श्रीकेशवस्वामी - भाग २२

केशवस्वामींनी मनोभावेंकरून आपल्या कार्यातून हिंदू जनतेस त्यांच्या ठिकाणी आपला धर्म, आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा इत्यादिकांसंबंधी जागॄत केले.


० पद ५२८ वें

पाहों गेलें नंदाच्या नंदना । तंव मूर्ती बैसली नयना ॥ध्रु॥

छंदु तिचा लागला या मना । कांही केल्या विसरू पडेना ।

आतां बाई काय वो करावें । मन माझें मोहीलें यादवें ॥१॥

सहज त्यासी पाहों मी गेलीये । पाहतें पाहणें गिळुनी ठेलीये ।

मागुती दृश्यावरी जों आलीये । तोंचि सर्व देखती जालीये ॥२॥

आसनीं शयनीं भोजनीं गमनीं । सर्वदा मज वेधलें साजणी ।

सद्गुरुकृपें केशवीं दरुशनीं । समाधी-युत्थान राहिली गिळुनी ॥३॥

० पद ५२९ वें

जो गोकुळीं गोधन राखे । जो स्वानंद गोरस चाखे ।

ज्याच्या प्रकाशें त्रैलोक्य झांके । तो हृदयीं येऊनी कै ठाके गे बाई ये ॥ध्रु॥

लागली तयाची फार गोडी । बुद्धि तयाकारणें जाहली वेडी गे ॥१॥

जो नंदाचे घरीचा बाळु । जो काळाचाही महाकाळु ।

जो दीनबंधु त्रैलोक्य पाळु । ज्याचें प्रसिद्ध नाम गोपाळु गे बाई ॥२॥

जें साधुचें निजमाहेर । जें विश्रांतिचें मुळ घर ।

जो विश्र्वंभर परात्पर । तारी नामेंची भव दुस्तर गे ॥३॥

जो सायोज्य निज० पद-दाता । ज्याचें पायवणीं शिव वंदीं माथा ।

ज्याचे मस्तकीं पाय धरी धाता । त्याचें स्वरूप दावी मज आतां गे ॥४॥

जे साराचें निजसार पाही । थार त्याविण कोठेंचि नाहीं ।

ज्याच्या पारुची न कळे कांही । दास केशव शरण त्याचे पाईं गे बाईय ॥५॥

० पद ५३० वें

जो आदित्यकुळनायकु । जो शशांक-कुळदीपकु

जो त्रैलोक्य कुळद्योतकु । जो सकळ रूप येकु ग बाई ॥ध्रु॥

तो चिदानंद गोविंदु । ज्याचा योगियांसी लागे छंदु ।

जो अवाप्तकाम दीनबंधु । त्यासी न भजे तो भाग्यमंदू ग बाई ॥१॥

जो निष्काम कोंदडधारी । देवाधिदेव कौंसारी ।

जो आलक्ष निर्विकारी । निजदासांचें भवदुःख वारी ग ॥२॥

जो वैकुंठपुरीचा रावो । जो रमा-रमण वासुदेवो ।

नासी ध्यानेंचि देह-संदेहो । त्याच्या चरणीं स्थिर केशवो ग बाई ये ॥३॥

० पद ५३१ वें

कृष्णापाशीं अक्रुर आला । कृष्ण त्सासवें रिघता झाला ॥ध्रु॥

अति सभाग्यें अक्रूर । नेला पतित-पावन धूर ॥१॥

वृत्ति गोपिका सारूनी । नेला एकट चक्रपाणी ॥२॥

अवघें गोकुळ परतें केलें । केशवस्वामीसी उघडें नेलें ॥३॥

० पद ५३२ वें

रथीं घालुनि नेला देवा । कोण पूर्वपुण्याचा ठेवा ॥ध्रु॥

तया अक्रुराचे पाय । शिरीं वाहे तो अक्रुर होय ॥१॥

सूर्य ज्याचेनि तेजें शोभे । तो अखंड आदिरथी बिंबे ॥२॥

केशव म्हणे भला भला । देव सगळा घेउनि गेला ॥३॥

० पद ५३३ वें (राग - बसंत)

मनमोहना, कमळदळलोचना । जगजीवना, त्रिविध-तापमोचना ॥ध्रु॥

तुझ्या स्मरणें मानस माझें धालें । तुज पाहतां सफळ जन्म माझें जालें रे ॥१॥

सुखदायका यादवकुळ-दीपका रे । भवतारका, ब्रह्मांडकोटिनायका रे ॥२॥

दीनोद्धारणा, सगुणा, दीनबांधवा । दुःखहरणा, निर्गुणरूप माधवा ॥३॥

अतिमंगळा, निष्कळा, ज्ञानसागरा । प्रेम-पंकज-भ्रमरा, रमा-श्रीवरा ॥४॥

सत्समूर्ती, गोपती, जगत्कारणा । भक्तभूषणा, केशवस्वामी संपूर्णा रे ॥५॥

० पद ५३४ वें

शांती कांबळी पांघरे गाई चारी वो । अंगसंगें भुलवी व्रज नारी वो ॥ध्रु॥

पैल उभा सावळा गोपीनाथू वो । वृंदावनिं निर्मळ पावा वातु वो ॥१॥

गुणतीत सगुण वेषधारी वो । गोपाळांसी खेळे यमुनातीरीं वो ॥२॥

नारायण सकळ सुखदायक वो । हृत्पंकजीं दीपक जगन्नायक वो ॥३॥

पीतवसन सुंदर श्याम नेसला वो । पूर्ण काम पाहतां शिव तोषला वो ॥४॥

मुकुटकुंडल कस्तुरी माथां रोखिली वो । उदरीं वनमाळा सर्वांगी मिरवली वो ॥५॥

दीनानाथ केशवराज स्वामी । भावें चरणीं घातली मिठी

आम्ही वो ॥६॥

० पद ५३५ वें ( चाल -खेळयाची )

बहुत गाठारे, कान्हा बहुत गाठारे ।

शेलका वाटा हाणोनि नेतो आम्हांसी लावितो घाटा रे ॥ध्रु॥

देहबुद्धीनें आम्ही रोडचि झालों आपण आनंदे लाठा रे ।

कवण आमुची नुपजेची यासी कैसा हा कपटी मोठा रे ॥१॥

भजनेविण हातीं कांहींच नेदी हा तंव केव्हढा खोटा रे ।

गुरुकृपें केशवीं बळेंचि घेतलें देउनि भावबळें दाटा रे ॥२॥

० पद ५३६ वें

निजरूपें सावळीं । सहजानंदाची बाळी ।

आनंदाची पुतळी । कान्हाई माझी ॥ध्रु॥

श्यामसुंदर बाळा । निजतेजें सोज्ज्वळा ।

अंतरींची जीवनकळा । कान्हाई माझी ॥१॥

योगियांची माउली । यशोदेची तान्हुली ।

सकळांची साउली । कान्हाई माझी ॥२॥

गोपिकांची आवडती । पांडवांची पढीयती ।

हृदयींची आवडती । पांडवांची पढीयती ।

हृदयींची विश्रांती । कान्हाई माझी ॥३॥

बळीरामाची धाकुटी । रूपेवीण वरवंटी ।

पाहतांची निवे दृष्टी । कान्हाई माझी ॥४॥

निजाची सांगातीनी । विश्रांतीची मायबहिणी ।

भेटतांची हरे शीण । कान्हाई माझी ॥५॥

सद्रूपाची भरणी । केवळ सुखाची खाणी ।

केशव म्हणे स्वामिनी । कान्हाई माझी ॥६॥

० पद ५३७ वें

फेडी ग माय जमनीक माझें । श्रीगुरुराज कृपादृष्टीं ॥ध्रु॥

निजज्ञान-अंजन घालुनी परिपूर्ण । दाविलें निधान माजी डोळां ॥१॥

गुरुकृपें केशवीं नवल कैसें जालें । प्रत्यक्ष दावीलें निजरूप ॥२॥

० पद ५३८ वें

तरावयाची चाड जरी तुझ्या मनीं । तरी तूं लाग चरणीं सद्गुरूच्या ॥ध्रु॥

सद्गुरु ते ब्रह्म नित्य निरूपम । जयाचेनि सर्वत्र सम जालें बा ॥१॥

अनन्यभाव गती करितां सद्गुरुभक्ती । आंदण्या चारी मुक्ती होती बापा ॥२॥

सद्गुरुवचनें भावो लाभे भेटे देवो । केशवीं अनुभवो कृपामात्रें बा ॥३॥

० पद ५३९ वें

गुरुमुखें बुडी दिधली जंव । तो मनाचा मुळीं लागला थंव ॥ध्रु॥

यापरी रिघतां अक्षोभजळीं । येकायेकीं कैसा बैसला तळीं ॥१॥

गुरुकृपें केशवीं मुळासी गेला । चोंढीये पाथर जेवीं बुडाला ॥२॥

० पद ५४० वें

देउनि तारकरूप सेवा । चित्सुत्वभुवनीं मज ठेवा ॥ध्रु॥

मंगळमूर्ती गुरुराया । मजवरि करणें निजछाया ॥१॥

अपार करुणानिधि यावें । अक्षय वैभव मज द्यावें ॥२॥

तुजविंण नाहीं गति आम्हां । केशव कविच्या विश्रामा ॥३॥

० पद ५४१ वें (धाट-बिलंदी)

देखिलें कृष्ण-मुख-कमळ । जालें वो जन्म माझें सफळ ।

भेटलें निजरूप निखळ । कोंदलें सुख आंगी अढळ ॥ध्रु॥

तुटलें गुणत्रय समुळ । खुंटले येणें जाणें सकळ ।

भेटलें निजरूप निर्मळ । दाटलें सुख आंगीं अढळ ॥१॥

कामना सर्व विरोनि गेली । कल्पना वस्तु पाहतांचि मेली ।

मायेची शांति निःशेष जाली । स्वामीची मूर्ती हृदया आली ॥२॥

आनंदीं परमानंदू जाला । बोधू तो निजबोधीं निमाला ।

केशव गुरुकृपें निवाला । सहज तो देहभाव गळाला ॥३॥

० पद ५४२ वें

पैल रे साधूचें अधिष्ठान । पैल रे समाधीचें साधन ॥

पैल रे तें कैवल्यनिधान । पैल रे निजतत्त्व विज्ञान ॥ध्रु॥

देखिलें आजी आम्हीं नयनीं । देखिलें बोधनंदसदनीं

देखिलें देह-वृंदावनीं । देखिलें स्वानुभवेंकरोनी ॥१॥

पैल रे गुह्य निजगुह्याचें । पैल रे सुख निजसुखाचें ॥

पैल रे सार सर्व साराचें । पैल रे रूप त्या ईश्र्वराचें ॥२॥

पैल रे मूळ जीवशिवाचें । पैल रे जन्मस्थान सर्वांचें ॥

पैल रे रूप माझ्या देवाचें । पैल रे ध्येय त्या केशवाचें ॥३॥

० पद ५४३ वें

आपुलें स्वरूप मज दाखवुनि डोळां । माझे मनीं लावियला चाळा येणें वो ॥ध्रु॥

तें गुज केविं आतां सांगुं वो साजनी । अखंड सारंगपाणी मंदिरा येतो ॥१॥

चिंता-ममता दोन्ही निरसुनी अहंता । आळंगी तो सुखदाता हृदयकमळीं ॥२॥

निकट देउनि भेटी सर्वांगीं घातली मिठी । आनंदे कोंदली सृष्टी केशवसंगें ॥३॥

० पद ५४४ वें

अवो हरी पैल पैल गगनावरुते । तेजपुंज बाई दिसतें ॥ध्रु॥

तेणें मज लाविला चाळा । तेंचि रूपं दिसतें डोळां ॥१॥

डोळां दिसे परी नाडळे । पाहतां सर्वांगी आढळे ॥२॥

गुरुकृपें केशवीं पाहीं । पाहतां मी तूं नुरे कांहीं ॥३॥

० पद ५४५ वें

सत्य जें निजसूत्र मनाचें । नित्य जो ध्येय संतजनांचें ।

क्षेत्र जो सकळ भुवनाचें । मूळ जो निःखळ गगनाचें ॥ध्रु॥

क्रीडतो गौळियांचे घरीं हो । क्रीडतो गोकुळा भीतरीं हो ।

क्रीडतो यमुनेच्या तीरीं हो । क्रीडतो अंतर्बाह्य हरी हो ॥१॥

आद्य जो सर्व आद्यांसी पाही । वेद्य जो सर्वदा सर्व देहीं ।

वंद्य जो तिन्ही लोकीं निश्र्चईं । सिद्ध जो सर्वदा सर्व ठाईं ॥२॥

कळे जो गुरुवाक्य-विचारें । भेटे जो निज-साक्षात्कारें ।

साधे जो आत्मध्यानें निर्धारें । केशवीं मग्न तदाकारें ॥३॥

० पद ५४६ वें

मारिलें काम-कौंसासी देखा । वधिलें द्वेष-शिशिपाळदिकां ।ं

मर्दिलें भेद-दैत्य अनेकां । शोषिलें भ्रांति-पूतना-विखा ॥ध्रु॥

लागलें ध्यान त्या गोविंदाचें । लागलें ध्यान बाळ-मुकुंदाचें ॥

लागलें ध्यान आनंदकंदाचें । लागलें ध्यान परमानंदाचें ॥१॥

बुडविले कर्म-कौरव जेणें । स्थापिला धर्म, निजधर्मपणें ॥

घेतला मोहो जरासंधप्राणें । मारिले भक्त नितात्मज्ञानें ॥२॥

भोगी ज्या प्रेमें गोपीबाळा । दंडिलें काळीयारूप काळा ॥

दिधला सज्जनांसि सोहळा । केशवीं पाहतां नीज डोळां ॥३॥

० पद ५४७ वें

गोड बहु लागतो बाइ कान्हा । सेवितां ० पदो० पदीं मन निवे जाणा हो ॥ध्रु॥

गोडी आगळी नित्य नवी रुची । स्वर्गसुखासि हे चवी कैंची हो ॥१॥

मोक्षफळ श्रुति वनिती पाहीं । त्यासी तेही गोडी ऐसी नाहीं हो ॥२॥

गुरुकृपें केशव गोडी सेवी । ब्रह्मानंदासी वांकुल्या दावी हो ॥३॥

० पद ५४८ वें

कृष्णरूपा भाळल्या गोपीबाळा रे । डोळे मोडुनि नित्य पाहति गोपाळा रे ॥

गोपी-मानसीं अखंड कृष्णचाळा रे । कृष्णीं रातल्या निःशंक वेल्हाळा रे ॥ध्रु॥

आसन शयनीं भोजनीं आणि गमनीं रे । कृष्णावांचुनि त्या नेणती

कामिनी रे । कृष्णसांवळा देखती जनींवनीं रे । कृष्णीं विराल्या

कृष्णासी पाहतां नयनीं रे कृष्णीं वीतल्या तन्मय ठेल्या रे । कृष्णा पहिल्या चित्तवृत्ती गळाल्या रे ॥

कृष्णीं लोधल्या त्या कृष्णेशीं मीनल्यारोकृष्णीं मिळतां सबाह्य कृष्ण जाल्या रे ॥

आत्मयोगें आनंदें परमानंदें रे । काम निष्कामें उद्बोधें प्रेमछंदें रे ॥

गोपी सद्भावें वेंधल्या कृष्णवेवें रे । गुरुकृपें केशवीं पूर्ण बोधे रे ॥३॥

० पद ५४९ वें

श्रुति वर्णिती ज्याचे पवाडे । भेद-दैत्य मर्दिले जेणें गाढे ॥ध्रु॥

खेळे तो हरी गोकुळीं माय । ज्याचे सुरनर वंदिती पाय ॥१॥

ज्याशीं चिंतितां भवतम नाशे । विश्र्व जेणें तेजें प्रकाशे ॥२॥

गुरुकृपें केशवीं पाहे । पाहतां भूक-तहान जाय ॥३॥

० पद ५५० वें

कोण नेणो आजी येक देखिला बाईय ।

रूप त्याचें जाणें परी नांव नेणें ।

मोहिलें मानस तेणें माझें वो सखीय ॥ध्रु॥

सांवळासा आहे । मुखीं पांवा वाहे ।

अक्षपत्र शिरीं खुण त्याची वो माय ॥१॥

दिव्यकुंडलें कानीं झळकती पूर्णपणीं ।

सहज कस्तुरी भाळीं बिंबलें तें रूप मनीं ॥२॥

पीतवस्त्र कटितटीं घेतलीसे माळ कंठीं ॥

चंदनाची उटी आंगीं पाहतां पांगुळे दृष्टी ॥३॥

ज्ञेय गुंजाची गाठी । गळा रुळे गोमटी ।

प्रेम-कांबळी खांदीं हातीं प्रबोध-काठी ॥४॥

चैतन्याचा गाभा गोधन चारीत उभा ।

लोपे कोटीसूर्यतेज । याचिया अंगप्रभा ॥५॥

वर्णितां वेदश्रुती । परतल्या नेती नेती ।

क्रीडतसे यमुनातीरीं । केशवप्रभुची मूर्ती ॥६॥

० पद ५५१ वें (राग - मल्हार; खेळया)

पैलागोकुळीं क्रीडतो शेषशाई रे । ॥ध्रु॥

त्रिभुवनिं चरित्र ज्याचें अखंड गाती । तो गौळीयाच्या राखितो गाई रे ॥१॥

गोपीगोपाळ मेळवुनियां मेळ । सवें बळीराम भाई रे ॥२॥

अनादींचें मूळ ज्यासी नाहीं यातीकुळ । तो यशोदेसी म्हणतसे आई रे ॥३॥

साधक जयालागीं धुंडती चहूंकडे । ब्रह्मादिक लोळती पाईं रे ॥४॥

मुनिजन ज्यासी अहर्निशी ध्याती । कांपती कळिकाळ ठाई रे ॥५॥

केशवप्रभु पहा देवाचाही देव । भेटलिया येणें जाणें नाहीं रे ॥६॥

० पद ५५२ वें

मजकडे आंगोळी कां वो दावीतो । नंदनंदन सय्य खुणावीतो ॥ध्रु॥

सांवळ्या वर्णाचा हा वो गोविंद माय । क्षणक्षण खुणावितो करूं मी काय ॥१॥

अहर्निशी पाठी माझी घेतली येणें । कवणा पैं सांगों माझे मीच वो जाणे ॥२॥

गुरुकृपें केशवीं नित्य खुणावी । हिरोनी मानस चाळा आपुला लावी ॥३॥

० पद ५५३ वें (खेळया केशवराज)

गोकुळा लागला चाळा रे भाईनो गोकुळा ।

आनंदे गडी हे घालीती हुंबली । येकामेकांहुनि बळी रे ।

देह-कांबळी तेथें विसरोनि गेले । नाचति प्रेमें गोंदळी रे भाईनो ॥१॥

नाचती गोपगोपी करिती उछावो । ब्रह्मानंदे घरोघरीं रे ।

गोकुळामाझारीं कोणी कोणासी नोळखती । तटस्थ नरनारी रे भाईनो ॥२॥

ऐसा ठाईंचा ठाईं समाधिस्थ पाही । तेथें नाठवे मीतूंपण कांहीं रे ।

गुरुकृपें मन केशवीं निमालें । तेथें बोलणें खुंटलें एक्या घाई रे भाईनो ॥३॥

० पद ५५४ वें

हळूच येउनि भाक देउनी फुंकियले काना ।

ऐका संधी साधुनि मज नेलें वर्ल्या राणा ॥ध्रु॥

लाघवी हा नाटकु भवरभोग्या कान्हा ॥

नाना खेळे खेळे यासी कोण म्हणे साना ॥१॥

यमुनेच्या तीरा मी वो जीवन भरूं गेलें ॥

यकायकीं तेथें मज मौन्य येणें केलें ॥२॥

जाती-कुळ-गोत्र आतां कैचे आम्हांलागीं ॥

सर्व संगी मुक्त केशव प्रभुचिया संगी ॥३॥

० पद ५५५ वें

वृंदावनीं घननीळा । पाहतांचि निज डोळा ॥

विसरली यातीकुळा । भाळलीय गोपाळा ॥ध्रु॥

काय मज चाड बाई । लौकीकाची वो ।

आवडली लागली माजी । गोपाळासी वो ॥१॥

हासंती सकळ लोक । नाहीं त्याचें मज दुःख ।

पहातां हरीचें मुख । तन्मय जाहलें देख ॥२॥

सांडिला म्यां घराचार । सांडिला म्यां भ्रतार ।

हृदयीं यादव वीर । धरीयला निरंतर ॥३॥

नाठवेचि चिंता ममता । नाठवेचि भवव्यथा ।

केशव म्हणे वो आतां । कवळिलें जगन्नाथा ॥४॥

० पद ५५६ वें

माझे हृदयीं कोंदलें रूप तुझें रे । तुजविण नाठवे कांही दुजें रे ॥ध्रु॥

माझ्या जीवींच्या जीवना मेघश्यामा रे । तुझें ध्यान लागलें नित्य आम्हा रे ॥१॥

ध्यानीं-मनीं-नयनीं तूंचि एकू रे । सर्वभूतीं तुजचि अवलोकूं रे ॥२॥

म्हणे केशव सखया कृष्णनाथा रे । जीव गेलिया न सोडी पाय आतां रे ॥३॥

० पद ५५७ वें

कृपाघना निर्गुण जनार्दना रे । ध्यान तुझें लागलें मनमोहना रे ॥ध्रु॥

तुझ्या स्वरूपीं लागला माझा हेतु रे । तुझी मूर्ती कोंदली हृदयांत रे ॥१॥

तूं जजनी-जनक माझा पाहीं रे । तुजपरता सोयरा कोणी नाहीं रे ॥२॥

विश्र्वरूपा चिद्रूपा सुखरूपारे । केशव प्रभु भेटला गुरुकृपा रे ॥३॥

० पद ५५८ वें

प्रेम-यमुनाजळ भरूं गेलें निर्मळ । भेटला गोपाळा तेणें पालवीं धरीलें वो ।

झाडितां न सोडी हरी बळकट धरिलें करीं । लोकाचारी उरी माझी उरोंचि नेदी वो

आतां मी काय करूं वो बाईये । धरिला ० पदर माझे न सोडी सारंगधरू ॥

पडिलें याचिये हातीं जाऊं कैसी मागुती । भोगतां दिवसराती आठवूं नेदी वो ।

सद्गुरु कृपादृष्टीं केशवीं देउनि भेटी । येकांतीं लोकांतीं मिठी घातली येणें वो ॥

० पद ५५९ वें

संतदया कसी फळली ग बाई । ब्रह्मादिक पार नेणती जयाचा ॥

देखियला हरी शेषशाई वो ॥ध्रु॥

साधन संपत्ति नेणें मी निश्र्चिंती । परमदीन अती मूढमती वो ।

नेणो कैसीं जाली करणी तयाची । सबाह्य कोंदला

कमळापती वो ॥१॥

राजविलोचन भवभयमोचन । रमारमण यादवां भाई वो ।

केशवस्वामी जीहीं भेटविली मी काय । तयाप्रति होऊं

उतराई वो ॥२॥

० पद ५६० वें

संतदया कैसी आली फळा । त्रिविध ताप माझें समूळ निमालें ॥

देखिलें बाई घननीळा वो ॥ध्रु॥

काम क्रोध लोभ सकळ विराले । लाधलिय परमात्मकळा वो ।

ब्रह्मानंद० पदीं मग्न जालीया । विसरलें तेणें यतिकुळा वो ॥१॥

नामरूपादिक भेद हे सरले । पावलिया जीवशिव मूळा वो ।

केशवराजीं परिपूर्ण बोधस्थिती । डुल्लत निरंतर स्वलीळा वो ॥२॥

० पद ५६१ वें

गोरसमीसें गोपी मथुरेसी आल्या ।

देखिलें कृष्णासी तेणें तन्मय झाल्या ॥ध्रु॥

देखिलें गोपाळा राहिला गोरसचाळा ।

गोविंद माधव घ्या घ्या म्हणती गोपीबाळा ॥१॥

कृष्णासी पाहतां डोळां । वेधिल्या बारा सोळा ।

जोडिला अकुळ तेणें मुकल्या जातीकुळा ॥२॥

यापरी कृष्णलीळा भोगितो वेळोवेळां ।

गुरुकृपें केशवीं नीच नवा सोहळा ॥३॥

० पद ५६२ वें

पडिल्या गौळणी कृष्णसुखा हो ॥

पाहतां कृष्णासी नाठवे दिवसनिशी । विसरल्या देहीं देहभाव देखा हो ॥ध्रु॥

कामी अकामी कृष्ण अंतर्यामीं । आणिक नेणती त्या गोपिका हो ।

आसन-शयनीं कृष्णमय कामिनी । कैंची तेथें लोकराज शंका हो ॥१॥

कृष्णारूपीं निजरती सर्व कृष्ण देखती ।

निजदेहीं भोगिती कृष्ण-सुखा हो ।

ब्रह्मादिकां ज्याचें न कळे पार तो ।

गुरुकृपें केशवीं लाधला फुका हो ॥२॥

० पद ५६३ वें

दुडीवरी हो दुडी सात निघाल्या । कृष्णासि पाहूं गोपी मथुरेसी आल्या ॥ध्रु॥

मुखीं कृष्णनाम हृदयीं मेघश्याम । अंतरीचें रूप पाहतां निवाल्या ।

पतिसुतगृहधन सांडुनिया सर्व । निर्लज्य हरीरूपीं समरस जाल्या ॥१॥

गोरसाच्या आडनांवी उगवली सर्व गोवी । देखिल्या गोसावी

चित्तवृत्ति निमाल्या । सद्गुरु-कृपादृष्टी केशवीं निजभेटी । तद्रुप गोपी स्वरूपीं मिळाल्या ॥२॥

० पद ५६४ वें

हरी हरी हरी हरी म्हणतां माझे मानस निवालें ।

कमळा-वल्लभ पाहतां सार्थक वो जालें ॥ध्रु॥

विधिहर भूधर वर्णिति ज्याचें निशिदिन पवाडे ।

मदनमूर्ति तो गिरिधन गोविंद ध्यातां सुख वाढे ॥१॥

दीनदयाकर सामसितावर अलभ्य फळदाता ।

हृत्पंकजदळीं धरितां माझी गेली भवव्येथा ॥२॥

त्रिभुवननायक, निज० पददायक, केशवस्वामी वो ।

सद्गुरुकृपें जाली भेटी अंतर्यामीं हो ॥३॥

० पद ५६५ वें

दखिलें देवकीनंदना ग बाईय । संसारवेदना माझी सहजचि सरली ।

आलीय सायोज्य सदना ग बाईय ॥ध्रु॥

लाभलाभीं अती निश्र्चळ जाहली । वेधलीय वेदना ।

तेणें सुखें मी वो बहुत निवालें । विसरली यमदमा ग बाईय ॥१॥

प्रकाशीं प्रकाश मिळे जीवनीं जीवन लोळे । भेटलें गगन गगना ।

यापरी दरूशन माय केशवीं मिळालें पाहे । राहिली जीव शीव । भावना ग बाईय ॥

देखिलें देवकीनंदना ॥२॥

० पद ५६६ वें (राग-कांबोध)

दृष्टिवीण दिसे तो सय्ये कान्हा वो । आंगेविण भेटतो नित्य जाणा वो ॥ध्रु॥

स्वानुभवें सर्वदा दृश्य होतो । रूपेंविण सहज क्षेम देतो ॥१॥

आंगोआंगीं भरला पूर्ण आहे वो । सिद्धप्रचीति पुसणें तेथें काय वो ॥२॥

गुरुकृपें केशवीं यादवराणा वो । पाहतां उरी नुरे मीतूंपणा वो ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP