० पद ३९२ वें
भक्तयाच्या पोटीं । देव हा जन्मला । लेंकुरवाळा जाला । भक्त देखा ॥ध्रु॥
प्रेमाचा निजपान्हा । बरवा घालुनि जाणा । वाढवीलें नाना । भजनविधी ॥१॥
देवाचिये पोटीं । जग जालें उदंड । तें होय ना तोंड । हरिभक्तांचे ॥२॥
पित्या-पुत्रां भेद । नाहीं परस्परें । यालागीं आदरें । त्सासी रक्षी ॥३॥
मायबाप दोनी । भक्तचि देवासी । म्हणवुनी सासायी । वाढवीलें ॥४॥
केशव म्हणे ऐसा । भक्तें देव केला । भक्तांचा पुसीला । ठाव देवें ॥५॥
० पद ३९३ वें
भक्त गरवार जाला । देवासी पैं व्याला ॥ आपण वेगळा पडला । नाहीं सेखी ॥ध्रु॥
नवल थोर माय । सांगों मी काय ॥ गुज जाणें ऐसें । कवण वो आहे ॥१॥
श्रवणें पोटां । आला साक्षात ॥ द्वैतता ग्रासुनी सेखी । आपणचि उरे ॥२॥
उपजतांचि भलें । उभय सुतक गेलें ॥ स्वानंदाचें पूर्ण । बारसें केलें ॥३॥
निष्कामाचें धाम । आत्माहा निज्ञामासी (?) केशवस्वामीनें । नाचवीलें त्यासी ॥४॥
० पद ३९४ वें (धाट - चाली धुम)
देवाशीं कांही नेसणें नाहीं । उघडा-नागवा देव सर्वत्र पाहीं ॥ध्रु॥
पिसाळला देव नावरे कोण्हा । लाजोनियांं श्रुती दाविती खुणा ॥१॥
देवांशी लाजणें निपटुनि नसे । जेथें पाहे तेथें सरीसाची दिसे ॥२॥
देव पीसाळला भक्त पिसा झाला । गुरुकृपें केशवीं जन मोहीला ॥३॥
० पद ३९५ वें
नाठवीधनसुतदारा । मज तो बहु माने बहु माने ॥ध्रु॥
आवरिला मनवारा । नेणें मार विकारा ॥
हरि० पदिं केला थारा । मज तो बहु माने बहु ॥१॥
साधुसि हृद्रत सांगे । ब्रह्म सनातन मागे ॥
अक्षय पंथा लागे । असंग होउनि वागे । मज तो ॥२॥
चिन्मय-तीर्थीं राहे । देव निरंतर पाहे ॥
गर्जन तर्जन साहे । केवळ निजसुख लाहे । मज तो ॥३॥
साधक म्हणवुनि भीणें ॥ सिद्ध मी ऐसें न म्हणे ॥
सर्वहि ब्रह्मचि जाणे । परम दशा हे बाणे ॥ मज तो ॥४॥
वाग्विलाप न सोडी । सोडी सर्वहि वोडी ॥
अद्वय-संपति जोडी । अखंड घे निज गोडी ॥ मज तो ॥५॥
अव्यक्त मुद्रा ल्याला । अलक्ष-भुवना आला ।
अक्षर-पानें धाला । केशवस्वामी जाला । मज तो ॥६॥