श्रीकेशवस्वामी - भाग २६

केशवस्वामींनी मनोभावेंकरून आपल्या कार्यातून हिंदू जनतेस त्यांच्या ठिकाणी आपला धर्म, आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा इत्यादिकांसंबंधी जागॄत केले.


० पद ६५३ वें

अहंकारें गांजिलें परोपरी या कायापुरी ॥

संशय घेतली पाठी भारी तूं यासी वारी ॥१॥

दयेच्या सागरा रामा येई तूं भेटी देई ॥

संपूर्ण प्रसन्न मजला होई निजधामा नेई ॥ध्रु॥

षड्वर्गीं घेतलें घ्ज्ञरीं धरणें म्यां काय करणें ॥

विषयीं गुंतलें सर्वहि करणें नाठवेचि तरणें ॥२॥

प्रपंचे गोविलें चित्त पाही उपाय नाहीं ॥

सन्मार्ग धरितां कांही नाहीं हें न कळे कांहीं ॥३॥

मायेचि पडली पायीं बेडी हे कोण तोडी ॥

तुझिया नामाची केली जोडी तूं बंद सोडी ॥४॥

केशवदातारां निर्विकारा साराच्या सारा ॥

सर्वदा स्वरूपीं देई थारा तूं दीनोद्धारा ॥५॥

० पद ६५४ वें

भवार्णवापासुनी सोडवीलें ॥ ब्रह्मानंदसागरीं बुडवीलें ॥ध्रु॥

त्याचें नाम विसरों कैसें आतां ॥ जेणें माझा घेतला भारु माथा ॥१॥

रूप त्याचें पाहीन धनीवरी ॥ पाय त्याचे वंदीन नित्य शीरीं ॥२॥

केशवप्रभु कृपाळू महाराज ॥ माझी त्याविण कवणासि नाहीं लाज ॥३॥

६५५ आरती केशवराज

निष्कामपंढरी हो । जेणें वसविली पाहें ॥

विज्ञान-चंद्रभागातटिं तटस्थ राहे ॥१॥

हे मूर्ति विठ्ठलाची । आम्ही लोचनीं पाहूं ॥

आरति करूनि भावें । ० पदीं निमज्ञ राहूं ॥ध्रु॥

समचरण नित्ययुक्त । कटिं समान हस्त ॥

समदृष्टि विश्र्वपाहे । सदा आनंदभरित ॥२॥

अवीट ध्यान ईट ॥ उभा त्यावरि नीट ॥

अंतरि निकट ध्यातां । नासी सौंसारकष्ट ॥३॥

चिंतितां शोक भंगे । चित्त चित्० पदिं रंगे ॥

रंगल्या भेद गेला । तरी प्रेम न भंगे ॥४॥

अनंत पुण्य गांठी । तरी परतल्या दृष्टि ॥

केशवीं भेटि जाली । नव्हे वाच्य हे गोष्टी ॥५॥

६५६ आरती

चौऱ्यांशी लक्ष सोंगें । हे हो चुकविली जेणें ॥

उत्तीर्ण त्यासि आम्ही । आतां कैसोनि होणें ॥ध्रु॥

यालागिं आरतेसी । करूं पाउलें माथां ॥१॥

संकल्पशून्य मूर्ती । वेद वर्णिती कीर्ती ॥

अंतरिं लाक्षतांची । जाली संत्रुप्त वृत्ति ॥२॥

अनाथबंधू पाहीं । लीळा नेणवे कांही ॥

केशवीं भेटि होतां । ठाव दुःखासि नाहीं ॥३॥

६५७ आरती

सौंसारसागरीं हो । संततारक पाहीं ॥

बोलती वेदशास्त्रें । येथें संदेह नाहीं ॥ध्रु॥

यालागिं निजभावें । जावें शरण त्यांसी ॥

आरती प्रेमयुक्तें । कीजे पाद-० पद्मांसी ॥१॥

स्वमुखें पूर्ण पाहीं । देहातीत तें देहीं ॥

वर्तती मुक्त सृष्टी । भेद रगडुनि पाईं ॥२॥

निष्कामधाम तें हो । संत देवाधिदेवो ॥

केशवीं भेटि होतां । जालें ख-पुष्प देहो ॥३॥

६५८ आरती

जन नाहीं तेथें कैचें निरंजन । शिष्य नाहीं तेथें कैचें गुरूपण ॥

ब्रह्मीं ब्रह्मत्व मिथ्यत्वें जाण । अप्रामण वस्तु कैंची प्रमाण ॥१॥

जयदेव जयदेव जय केशवराजा । परमार्थें आरती

सहजीं सहजा ॥ध्रु॥

तुझिया स्वरूपाचा सत्य निर्वाहो । तेथें मीतूंपणा नुरेचि ठावो ॥१॥

ऐक्येंसि दुजें सहजचि वावो । फिटली भ्रांति कैंचा संदेहो ॥२॥

सद्गुरुकृपें पाहतां निजात्मस्थिती । अवाच्य वस्तु म्हणवुनि परतल्या श्रुति ॥

नेति नेति या अर्थें राहील्या स्फूर्ती । सद्गुरुकृपें करुनी केशवीं प्रचिती ॥३॥

६५९ शेजारती

निष्कामभुवनीं सुमन-सेज केली । येकांती बैसली शांती रमा ॥१॥

म्हणे पाचारा वेगीं पाचारा । निजाचा सोयरा रामूराणा ॥ध्रु॥

शुद्ध सत्त्व-हार गुंफीला साचार । सद्भाव उपचार सिद्ध केले ॥२॥

केशवराज प्रभु निजभक्तवत्छळ । हृदयींचा गोपाळ हृदयीं आला ॥३॥

६६० शेजारती

प्रबोध-मंचकी सेज रचिली बरी । चालावें श्रीहरी देवराया ॥ध्रु॥

चालावें हरी चालावें । ० पदो० पदीं सुख आपुलें घ्यावें ॥१॥

चित्शक्ति बाळा । रुक्मिणी वेल्हाळा । पाचारी गोपाळा । शीघ्र यावें ॥२॥

केशवराज प्रभु चालावें झडकरी । लोटली शार्वरी उदयो जाला ॥३॥

६६१ शेजारती

विज्ञान-मंचकी बैसला गोपाळ । शांति-भीमकबाळ चरण वंदी ॥ध्रु॥

म्हणे भाग्य निकें भाग्य निकें । माझिया मंदिरीं राम आला रे ॥१॥

ब्रह्मादि सुरवरां नेणवे पार । तो मज साचार जोडिलासे ॥२॥

केशवराज प्रभु सबाह्य भेटला । त्यासुखें आटला देहभाव ॥ ॥३॥

६६२ शेजारती

तळीं विरो धरा नाहीं गगनावरी उरी । ऐसिया सेजारी निद्रा आंगाचि वरी ॥ध्रु॥

यापरी सुखशयन रघुराजें केलें । आंगाचें पहुडणें कैसें आंगचि जालें ॥१॥

निरालंबी सेज कैसी सहजीं सहज । सेज ना आपण तेथें कैंचा उमज ॥२॥

सद्गुरुकृपें केशवराजीं निजीं निजलीळा । निजपणेंविण अवघा निज सोहळा ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP