पराशरस्मृतीचे महत्त्व
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
‘ नष्टे मृते० ’ या वचनात कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी स्त्रीस दुसरा पती वरण्यास अधिकार सांगितला नसून पाच विशेष आपत्तींचा मात्र नामनिर्देश केला आहे. पराशरस्मृतीपूर्वी वसिष्ठ इत्यादी दुसरे कित्येक स्मृतिकार होऊन गेले, त्यांत आपत्तींची संख्या ७, १३ इत्यादी निरनिराळ्या प्रकारे सांगितली आहे; परंतु या स्मृती मुद्दाम कलियुगाच्या उद्देशाने लिहिल्या नसल्यामुळे त्यांनी वर्णिलेले कित्येक आपत्प्रसंग सोडून द्यावे लागले, व खास कलीच्या उद्देशाने प्रवृत्त झालेल्या स्मृतीत सांगितलेले प्रसंग मात्र घेतले, तरी तेवढ्याने स्त्रीजातीस दु:खविमोचनाचा काही तरी मार्ग मोकळा होतो ही गोष्ट काही लहान नव्हे.
पती ‘ नष्ट ’ झाला, म्हणजे बरीच वर्षे वाट पाहूनही त्याचा कोठेच पत्ता लागत नाही अशी पाळी आली, तर हा दोष स्त्रीचा असे कसे म्हणता येईल ? तिने तरी बिचारीने जन्मभर वाट पाहात राहावे हे म्हणणे व्यवहारदृष्ट्या व न्यायदृष्ट्या योग्य होईल काय ! पती मरण पावणे या आपत्तीत वाट पाहण्याचेच कारण सबंध नाहीसे होते. पतीने संन्यास घेतला, मग तो कोणत्याही कारणाने असो,तर वर्णाश्रमधर्माच्या रीतीने त्याला गृहस्थाश्रमात पुन: परत येता येईल काय ? जर तो परत येऊ शकणार नाही, तर त्याचा देह जिवंत व डोळ्यांनी धडधडीत पुढे दिसणारा असा असूनही तो देह त्याच्या पूर्वाश्रमाच्या स्त्रीस काय कामाचा ? ‘ क्लीब ’ शब्द स्पष्टच आहे. व हा शब्द ज्यास लावावयाचा, त्याच्या विवाहपूर्वी त्याचे व्यंग त्याच्या पत्नीच्या मातापितरांस समजले नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे असे पाहिजे तर म्हणावे, तरी पण पितरांच्या चुकीबद्दलचे प्रायश्चित्त भोगण्याची पाळी निष्कारण त्या बिचार्या पत्नीवर यावी हे क्षणभर तरी न्यायाचे होईल काय ?
‘ पतित ’ शब्दाबद्दल मागे क. ८३ पृ. १०१ येथे विशेष उल्लेख झालाच आहे, तेव्हा त्याची पुनरुक्ती करणे नको. तात्पर्य सांगण्याचे इतकेच की, पराशराने या ज्या पाच आपत्ती सांगितल्या, त्यांत स्त्रीने संसारात यत्किंचित तरी सुखाची आशा धरावी अशी एक तरी आपत्ती आहे काय ? कोणतीही आपत्ती घेतली, तरी तीत बिचार्या स्त्रीच्या दयाळू अंत:करणास अन्यायाचा वाटला, व म्हणूनच त्याने या एवढ्या विशेष आपत्तीपुरती स्त्रियांना निराळा पती करण्याची परवानगी दिली, अशी कल्पना केल्यास विचारान्ती ती सर्वथा योग्य आहे असेच म्हणावे लागेल.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP