उदाहरणे : वरील कलमात शेवटी दोन प्रश्न आहेत, या दोन्ही प्रश्नांची समर्पक उत्तरे देण्यास आपली आनुवंशिक वर्णपध्दती काही उपयोगी पडत नाही. तिच्याऐवजी ब्राह्मणाचे गुण ज्याच्या अंगी असतील तोच ब्राह्मण; क्षत्रिय किंवा वैश्य यांचे गुण अंगी असतील तोच अनुक्रमे क्षत्रिय आणि वैश्य; व या तिघांचेही गुण ज्यांच्या अंगी नसतील तोच शूद्र, अशा प्रकारची वर्णव्यवस्था मानणे हेच विशेष प्रशस्त होय. हल्लीच्या कृत्रिम व हटवादमूलक पध्दतीपासून काहीच फायदा नाही असे कधीही कोणी म्हणू शकणार नाही, तथापि या पध्दतीपासून होणार्या फायद्यापेक्षा दुसर्या पध्दतीपासून अधिक फायदा होण्याचा संभव दिसतो.
कारण ईश्वराने मनुष्यास निरनिराळ्या प्रकारचे अंगसामर्थ्य किंवा बुध्दी दिली आहे, तिचा हल्लीच्या पध्दतीत व्हावा तितका उपयोग होऊ शकत नाही. पण तीच जर का दुसरी पध्दती असती, तर सर्वोच्या अंगसामर्थ्याचा व बुध्दीचा योग्य उपयोग होऊ शकता, व त्याजपासून समाजाचे योगक्षेम अधिक चांगल्या प्रकारे सिध्द होऊ शकले असते, याची उदाहरणे पाहण्यास फार दूर जाणे नलगे.
( १ ) उदा. १ . वधूवर मिळण्याची सोय : नुसत्या वधूवरांच्या विवाहापुरताच विचार केला, तर सांप्रतच्या वर्णपध्दतीत योग्य गुणांची, परंतु दुर्दैवाने भिन्न जातीची, स्त्रीपुरुषे धडधडीत डोळ्यांपुढे दिसत असूनही त्यांचा विवाह होऊ शकत नाही;प व कित्येक जातीत वधू व वर मिळणेही मुष्किलीचे होते. तसा प्रकार या दुसर्या पध्दतीच्या पोटी खचित होऊ शकता ना. तसेच आजमितीस स्वजातीच्या वर किंवा वधू शोधून काढण्यास जे देशोदेशी भटकत राहावे लागते. त्याचा त्रासही या नव्या पध्दतीपासून खास मिटू शकता.
( २ ) उदा. २. उद्योगधंद्याची सोय : सांप्रतच्या देशस्थितीत आमची जात उंच पडली, त्यामुळे आम्हांला अमुक प्रकारचे काम येत नाही, या पोकळ अभिमानाच्या भरी भरुन ज्या लोकांस उपासमार, हाल व प्रसंगी प्राण हानीही पत्करावी लागत आहे, अशा लोकांस, या दुसर्या पध्दतीची समाजमांडणी असते तर कोणता तरी उद्योग पत्करुन निराळे निर्वाहाचे साधन खचित पाहता आले असते.
( ३ ) उदा. ३. पतितपरावर्तन व समाजाची संघशक्ती : अवर्षण, दुष्काळ, तज्जन्य रोगपरंपरा व मृत्यू, त्यांच्या योगाने जिकडे पहावे तिकडे लोकसमाज उदध्वस्त झाला, कुटुंबेची कुटुंबे उघडी पडली, हजारो पोरे पोरकी होऊन अन्नपाण्यावाचून सैराभैरा भटकून प्राणांस मुकली, अशा स्थितीत केवळ अन्नपाण्याच्या लालचेने धर्मान्तर पावलेली बालके व क्वचित मोठ्या वयाचे लोकही ठिकठिकाणी दृष्टीस पडतात. हा धर्मान्तराचा प्रसंग केवळ आपत्तीमुळे आला, यास्तव निदान तो प्रसंग उलटून गेल्यानंतर तरी आमच्या लोकांनी सावध व्हावे, व आपणांतून दूर जाऊन पडलेला जनसमाज परत जेथल्या तेथे संनिवेशित करुन स्वकीय धर्ममंडळाची संघशक्ती कमी होऊ देऊ नये, ही गोष्ट सध्याच्या काळी अत्यंत अगत्याची होऊन बसली आहे. परंतु रुढिग्रस्त अंध समाजाचे तिकडे लक्षही जात नाही; व अद्यापि क्वचित कोठे गेले, तरीदेखील धर्मान्तराने आलेल्या पातित्याचा प्रतिकार करण्यास हल्लीची वर्णपध्दती व जातिपध्दती हीच आडवी पडून आर्यमंडळाचे कायमचे नुकसान करीत आहे. गुणकर्मानुसार वर्णपध्दतीचा प्रकार अंमलात असता तर हे नुकसान होण्याचे खात्रीने बंद पाडिता आले असते. असो.