेद सुटला, व आर्यमंडळाचे पोटी चार वर्ग मानण्यात येऊ लागले. अर्थात प्रत्येक वर्ग म्हणजे एकेक पाय अशी कल्पना स्थिर होऊन चार वर्गाच्या चार पायांवर आर्यमंडळाचा धर्म उभा राहतो. अर्थात् वृषभ ( बैल ) हा प्राणी ज्याप्रमाणे चार पायांवर उभा असतो, त्याप्रमाणे चार वर्गोच्या धर्मावर आर्यमंडळाचा धर्म उभा राहतो, ही कल्पना रुढ झाली व या धर्मास ’ वृषभधर्म ’ ही संज्ञा देण्यात आली. हा वृषभधर्म म्हणजे चातुर्वर्ण्य होय ; व त्याचे स्थापना झाली, तेव्हा हे चातुर्वर्ण्य ईश्वरास संमत आहे हे दाखविण्याकरिता विराट स्वरुपाचे मुख, बाहु, ऊरु ( मांड्या ), आणि पाद ( पाय ), या संज्ञांनी अनुक्रमे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांची उत्पत्ती सांगण्याचा प्रसंग आला.
या ठिकाणी ’ या संज्ञांनी ’ असे शब्द योजिले आहेत, परंतु लौकिक समजुतीप्रमाणे या शब्दांचे ऐवजी ’ यांपासून ’ असा शब्द योजिणे प्रशस्त मानले आहे. ही समजुत सामान्य अडाणी लोकांपुरतीच असती, तर तिचे विशेष महत्त्व मानण्याचे कारण न पडते. परंतु सायनाचार्यासारख्या महापंडित भाष्यकारांच्या लेखांतसुध्दा ही समजूत घेतली गेली आहे, यामुळे ती कितपत योग्य अगर अयोग्य मानावी याबद्दलची थोडी मीमांसा करणे जरुर आहे. भाष्यकारांच्या लेखांत ’ यांपासून ’ अशा अर्थाचा शब्द योजिला गेल्यामुळे विराटपुरुषाच्या पायांपासून शूद्राची उत्पत्ती झाली असा मूळच्या वेद्सवचनातील ’ पद्भ्यां शूद्रोजायत ’ या चतुर्थ चरणाचा सरळ अर्थ होऊ शकला.
नुसत्या व्याकरणशास्त्राच्या दृष्टीने पाहू गेल्यास या भागाचा हा अर्थ अक्षरश: बरोब्र आहे असे कोणीही कबूल करु शकेल; कारण ’ पद्भ्यां ’ हे मूळच्या ’पद् ’ शब्दांच्या पंचमी विभक्तीचे द्विवचनी रुप मानिता येते यात मुळीच संशय नाही, व पंचमी विभक्तीचे भाषांतर करावयाचे झाल्यास ’ पासून ’ या शब्दयोगी अव्ययाची योजना अवश्य करावी लागते. ’ पद्भ्या शूद्रजायत ’ या एका चरणापुरताच जर हा पंचमीविभक्तिघटित अर्थ घेऊन भाष्यकार थांबले असते, तर पुढे जो एक विलक्षण घोटाळा समाजात शाश्वतिक होऊन बसला तो कदाचित मुळीच झाला नसता. परंतु ’ पद्भ्यां शूद्रो० ’ हा चरण ज्या अनुष्टुप वृत्तातील शेवटला चरण आहे, त्या वृत्तातील पहिल्या तिन्ही चरणांत पंचमेमे विभक्तीचा लवमात्र मागमूस नसताही, नजरचुकीने म्हणा अगर मुद्दाम जाणूनबुजून म्हणा, या तिन्ही चरणांचा प्रत्येकी पंचमीच्या अर्थासारखा अर्थ करण्यात येऊन पर्यवसानी विराटपुरुषाच्या चार निरनिराळ्या अवयवां ’ पासून ’ क्रमाने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चारी वर्णोची उत्पत्ती झाली असा जुलुमाचा अर्थ भाष्यकारांनी सर्वत्र प्रचलित केला.
कदाचित हा अर्थ भाष्यकारांनी पूर्वीच्या ग्रंथकारांनी अगोदरच केला असेल, व लोकसमुदायात तो पक्का रुढ होऊन गेल्यामुळे भाष्यकारांस तो अर्थ बदलून निराळा अर्थ लिहिण्यापुरते धैर्य न वाटल्यामुळे त्या रुढ अर्थाचाव अंगीकार त्यांना करणे अगातिक झाले असेल. परंतु वास्तविक विचार करु गेल्यास ’ पद्भ्या ’ हे ज्याप्रमाणे पंचमी विभक्तीचे रुप होऊ शकते, त्याप्रमाणे चतुर्थी विभक्तीचेही रुप होऊ शकते; व चतुर्थी विभक्ती मानिली असता व्याकरणशास्त्राच्या दृष्टीने त्या विभक्तीच्या भाषांतरास ’ कारणे ’ म्हणजे ’ सरुप ’ अगर ’ तत्स्थानीय ’ अशी अर्थशक्ती प्राप्त होते. म्हणजे ’ शूद्र हा पायांपासून झाला ’ असा अर्थ करण्याची आवश्यकता नाहीशी होऊन तो विराटपुरुषाच्या पायांशी सरुप झाला, अर्थात पाय आणि तो हे दोन्हीही एकच बनले, असा सरळ व क्रमप्राप्त अर्थ होतो. हा अर्थ अगोदरच्या तिन्ही चरणांच्या अर्थाशी कोणत्याही प्रकारे विसंगती होत नाही, एवढेच नव्हे, तर ज्या ऋचेच्या खर्‍या अर्थासंबंधाने भाष्यकारांनी हा घोटाळा केला आहे, त्या ऋचेच्या पूर्वीच्या ऋचेशीही हाच अर्थ बरोबर जुळतो. पूर्वीच्या ऋचेचे उत्तरार्ध व अर्थाचा घोटाळा झालेला मंत्र ही पुढीलप्रमाणे आहेत :
मुखं किमस्य कौ बाहू कावूरु पादावुच्येते ॥
ब्राह्मणोस्य मुखमासीद्वाहू राजन्य: कृत: ।
ऊरु तदस्य यद्वैश्य: पद्भ्यां शूद्रोsजाजत ॥
या तीन पंक्तीपैकी पहिल्या पंक्तीत चार प्रश्न निरनिराळे विचारण्यात आले आहेत, व पुढील दोन पंक्तींत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर क्रमानेच दिले आहे. याकरिता मंत्रातील अक्षरांचा क्रम सोडून देऊन या पंक्ती प्रत्येकी निरनिराळ्या प्रश्नोत्तररुपाने पुढे दर्शविल्याप्रमाणे लिहिण्यास अडचण नाही.
( १ ) मुखं किमस्य ? - ब्राह्मणोस्य मुखमासीत् ।
( २ ) कौ बाहु ? - बाहू राजन्य: कृत: ।
( ३ ) कावूरु [ उच्येते ] ? - ऊरु तदस्य यद्वैश्य: ।
( ४ ) [ कौ ] पादावुच्येते ! - पद्भ्यां शूद्रोsजायत ।
येथे पहिल्या प्रश्नात ’ या विराट पुरुषाचे मुख कोणते ?’ असे विचारले आहे, व याचे ’ ब्राह्मण त्याचे मुख झाला असता, असे दिले आहे. दुसर्‍या प्रश्नात ’ बाहू कोणते ?’ असे विचारले असता ’ क्षत्रिय हा बाहू केला गेला ’ असे उत्तर देण्यात आले आहे. ’ दोन मांड्या कोणच्या बोलिजेल्या ?’ या तिसरा प्रश्न आहे, व ’ जे वैश्य [ म्हणून आपण म्हणतो ] ते याच्या दोन मांड्या होत. ’ हे त्यावर उत्तर आहे. सरतेशेवटी दोन पाय कोणते बोलिजेले ?’ हा प्रश्न आहे, व त्याचे उत्तर ’ शूद्र पायांकारणे ( = पायांच्या स्थानी = पायांच्या योग्यतेचा ) झाला ’ याप्रमाणे देण्यात आले आहे.


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP