श्रीकेशवस्वामी - भाग २४

केशवस्वामींनी मनोभावेंकरून आपल्या कार्यातून हिंदू जनतेस त्यांच्या ठिकाणी आपला धर्म, आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा इत्यादिकांसंबंधी जागॄत केले.


० पद ५९० वें

चौ-देहाचा जाला चूर्ण । मग सहजचि उरलें पूर्ण ॥ध्रु॥

तें पूर्ण ना नव्हे अपूर्ण । पूर्णा-पूर्णातीत संपूर्ण गा हे वासुदेव सांगतोपाहीं ।

मन ठेवीं तूं त्याचिया पायीं गा ॥१॥

नाम-रूपातीत अखंड । जें गुह्याचें गुह्य उदंड जेथें हरपला पिंड-ब्रह्मांड ।

कांहि नुरे मायेचें बंड गा ॥२॥

जनन हे निसंचलें जनीं । ज्याचें स्वरूपीं राहिले मुनी जेथें मावळले जिवशिव दोन्ही ।

म्हणे केशव तत्त्वदरुषनीं गा ॥३॥

हें वासुदेव सांगतों पाही ॥

० पद ५९१ वें

गुरुभक्तीचा दारवंटा । संतभजनीं तत्पर मोठा ।

सर्वभूतीं समान निष्ठा । तो श्रेष्ठयाचा निजश्रेष्ठा गे ॥ध्रु॥

हें वासुदेव सांगतों आतां । त्याचे पाय तूं बंदी माथां ।

लाभ तयाचें नाम हें गातां । सुख तयासि अंतरीं ध्यातां ॥१॥

जो कृपाळु सकळांवरी । घडमोडीची नेणें कुसरी ।

जो आपुलाचि आपण हरी । त्याचीं पाउलें केशव धरी ॥३॥

० पद ५९२ वें

गुरुभक्तीसी कातरू मोठा । संतभजनीं केवळ खोटा ।

सर्व भूतांसी दावि अंगोठा । तो फलगट काय किजे लोठा गा ॥ध्रु॥

हें वासुदेव सांगतों अतां । दुःख आहे तयाचें नाम गातां ।

पाप तयासी दृष्टि पाहतां । नर्क त्याचेनि संगें राहतां गा ॥१॥

जो सद्भावें अति आगळा । जो प्रेमाचा निजपुतळा ।

ज्यासी लाधली अंतरकळा । बहुभाग्यें तो देखिजे डोळां गा ॥२॥

ज्यांसी भांडवल सौंसार पाहीं । सर्व अनर्थ त्यांचिया पायीं गा ॥३॥

जो त्रिकाळीं आनंद भोगी । भेदीं अभेद देखणा योगी ।

जो आपणचि आपला संगी । दीनजनासि बहु उपयोगी गा ॥४॥

ज्यासी नाथिली चिंता मोठी । जो अखंड भय घे पोटीं ।

जो मायागुणी हिंपुटी । नको स्वप्नीं तयाची भेटी गा ॥५॥

जो धरोनि संग न धरी । जो करूनि कांही न करी ।

जो आनंदी आनंद करी । नाहीं कांहीच उरली उरी गा ॥६॥

जो देह बुद्धि व्याकुळ बहू । करि अखंड हाहाहूहू ।

ज्याच्या घरींच राहिला कुहू । म्हणे मूढ मी केवळ जी उगा ॥७॥

जो भेदाचे कवडे खेळे । सत्संगासि देखोनि पळे ।

ज्याचे स्वरूपीं आंधळे डोळे । त्सासी केशव मनें नातळे गा ॥८॥

हे वासुदेव सांगतों अतां ॥

० पद ५९३ वें

मी वासुदेव आपण । आसे वासुदेव सांगतो जाण ।

जनीं-वनीं मी परिपूर्ण । नाहीं आणिक मजविण गा ॥ध्रु॥

मी वासुदेव हें कां नेणा । असे वासुदेव सांगतो खुणा ।

जागें होउनि पाहें आपणा । वेगीं सांडुनि मी-तूंपणा गा ॥१॥

दृश्यभास हें जेथें नाहीं । तें माझेंची स्वरूप पाहीं ।

मजवेगळें दुसरें नाहीं । मीचि व्यापक सर्वांठायीं गा ॥२॥

वासुदेवो मजभीतरीं । मी वासुदेवामाझारीं ।

नाहीं दोघांची वेगळी परी । ऐसें नेणोनि होति रानभरी गा ॥३॥

बहु दिवसां अनयासीं । आला वासुदेव या गृहासी ।

कांही करा दान-पुण्य यासी । नका विसरूं वासुदेवासी गा ॥४॥

मी सांगतों तुमचें हीत । नका उबग मानूं निश्र्चित ।

निदसुरा नको सावचित्त । जागा स्वरूपीं ठेवुनी चित्त गा ॥५॥

जागा असोनी निजसी काय । मीं कोण हे परतोनि पाहें ।

सेवीं वेगीं गुरूचे पाय । मग आजिचें उदियां नये गा ॥६॥

नीदजागर सारूनि वीधी । जागा जागा रे तुम्ही त्रिशुद्धी ।

कसें भुललेती या देहबुद्धी । नाहीं कोणास आपली शुद्धी गा ॥७॥

मी स्वयेंचि वासुदेवो । मज कैचा देहसंदेहो ।

असें जाणे तोचि जागा पाहो । नेणे त्याच्या माथा वाजे घावो गा ॥८॥

ऐसा वासुदेव मुख्य वर्णी । केशव जागा सद्गुरुचरणीं ।

सहजीं सहज वासुदेवपणीं । जागें निजले लटकें दोनी गा ॥९॥

मी वासुदेव हें कां नेणा ॥१७॥

० पद ५९४ वें

माय मारुनि घरच्या घरीं । मावशीशीं व्येवहार करी ॥ध्रु॥

याचि काय मी सांगो गोष्टी । वेदशास्त्रीं भडिंमा मोठी ॥१॥

जीव ईश्र्वर पंडित भले । येणें नाहींच ऐसें केलें ॥२॥

तुर्या परनारी घरा आली । ते घरची बाइल केली ॥३॥

नित्य अकर्मकारी पाहीं । यासी कांहिच लोकिक नाहीं ॥४॥

म्हणे केशव सांगों कोणा । हा समुळ कुळा-बुडवणा ॥५॥

० पद ५९५ वें

आधीं भावापासीं गेली । ते देवानें बाईल केली ॥ध्रु॥

माझा देव भोळा पाहीं । विधिनिषेध नेणें कांहीं ॥१॥

देव सेवुनि भोगी भावा । गोड तंव तंव वाटे देवा ॥२॥

भोळा जाणा भोळीयांत । केशवस्वामी चतुरनाथ ॥३॥

० पद ५९६ वें

माय मारुनि प्रेमें धाला । माउशीचा आजा झाला ॥ध्रु॥

याचें वितंड करणें पाहीं । विष सेवुनि मरणें नाहीं ॥१॥

लेकि वडिला भावासी दिधली । त्याची बाइल आपण केली ॥२॥

बाइलेचा जाला बाप । तऱ्हि अंगिंच न लगे पाप ॥३॥

पुण्यपापाहुनि वेगळा । केशवस्वामीचा विचित्र मेळा ॥४॥

० पद ५९७ वें

कांही बोलूं जातां बोला । हाणे स्वानुभवाचा टोला ॥ध्रु॥

पती दारुण मोठा पाहीं । माझें चालुं नेदी कांहीं ॥१॥

पाहे संकल्पाचें भान । तंव मोडुनि टाकी मान ॥२॥

केशा म्हणे याच्या घरीं । मज कांहीच नाहीं उरी ॥३॥

० पद ५९८ वें (रंगारी)

रामरंग घेउनि आलों । आम्ही रंगारे पैं जालों ॥ध्रु॥

आम्ही रंगारे रंगारे । रामरंगें रंगलों बा रे ॥१॥

रंग निष्काम हृदयीं राउं । रंग भवसंग सरे तो लावूं ॥२॥

म्हणे केशव मी रंगारा । रामें रंगियलों जन सारा ॥३॥

० पद ५९९ वें

कर्म-मळासि धोउनि सांडी । घडी निजस्वरूपीं मांडीं ॥ध्रु॥

आम्ही परीट बा चोखट । शुद्ध केलें खटनट ॥१॥

देहबुद्धिचें फेडुनि मळ । केलें सबाह्य निर्मळ ॥२॥

बोध-साबण लावुनि ठायीं । भेद-डाग काढिले पाहीं ॥३॥

शांति-शिळेवरी धूतलें । ज्ञानगंगेसी धुवट केलें ॥४॥

म्हणे केशव चोखट जालें । परब्रह्मचि होउनि ठेलें ॥५॥

० पद ६०० वें (मल्हारी)

उधळित भव-भंडारासी । नाचत आलों तुजपाशी । ॥ध्रु॥

मल्हारी भवश्रम वारी । पडलों तुझिया दरबारीं ॥१॥

देउनि केवळ ० पदथारा । बरवें रक्षी दातारा ॥२॥

सेवुनि वारी प्रेमाची । आवडि धरिली नामाची ॥३॥

अनुभव जेजुरिराया रे । करि केशव कविवरि छाया रे ॥४॥

० पद ६०१ वें

निजपूर्णमा पूर्णस्थिती । खेळें मातलें आत्मप्रतीती ।

करिती निजबोधें कीर्तन । मूळ आपुलें वाखाणती ॥ध्रु॥

खेळें मातलें मातलें । मूळ वाखाणूं लागलें ।

लाज दवडुनियां बाहेरी । अविट सुखातें रातलें ॥१॥

देहबुद्धिची होळी रचिती । ब्रह्माग्नी पेटविती ।

जाळुनि त्रिगुणेसी निःशेष । ब्रह्मानंदें शंख करिती ॥२॥

चौऱ्यांशी रांडी निगुती । भेटे बुडतां हिंपुटी होती ।

ज्यासी धारण स्वरूपीं । त्सासी कैंची यातायाती ॥३॥

थोर खेळाचा नवलावो । खेळीं सांडीला देहभावो ।

अधिष्ठानातें पाहतां । तन्मय जालें तें स्वमेवो ॥३॥

सद्गुरुचरणीं धरुनी भावो । खेळें मातलें पहा वो ।

केशवीं परमानंद-स्थिति । कोठें न माय उत्साहो ॥५॥

० पद ६०२ वें

आंगिं भगवंताचें वारें । तेणें घुमतसे घुमारे ।

निजप्रेमें गळिती डोळे । पहातां भुलली लहानथोरें ॥ध्रु॥

रंगा आली रे खेचरा । मुळींची एकवीरा ।

अभक्त निंदक देखोनी । दांत खात करकरा ॥१॥

चौक भरीला ठाई दीप । पाजळिला अमूप ।

अधिष्ठान झाड त्यासी । न दिसे नांव-रूप ॥२॥

पानें फुलले निजभोग । लाल गुलाल सुरंग ।

उधळे चैतन्याचा बुका । रंगीं दाटलासे रंग ॥३॥

भक्तिभावाचा सुकाळ । झाड करितसे उल्हाळ ।

गर्जिती स्वानंदाच्या डाका । तेणें छंदें डोले माळ ॥४॥

गुरुकृपें केशवीं संसार पुरा । कोणी न थरे सामोरा ।

आवाहन विसर्जन विशेष । स्वयं बैसली देव्हारा ॥५॥

० पद ६०३ वें (खेळया)

सोळा हजार अंगना केल्या रे । परि कृष्णासवें कोण कोण गेल्या रे ॥ध्रु॥

येथें कोणाचें कोण्हीच नाहीं रे, खेळया ।

विचारितां हें मायेचें लाघव अवघेंचि भुर्रभुस्स पाहीं रे ॥१॥

याग आरंभुनि पुत्रासि निर्मिलें । त्या दशरथासवें कोण कोण गेलें रे,

खेळया गोत्रवध करुनी राज्य जें साधीलें । त्या पांडवांसवें कोण गेलें रे, खेळया ॥३॥

अमरपतीहुनी वैभव आगळें । त्या रावणासवें कोण गेलें रे, खेळया ॥४॥

असें जाणोनी करी स्वहीत आपूलें । धरी केशव प्रभुची पाउलें रे खेळया ॥६॥

० पद ६०४ वें

घरांत घर त्यांत एक वीवर तयांत एक मंदिर रे ।

तया मंदिरीं एक पुरुष नादे तो शरीरेंविण सुंदर रे ॥ खेळया ॥ध्रु॥

तयाचें नांव काय रे, खेळया तयाचें नांव काय रे ।

चतुर होसी तरी सांगुन देशी, नाहीं तरी उगाचि राहे रे, खेळया ॥१॥

जोतीमध्यें एक पडसाई पडली तया एक बाहुली रे ।

आपण तीच्या उदरासि आला पाहतां तेणेंचि केली रे, खेळया ॥२॥

तेणें केली हे वाउगीचि बोली नाहीं तेणें देखिली रे ।

या दोघांत संबंध नसोनि दादा, त्याचिच बाईल जाली रे,

खेळया ॥३॥

फुगट गोष्टी सांडा चावटी किती कपाळकुटी रे ।

तेंच गुज हें सांपडेल, जरी तूं लागे संता-कसोटी रे, खेळया ॥४॥

नव्हे तो शिव नव्हे ते शक्ति न चले वाचाळ युक्ती रे ।

गुरुकृपें केशवीं वीतरागीं गोड अनुभव खूण जाणती रे, खेळया ॥५॥

० पद ६०५ वें (बहिरव जोगी)

निजांग योगी आम्ही बहिरवांचें जोगी ।

सबाह्य निर्मळ सहजीं सहज निजांगीं ॥ध्रु॥

जगजोगी जगजोगी आम्ही बहिरवाचे जोगी ।

मुळींच्या दृष्टी पहातां अवघा क्षेत्रफळ भोगी ॥१॥

शांती झोळी, बोध डमर, अलक्ष मुद्रा कानीं ।

सत्० पद परा शिरीं भैरव शोभे जनींवनीं ॥२॥

अनुहतशिंगी वाजे प्रेमें हातीं त्रिशुळ ।

नाचतो बहिरव पायीं घागरियांचा घोळ ॥३॥

अवघा हा क्षेत्रपाळ तुम्ही पूजा सकळ ।

पूज्य-पूजक अभिन्नयोगें पूजक त्रिकाळ ॥४॥

बहुतां दिवसां फेरा आला बहिरवाचा येथें ।

प्राप्तकाळीं भेटीं दिल्ही केशव सद्गुरुनाथें ॥५॥

० पद ६०६ वें (चुटके धाट)

लय लय लकटा । माझा भाव गोमटा ।

भाव शरण गेलिया । सुखरूप जालीय ॥ध्रु॥

भाव माझा वडील गे । ब्रह्म मोती घडेल गे ।

प्रेम तान्हें भावाचें । पढीय माझ्या जीवींचें ॥१॥

कडीय घेऊं कीं खांदा घेऊं । सुखसिंधु-कांठा नेऊं ।

ऐसा भाव भावीला । तों सुखसागर देखीला ॥२॥

तेथें ज्ञान शिंपुले । मुक्ताफळें भरलें ।

लाग भावाचरणीं । तो तुज देईल साजणी ॥३॥

भावें दिली मज ग । काय सांगूं तुज ग ।

हें महावाक्य बीज गे । केशव सांगें गुज गे ॥४॥

० पद ६०७ वें (कांडण)

सखीय साजणी । ये बैसों कांडनीं । कृष्ण चक्रापाणी । गाउं गीतीं ॥१॥

त्रैलोक्याचें बीज । कृष्णमहाराज । वेळोवेळां गुज । हेंचि बोलों ॥२॥

देह हें उखळ । मन हेंचि मुसळ । जीवभाव तांदुळ । छडो आतां ॥३॥

ज्ञानाज्ञान कोंडा । सडोनियां काढूं । अखंड पाखडूं । कृष्णरूप ॥४॥

कृष्णासवें सांडूं । संसार सकळ । कृष्णाची निखळ । गाऊं गीत ॥५॥

अच्युत केशव । अनंत यादव । हृदयस्थ माधव । गाऊं गीत ॥६॥

गीतीं गीत मुरे । अंगीं कृष्ण भरे । कांडण पडिभरें । केशवराजीं ॥७॥

० पद ६०८ वें (दळण)

येईं वो कान्हाई । हात लावीं बाई । दळण दळीतां पाहीं । सीणलीय ॥१॥

तूं माझी माउली । विश्रांतीची छाया । होईं दळावया । साहे मज ॥२॥

कृपायोगें हात । लावी कृष्णमाय । तेणें द्वैत पाहे । दळीयलें ॥३॥

ज्ञाताज्ञान तळी । विज्ञान खुंटा बळी । अधिष्ठान मुळीं । कृष्ण माझा ॥४॥

सौसाराचें बीज । दळियलें सहज । साहे झाली मज । कृष्णमाय ॥५॥

कृष्णसंगें आम्हीं । सर्व दळियलें । अखंड उरलें । कृष्णरूप ॥६॥

गुरुकृपें केशवीं । दळण पूर्ण झालें । पूर्णीं पूर्ण उरलें । कृष्णनाम ॥७॥

० पद ६०९ वें (झाडणें)

कृष्णसंगे गोपी । झाडिती सौंसार । अविद्येचा केर । निपटूनियां ॥१॥

कृष्णरूपीं गापी । सर्वदा निश्र्चळ । तेणें मायाजाळ । झाडीयेलें ॥२॥

झाडीलें मीपण । झाडीलें तूंपण । कृष्णरूप पूर्ण । आठवूनी ॥३॥

झाडिती कर्माकर्म । झाडिती धर्माधर्म । कृष्ण पुरुषोत्तम । आठवूनी ॥४॥

झाडिती ज्ञेयज्ञान । झाडडिती ध्ययध्यान । कृष्ण सनातन । आठवूनी ॥५॥

गुरुकृपें केशवीं । झाडिलें सकळ । गोपिका निर्मळ । कृष्णसंगें ॥६॥

० पद ६१० वें (श्रीकेशवराज सौरी)

सेज करा भांग भरा धन्या घरा येतो ग शकुन आजि होतो ।

संतसेवेसाठीं आत्माराम भेटि देतो ॥ध्रु॥

चाल माझ्या रामा रे जीवीच्या विश्रामा ।

तुजविण सेज बाज शून्य गमे आम्हां ।

चाल माझ्या आलों वृत्तिसी घालीं पालो ।

येकांतीचें निजगुज तुम्ही आम्ही बोलों ॥१॥

डोळे लावी माळा मोवी सोंग दावी जगीं रे, ध्यान विषयालागीं ।

तैसी सौरी नव्हे रामा चाल घरा वेगीं ॥२॥

अंतरीं पोकळ बाहेरी मुद्रावेश वरपंग रे, जळो त्याचा संग ।

जीविच्या जीवीं पडतां मीठी भेटी अंतरंग ॥३॥

अंतरंगी निजभेटी आत्मारामीं मिठी तेथें वासना वेश न उठी ।

सद्गुरकृपें केशवराजीं भेटिसी नाहीं तुटी ॥४॥

० पद ६११ वें (सवाया केशवराज)

हरिनाम निरंतरी आवडलें । हरिकीर्तनीं मानस हें जडलें ।

हरिचिंतनिंची चित्ताचि वो जडलें । हरिदर्शनीं सर्वही वीघडलें ॥१॥

हरिचिंतनीं मानस हे जडितो । हरी भेटउनि भव वीथडीतो ।

हरि केवळ माझज्ञ कीं गडि तो । हरीहुनि निरंतरिं आवडि तो ॥२॥

रतिपतिची रती सांडुनि देती । संत० पदीं अती सुलीन होती ।

पावति ते नर अक्षयधामा । न येति कदा मग या रूप-नामा ॥३॥

सुखसागर जी गुरु विश्र्वबीजा । जनकानन व्यापुनि वास तुझा ।

तुजवांचुनि देवचि नाहीं दुजा । करूं सर्वभूतीं तव पादपुजा ॥४॥

मन मारुनियां जनीं वास करी । जन ग्रासुनि अंतरीं राम धरी ।

श्रुतिसार तो अक्षररूप मुनी । धरि अक्षय होउनि त्यासि मनीं ॥५॥

हरि केवळ अंतरिं आठविती । हें हरि० पद अंतरिं सांठविती ।

पावति ते नर सार० पदा । सौंसार तयाचें नाम वदा ॥६॥

संत० पदीं बरी थार करी । हरि सेवुनि माईक मार हरी ।

हरि केवळ तो असे ज्यासि कळे । संसार ० पदो० पदीं सर्व फळे ॥७॥

हरि आठवुनि सौंसार हरी । सौंसाराचि अंतरीं पूर्ण भरी ।

सौंसार चराचरी सर्व करी । सौंसार तो मागुती केंवि धरी ॥८॥

सौंसार चराचर ज्यासि दिसे । सौंसार तयाप्रती साच नसे ।

सौंसार निरंतरीं तोचि असे । असे नेणतिया सौंसार रुसे ॥९॥

निजमंगळ वैभवदायक हा । भवभंजन सज्जन सज्जन हा ।

श्रमहारक तारक नायक हा । अति रंजन देव निरंजन हा ॥१७॥

मन्मथ-भंजन सज्जन राजा । चित्० पददायक नायक माझा ।

लक्षुनि अंतरीं भक्षुनि माया । पावक विरवी अक्षय ठाया ॥११॥

० पद ६१२ वें

कर्मवीण सौरी झाली आलें महाद्वारा ग, नाचे गरुड-पारा ।

जीवींचा सोयरा पाहतां डोळा खुंटल्या येरझारा ॥१॥

राम माझा भोळा अखंड घाली डोळा ॥ध्रु॥

चाळा लावी प्रोढी दावी भावना अभावी ग खुणे खुणावी ।

भेटी होतां पाठी घेतां खोड पडली ठावी ॥२॥

अविद्या गेली माया मेली हरपली काय कसें केलें गुरुराया ।

आंग चोरुनी खेंव देतां आलें आपल्या ठायां ॥३॥

जेथें पाहों तेथें दिसे कोठें जावें जातां ग, ठाव नाहीं रिता ।

भ्रांति सांवलें फिटतां उशीर नलगे एकांता ॥४॥

येकांतीचे निजगोडी सांगतां नय गोठी, ग मौन्या पडली मिठी ।

सद्गुरुकृपें केशवराजीं अखंड होते भेटी ॥५॥

राम माझा भोळा ॥

० पद ६१३ वें (वासुदेव)

कैसें सिद्धचि तुज घावेना । आहे जवळी परि पावेना ।

निजभावें-विण भावेना । गुरुकृपेंवीण फावेना गा ॥१॥

हे रामकृष्ण वासुदेवा । स्वयं ब्रह्मानंदें सुख सेवा गा ॥ध्रु॥

देहीं असोनि न कळे मना । सर्व जाणोनी कांही जाणेना ।

तेंचि आपण परि बाणेना । ज्याचें त्याशींच हें उमगेना गा ॥२॥

कैसें घरींच असोनि न देखे । करी नाना उपाय अनेके ।

तेणें श्रमचि होय अधिक । नव्हे आपणा आपण ठाउक गा ॥३॥

काय सांगावें कोण्हासी । कैसें ज्याचेंचि न कळे त्यासी ।

स्वयं विश्रांति वसोनि पासी । होती वांयाचि कासाविसि गा ॥४॥

गुरुकृपें केशव जाण । सांडुनिया जाणिवपण ।

स्वयं आपणातें राहे जाणोन । जाणीव नेणीव विसरो न गा ॥५॥

० पद ६१४ वें (खेळिया)

संताचें यक कौतुक पाही । त्यांसी असोनियां देह नाहीं रे ।

देहाविण जगीं उघड नांदती नवल कांही ना बाही रे, खेळया ॥ध्रु॥

काय मी सांगों तुज रे खेळया नवल वाटतें मज रे ।

क्षणक्षणा मन विस्मित होतसे अभिनव केव्हाडें चोज रे, खेळया ॥१॥

सर्वही भोग भोगुनि चांग भोगुचि त्यांसी त्याग रे ।

त्यागा भोगासी अलिप्त आपण ऐसा तयाचा भोग रे, खेळया ॥२॥

देहकम करीती परी न लिपती अतर्क्य तयांची स्थिति रे ।

गुरुकृपें केशवीं कांहीच नहोनी सहजीं सहज विचारती रे,

खेळया ॥३॥

० पद ६१५ वें (धाट - बिलंदी)

चांग, भांग करा मामी, भाग उदयो जाला वो, भाग उदयो जाला ।

परतुनि पां सांय धरा धन्या घरा आला ॥ध्रु॥

काजळ डोळां घाला मामी, काजळ डोळां घाला ।

भावजीचा हात धरुनी आपल्या सेजी चाला ॥१॥

नका टाकमटीका तुम्ही ठीका न कांटे फुका ।

आत्मारामीं मिळुनी राहा निज निजाच्या सुखा ॥२॥

नका करूं गमजा तुम्ही आपुल्या मनीं समजा ।

भ्रांति पडदा सारुनी वेगीं ठाईंच्या ठाईं उमजा ॥३॥

नका करूं चाळा तुम्ही देहबुद्धि गाळा ।

जळो तुमची जोड आतां कीतीके दरवाळा ॥४॥

ऐसा बोध करितां बाळ निजसेजा आलें ।

सद्गुरुकृपें केशवराजीं चित्त तन्मय जालें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP