गुणकर्मव्यवस्था अस्वाभाविक नव्हे
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
हा खटाटोप न करिता गुणकर्मविभागास अनुसरुन वर्णव्यवस्था जर शास्त्रकर्त्यांनी स्वीकारली असती, तर प्रत्येक व्यक्तीस निरनिराळे संस्कार करीत बसण्याची यातायात बर्याच अंशी टळली असती. मूल उत्पन्न झाल्याबरोबर त्याच्या बुध्दीची परीक्षा होऊ शकत नाही, ते पुढे कसे निपजणार याचा अजमास अगोदर सांगता येत नाही; याकरिता त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था ठेविल्यानंतर मुलाची स्वाभाविक प्रवृत्ती कशा प्रकारची होते, ते कसले चाळे करिते, किंवा त्याला कसल्या गोष्टीचा छंद लागतो, इत्यादि प्रकार त्याची जोपासना करणार्या मनुष्यांस फार प्रयास न करिता कळू शकतील. एखादे मूल लहानपणापासून गोष्टी ऐकण्याच्या नादी लागेल; एखाद्याला गाणे ऐकत बसण्याचा किंवा स्वत: काही तरी सूर काढण्याचा छंद लागेल; कोणी बुके, पोथ्या वगैरेकडे धाव घेईल; कोणी काठ्या घेऊन त्याचे घोडेच करील; कोणी मातीचे किंवा विटांचे किल्ले किंवा कोट बांधण्यास प्रवृत्त होईल; कुणाला गुराढोरांच्या गोठ्यांत जाऊन वेळ घालवावासा वाटेल; कोणाला गलिच्छपणाचा कंटाळा येणार नाही; कोणी उनाडपणे धावण्यासवरण्याचा आनंद मानिल; कोणी मूल शाळेत शिकण्याकरिता पाठविले असता दिलेल्या पैशाअडक्याच्या पेन्सिली विकत घेऊन आपल्या सोबत्यास त्याचे तुकडे विकत देऊन एका पैशाचे दोन पैसे करु पाहिल - इत्यादि अनेक प्रकार मुलांच्या चरित्रांवरुन त्यांच्या पालकांच्या दृष्टीस पडल्यावाचून राहणार नाहीत. या चरित्रांवरुन कोणत्या मुलाचे कोणते गुण किंवा कोणती कर्मे पुढे दृष्टोत्पत्तीस येणार, याचा अजमास कळून आला, म्हणजे त्याचा धोरणाने त्या मुलाचे अमुक वर्ण मानावयाचा म्हटले, तर त्यात अस्वाभाविक असे काही नाही.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP